तरुण भारत

वीस टक्के कोरोनाबाधितांचा हृदयविकाराने मृत्यू

तज्ञ डॉक्टरांच्या परिसंवादामध्ये निष्कर्ष, कोरोनामुळे शरिरातील विविध अवयवांना धोका
अत्यवस्थ रुग्णांचे फुफुस, किडनी, लिव्हर निष्क्रीय होण्याचे प्रमाण वाढले
सौम्य लक्षणाच्या रुग्णांऐवजी अत्यवस्थ रुग्णांच्या प्रमाणात वाढ, स्वादूपिंडाला सूज येऊन मधूमेहाचाही धोका

कृष्णात चौगले / कोल्हापूर

Advertisements

कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्यक्ष श्वसनसंस्थेवर परिणाम होत असून वेळेवर उपचार न घेणाऱ्या रुग्णांचे फुफुस निष्क्रीय होत आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये वीस टक्के कोरोनाबाधितांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा निष्कर्ष आहे. अत्यवस्थ कोरोनाबाधितांपैकी 30 टक्के रुग्णांची किडनी निकामी झाली असून 20 टक्के बाधितांना ‘लिव्हर’शी संबंधित आजार (काविळ) दिसून आले आहेत. तर ज्यांना यापूर्वी मधूमेहाचा त्रास नाही, त्यांच्या स्वादूपिंडाला सूज येऊन मधूमेह झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेली सहा महिने कोरोनाबाधितांवर सुरु असलेल्या उपचारादरम्यान ही गंभीर स्वरूपाची अनेक लक्षणे समोर आली आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या ऑनलाईन परिसंवादामध्ये कोरोनामुळे विविध अवयवांवर कसे परिणाम होतात, याबाबत चर्चा करून अनेक निष्कर्ष मांडण्यात आलेत.

रविवारी शहरातील तज्ञ डॉक्टरांचा ऑनलाईन परिसंवाद पार पडला. यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये दिसणाऱ्या नवनवीन लक्षणांबाबत डॉक्टरांनी माहिती सांगितली. कोविड विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर जाणवणाऱया प्राथमिक लक्षणांबरोबरच काही घातक लक्षणे समोर येत असल्याचे अनेक डॉक्टरांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधितांपैकी काही रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत. तर काहींना सौम्य लक्षणे जाणवतात. त्यांच्यावर घरी अथवा कोविड केंद्रामध्ये उपचार केले जातात. तर तीव्र लक्षणे जाणवणाऱ्या (अत्यवस्थ रुग्ण) रुग्णांवर अतिदक्षता विभागातच उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सौम्य लक्षणाच्या रुग्णांऐवजी अत्यवस्थ रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट पेले. या परिसंवादामध्ये डॉ. साईप्रसाद, डॉ. अजय केणे, डॉ. विलास पाटील यांच्यासह अन्य तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.

कोरोनामुळे हृदय विकाराचा झटका

व्याधीग्रस्त अथवा यापूर्वी कोणताही आजार नसलेल्या अनेक कोरोनाबाधितांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत तज्ञ डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना विषाणू रक्तातील `लिम्फोसाईट’ पेशींवर ऍटॅक करतो. या पेशेंचे प्रमाण कमी झाल्यामुळे रक्ताच्या गुटळ्या तयार होतात. या गुटळ्या हृदयच्या दिशेने जाऊन तेथील रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात. त्यामुळे संबंधित रुग्णास हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू होतो. तर कोरोनाची तपासणी न केलेले पण हृदयविकाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे प्रमाणही मोठे आहे. त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली.

फुफुस आणि लिव्हरला धोका

कोरानाचा संसर्ग झाल्यानंतर प्राथमिक टप्प्यातच तपासणी करून उपचार घेतल्यानंतर 10 ते 14 दिवसांच्या कालावधीत रुग्ण बरा होतो. पण लक्षणे जाणवल्यानंतरही तपासणी आणि उपचारासाठी टाळाटाळ केल्यास फुफुसाची कार्यक्षमता कमी होते. अंतिम टप्प्यात फुफुस पूर्णपणे निकामी झाल्यामुळे व्हेंटीलेटरचा वापर करून देखील रुग्णांचा मृत्यू होतो. कोरोनाच्या या निमोनिया सदृष्य लक्षणांबरोबरच शरिरातील इतर अवयांना इजा पोहोवणारी अनेक लक्षणे समोर येत आहे. यामध्ये अत्यवस्थ कोरोनाबाधितांपैकी 20 टक्के रुग्णांना काविळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोविड विषाणू लिव्हरच्या कार्यपद्धतीमध्ये बिघाड निर्माण करत असल्यामुळेच संबंधित रुग्णांना काविळ झाल्याचे काही डॉक्टरांनी परिसंवादात सांगितले.

कोरोनामुळे किडनी होतेय निकामी

काही रुग्णांनी किडनी विकाराबाबत यापूर्वी कोणताही उपचार घेतलेले नाहीत. तरीही अचानक त्यांची किडनी निकामी होत असून क्रियाटीनच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. असे अत्यवस्थ रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आल्यानंतर त्यांना डायलिसीस हाच एकमेव पर्याय उरतो. पण उपचार सुरु करण्यापूर्वी केलेल्या विविध तपासणीच्या अहवालामध्ये त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये कोरोना विषाणूमुळेच किडनी निकामी होत असल्याचे डॉक्टरांचे अभ्यासपूर्ण मत आहे.

कोरोनातून बरे झाल्यानंतर पुढील तीन महिने काळजी घ्यावी

जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांनी पुढील तीन महिने काळजी घेणे आवश्यक आहे. बरे झाल्यानंतरही त्यांना खूप अंग दूखणे, ह्य्दयाचा वेग वाढणे किंवा कमी होणे अशी लक्षणे पुढील तीन महिने दिसू शकतात.
-तज्ञ डॉक्टर – विलास पाटील,

कोरोनामुळे शरिरातील विविध अवयवांवर दुष्परिणाम

कोरोनामुळे प्रत्यक्ष श्वसनसंस्थेवर परिणाम होत असला तरी 30 टक्के रुग्णांची किडनी निकामी होत आहे. विषाणूच्या प्रादुर्भावाबरोबरच पेनकिलर औषधे व रेमडीसीविर इंजेक्शनमुळेही किडनीला इजा होते. त्यामुळे दहा टक्के रुग्णांना डायलेसिसची गरज भासते. कोरोना विषाणूमुळे रक्त गोठण्याची क्रिया अत्यंत वेगाने होते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन मेंदूमध्ये गेल्यास पक्षाघात होतो. मेंदूला सूज येते. लिव्हरमध्ये रक्ताची गुठळी झाल्यास लिव्हर निकामी होते. तर हृदयामध्ये रक्ताची गुठळी झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. ज्यांना अगोदर किडनीचा कोणताही त्रास नव्हता अशा रुग्णांमध्ये किडनी फेल हो णे, व ज्यांना यापूर्वी मधूमेहाचा त्रास नव्हता त्यांच्या स्वादूपिंडाला सूज येऊन मधूमेह झाल्याचे निदर्शनास येत आहे. 50 टक्के रुग्णांमध्ये पोटात दुखून अतिसार सुरु होतो. तसेच तोंडाची चव जाणे व वास न येणे ही देखील लक्षणे आहेत.
-डॉ. साईप्रसाद – तज्ञ डॉक्टर-

Related Stories

आयजीएममध्ये लवकरच बसणार सिटीसस्कॅन मशिन

Abhijeet Shinde

रंजना गगेंनी स्वीकारला नगरपालिका मुख्याधिकारीचा पदभार

Abhijeet Shinde

अजिंक्यताऱयाची वाट बिकट

Patil_p

परत कोल्हापूरला जाणार : चंद्रकांतदादा पाटील

Abhijeet Shinde

सर्वसामान्यांची एसटीसेवा मोडण्याचा डाव

Sumit Tambekar

‘त्या ‘ रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल महत्त्वाचे ठरणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!