तरुण भारत

भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे निधन

प्रतिनिधी / पंढरपूर

आपल्या रसाळ वाणीने रुक्मिणी स्वयंवराचे आख्यान सांगणारे वक्ता दशस्त्रेषू, सावरकर भक्त, भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज प्राणज्योत मालवली. त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
वा. ना. उत्पात यांनी पंढरपूरचे नगराध्यक्षपद भूषविले होते. त्यांनी आयुष्यभर सावरकर आणि हिंदुत्ववादी विचारांचा प्रसार केला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

पंढरपुरातील कवठेकर प्रशालेचे ते मुख्याध्यापक होते. उत्पातांच्या लावण्यांच्या कार्यक्रमाचे रसपूर्ण निवेदन ही त्यांच्या ख्याती होती. अंधारातल्या लावण्या हा कार्यक्रम ते ज्ञानोबा (माऊली) उत्पात यांच्यासमवेत करीत. विठ्ठल मंदिर परिसरातील रुक्मिणी पटांगणात दरवर्षी होळी ते रंगपंचमी या काळात हा कार्यक्रम उत्तररात्री रंगत असे. पु.ल.देशपांडे, कुमार गंधर्वांसारख्या मान्यवरांनी त्याला हजेरी लावली होती.

पंढरपुरात वि. दा. सावरकर यांच्या नावाने त्यांनी वाचनालय उभे केले आहे. तिथे दरवर्षी उत्तमोत्तम वक्त्यांची व्याख्याने ते आयोजित करीत. ते स्वतःही उत्तम वक्ते होते. त्यांनी राज्यभर फिरून विविध विषयांवर व्याख्याने दिली. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. व्याख्यानांसाठी मिळणाऱ्या मानधनाच्या रकमेतून त्यांनी सावरकर क्रांती मंदिर उभे केले आहे. ज्ञानेश्वरी, श्रीमद्भागवत हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisements

Related Stories

सोलापूर : तडवळ येथे घर फोडले, ५२५०० चा मुद्देमाल लंपास

Abhijeet Shinde

यशस्वी वकिलीचे सूत्र नाही : कपिल सिब्बल

prashant_c

धावत्या रेल्वेतही मिळणार रिक्त जागांची माहिती

Abhijeet Shinde

विजेचा धक्का बसून शाळकरी मुलगा ठार

Abhijeet Shinde

सोलापूर : गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर : सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

Abhijeet Shinde

अण्णांच्या आंदोलनाकडे सरकारची पाठ

prashant_c
error: Content is protected !!