तरुण भारत

रत्नागिरी : खेडला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळता मिळेना !

‘प्रभारीं’ची परंपरा कायमच, कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी नियुक्तीसाठी प्रशासन उदासीनच
प्रतिनिधी /खेड
खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार गेल्या वर्षभरापासून प्रभारींच्याच हातात असून ‘प्रभारीं’ची परंपरा आजमितीसही कायमच राहिली आहे. येथील गटशिक्षणाधिकारीपदी श्रीधर शिगवण वर्षभरापासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तालुका शिक्षण विभागाला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्यांची निकडीची गरज असतानाही प्रशासकीय पातळीवरून यासाठी कुठल्याच प्रकारच्या हालचाली होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तालुक्यात ३४५ प्राथमिक शाळा असून ९०० हून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांवर देखरेख ठेवून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तालुका शिक्षण विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र, येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांचा कारभार प्रभारींच्याच हातात असल्याने काहीवेळा धोरणात्मक निर्णय घेताना अडथळे निर्माण होत आहेत. येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात गेल्या कित्येक वर्षापासून प्रभारीचा सिलसिला कायम राहिला होता. मात्र, मंगला व्हावळ यांची कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता.
गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीमुळे कामकाजालाही गती मिळाली होती. मात्र, तीन वर्षानंतर त्यांची अन्यत्र बदली झाल्याने त्यांच्या जागी विस्तार अधिकारी विजय बाईत यांच्याकडे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सुपुर्द करण्यात आला. तब्बल ३ वर्षाहून अधिक काळ ते प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणूनच कामकाज करत होते. मात्र, तेही तत्सम कारणावरून वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर त्यांच्या जागी गुहागरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे येथील कार्यभार सोपवण्यात आला होता. या दोन्ही ठिकाणचा कारभार हाकताना त्यांनाही तारेवरच्या कसरतीला सामोरे जावे लागत होते.
यापार्श्वभूमीवर तालुका पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदी श्रीधर शिगवण यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून आजमितीसही प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तालुक्याला कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी मिळवण्यासाठी सत्ताधारी व विरोधक आक्रमक का होत नाहीत? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देवून कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

शासनाकडे पाठपुरावा सुरूच – सुनील मोरे
जिल्ह्यात सर्वच ठिकाणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकाऱ्यांसाठी शासनाची मान्यता आवश्यक आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरूच असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

दहाचाकी ट्रक कलंडून चौघे जखमी

NIKHIL_N

खंडित वीज पुरवठ्यामुळे ओटवणे ग्रामस्थ आक्रमक

Ganeshprasad Gogate

नागरिकांना पैशांसाठी पोस्टाचा आधार

NIKHIL_N

रत्नागिरी : सन्मित्रनगरात घरफोडी; 3 लाखाचा मुद्देमाल लांबवला

Abhijeet Shinde

भांडण, तंटे मिटवून 25 वर्षांनी कातळवाडी आली एकत्र

Patil_p

जिल्हय़ात येणाऱयांना चाचणी बंधनकारक

NIKHIL_N
error: Content is protected !!