तरुण भारत

सनरायजर्स हैदराबादचा एकतर्फी विजय

फिरकीपटू रशीद खानचे 14 धावात 3 बळी

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisements

फिरकीपटू रशीद खानने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना अवघ्या 14 धावातच 3 बळी घेतल्यानंतर सनरायजर्स हैदराबाद संघाने आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहज धुव्वा उडवला. हैदराबादने 4 बाद 162 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात दिल्लीला 7 बाद 147 धावांवर समाधान मानावे लागले. फिरकीपटू रशीदने या लढतीत शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांचे बळी घेतले.

या सामन्यातील पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत दुसऱया स्थानी घसरला.

विजयासाठी 163 धावांचे माफक आव्हान असताना युवा सललामीवीर पृथ्वी शॉ 2 धावांवरच बाद झाला तर कर्णधार श्रेयस अय्यरला 17 धावा करता आल्या. शिमरॉन हेतमेयर मोठी खेळी उभारण्यापूर्वी बाद झाला. ऋषभ पंतने एका बाजूने फटकेबाजी सुरु ठेवली होती. पण, तो ही नंतर 32 धावांवर बाद झाला. हेतमेयरनंतर स्टोईनिसही बाद झाला आणि त्यानंतर दिल्लीच्या आशा जवळपास मावळल्या होत्या.

उत्तम सलामी, तरीही...

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्स संघाने सनरायजर्स हैदराबादला दमदार सलामीनंतर देखील 4 बाद 162 धावांवर रोखण्याची किमया साधली. वास्तविक, डेव्हिड वॉर्नर व बेअरस्टो या सलामीवीरांनी 77 धावांची सलामी दिल्यानंतर सनरायजर्सला 180 धावांच्या आसपास टप्पा गाठणे सहज शक्य झाले असते. पण, प्रत्यक्षात त्यांना अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर सनरायजर्स हैदराबादने या लढतीत उत्तम सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियन डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर व त्याचा इंग्लिश संघसहकारी सलामीवीर जॉनी बेअरस्टो यांनी 9.3 षटकात 77 धावांची जोरदार सलामी दिली.

वॉर्नरने 33 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 45 धावांची आतषबाजी केली तर जॉनी बेअरस्टोने दमदार अर्धशतक झळकावताना 48 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 53 धावांचे योगदान दिले.

अमित मिश्राकडून ब्रेकथ्रू

डावातील 10 व्या षटकात अमित मिश्राने वॉर्नरला पंतकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. वॉर्नरचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न यावेळी सपशेल फसला होता. त्यापूर्वी रिव्हर्स स्वीपचा फटका उत्तम बसल्यानंतर वॉर्नरने पुन्हा त्यावर भर दिला. मात्र, यावेळी चेंडू त्याच्या ग्लोव्हजना स्पर्शून यष्टीमागे गेला.

बेअरस्टोचे अर्धशतक

जॉनी बेअरस्टो अर्धशतक साजरे केल्यानंतर पुन्हा एकदा उत्तूंग फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. रबाडाच्या गोलंदाजीवर त्याने मिडऑफवरील नोर्त्जेकडे झेल दिला. 

पुढे, मनीष पांडेने जम बसण्यापूर्वीच स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न केला आणि तो चुकल्यानंतर डीप मिडविकेटवरील रबाडाने त्याचा झेल टिपला.

विल्यम्सनची फटकेबाजी

केन विल्यम्सनने 26 चेंडूत जलद 41 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश राहिला. रबाडाच्या प्रतितास 143 किमी वेगाच्या चेंडूवर उत्तूंग फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने मिडविकेटवरील पटेलकडे सोपा झेल दिला. अंतिम टप्प्यात अब्दुल समद 7 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 12 तर अभिषेक शर्मा एका चेंडूत एका धावेवर नाबाद राहिले.

दिल्ली संघातर्फे कॅगिसो रबाडाने 4 षटकात 21 धावात 2 तर अमित मिश्राने 4 षटकात 35 धावात 2 बळी घेतले. फक्त ऍनरिच नोर्त्जेच महागडा ठरला. त्याने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना एकाही बळीशिवाय 44 धावा मोजल्या.

Related Stories

दोन ‘रॉयल्स’ संघ आज पुन्हा आमनेसामने

Patil_p

सर्बियाचा जोकोविच तिसऱया फेरीत

Patil_p

विंडीज-इंग्लंड यांच्यात आज दुसरी लढत

Patil_p

करूणारत्ने, थिरिमने यांची दमदार शतके

Amit Kulkarni

डेव्हिस चषक : क्रोएशियाला हरवून रशिया विजेते

Patil_p

ऍडलेडवर आजपासून ‘डे-नाईट’ कसोटी

Amit Kulkarni
error: Content is protected !!