तरुण भारत

‘कोविड’च्या संकटात ‘दिल की आवाज सून’…

जीवनशैलीमुळे ह्रदयविकाराचे प्रमाण वाढीस

सूरज प्रभू/ मडगाव

Advertisements

‘दिल की आवाज भी सून’ हे जुन्या काळातील ‘हमसाया’ या चित्रपटात ओ. पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले एक गीत. या गीताचा प्रत्यक्षात रोख जरी वेगळा असला, तरी त्याची ही पहिली ओळ मात्र आजच्या परिस्थितीला चपखल शोभून दिसणारी… बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन व त्यातील वाढते ताणतणाव, अरबट-चरबट खाणे, ‘फास्ट फूड’चा सोस यामुळे आज खरेच ‘ह्रदय’ काय सांगतेय ते कान देऊन ऐकण्याची वेळ आलीय. ‘कोरोना’च्या आक्रमणाच्या काळात तर ही गरज जास्तच वाढलीय आणि आजच्या ‘हार्ट डे’चा मंत्र देखील तोच…

‘जागतिक ह्रदयदिन’ हा 29 सप्टेंबर या दिवशी पाळला जातो तो ‘सीव्हीडी’ म्हणजेच ‘कार्डिओ-व्हेस्क्युलर’ विकारांसंदर्भात जागृती करण्याच्या नि ते रोखण्याच्या उद्देशाने. स्वीत्झर्लंडमधील जीनिव्हास्थित ‘वर्ल्ड हार्ट फेडरेशनन’ने ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या (डब्ल्यूएचओ) संयुक्त विद्यमाने 1999 साली त्याचा पाया घातला. यंदाच्या ‘हार्ट डे’ला ‘ह्रदयाचा वापर करून ‘सीव्हीडी’वर मात करा’ या संकल्पनेची जोड देण्यात आलीय…

मृत्यूच्या खाईत लोटणारे सर्वांत मोठे कारण

‘वर्ल्ड हार्ट फेडरेशन’च्या अनुसार, लोकांना मृत्युच्या खाईत लोटणारे ह्रदयविकार हे पृथ्वीतलावरील सर्वांत मोठे कारण. ‘बिगर-संसर्गजन्य रोगां’मुळे जे मृत्यू ओढवतात त्यात अर्धा वाटा ह्रदयाचे विकार उचलतात. त्यांच्या अंदाजाप्रमाणे, दरवर्षी त्यामुळे 1 कोटी 79 लाख रुग्ण शेवटचा श्वास घेतात आणि एकूण मृत्यूंमध्ये हे प्रमाण 31 टक्के इतके भरते. कमी व मध्यम उत्पन्नाच्या देशांमध्ये ह्रदयविकार जडण्याचे आणि त्यामुळे मृत्यू येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे आणि त्यात भारताचा देखील समावेश होतो.

भारतात चारपैकी एक मृत्यू ह्रदयविकाराने

देशातील चारपैकी एका मृत्यूला ह्रदयाचे विकार कारणीभूत ठरत असून 2016 साली प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ‘कार्डिओ-व्हेस्क्युलर’ विकारांना तोंड द्याव्या लागलेल्यांचा आकडा 5.5 कोटींवर गेला होता. एका अंदाजाप्रमाणे, सध्या भारतात दरवर्षी सरासरी 17 लाखांहून जास्त लोक ह्रदयविकाराला बळी पडतात…‘इंडियन हार्ट असोसिएशन’नुसार, ह्रदयविकाराला तोंड द्याव्या लागत असलेल्या लोकांपैकी 50 टक्के हे 50 वर्षांखालील, तर 25 टक्के 40 हून कमी वयाचे असल्याचे दिसून येतेय. गोव्यातही ह्रदयविकाराने ग्रासण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मागील पाच वर्षांत ‘हार्ट ऍटॅक’मुळे मृत्यू येणाऱयांची संख्या तब्बल 18 टक्क्यांनी वाढलीय अशी आकडेवारी मागील वर्षी समोर आली होती.

‘कोरोना’मुळे धोका वाढला

सध्या ‘कोविड’ची तलवार डोक्यावर टांगत असल्याने आणखीनच सतर्क राहण्याची, ह्रदयाची जास्त काळजी घेण्याची वेळ आलीय. याचे कारण रक्तदाब, मधुमेह याप्रमाणेच ह्रदयविकार असलेल्या रुग्णांवर ‘कोरोना’चा अधिक जोराने हल्ला होतो. या विषाणूचे लक्ष्य प्रामुख्याने फुफ्फुसे राहत असली, तरी तो ह्रदयाला सुद्धा जबर तडाखा देऊ शकतो आणि त्यामुळे ह्रदयविकार असलेल्या रुग्णांमध्ये ‘कार्डिएक ऍरेस्ट’चा धोका वाढू शकतो असे अनेक अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

Related Stories

गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा रिक्षा पकडला

Patil_p

कर्नाटकातील कोरोना उद्रेकाचा परिणाम मुरगाव बंदरावर

Patil_p

कोणी पेपर देता का हो वाचायला ….ग्रंथालयाअभावी पिळगावात नागरिकांची मागणी

Amit Kulkarni

मजूर निधी घोटाळाप्रकरणी लोकायुक्तचा सरकारला दणका

Omkar B

फोंडय़ात ‘रायकर सेल्स’ सायकल आस्थापनाचे उद्घाटन

Amit Kulkarni

कर भरा, अटक करण्याची वेळ आणू नका!

Amit Kulkarni
error: Content is protected !!