तरुण भारत

बार्देशातील पालक शिक्षकांचा विद्यालये, कॉलेज सुरू करण्यास विरोध

पत्रकार परिषदेत दिली संयुक्तरीत्या माहिती : आम्ही विषाची परीक्षा पाहणार नाही : शाळा सुरू करून सरकार आत्महत्या नव्हे तर हत्याच करणार : कोणत्याच परिस्थितीत शाळा सुरू करण्यास देणार नाही

प्रतिनिधी / म्हापसा

येत्या 2 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये सुरू करण्याचा सरकारचा विचार असून त्यास बार्देश तालुक्यातील सर्व पालक शिक्षक वर्गांनी आपला ठाम विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्र्याच्या म्हणण्यानुसार 90 टक्के पालकांचा शाळा पुन्हा सुरू करण्यास संमती असल्याचे म्हणणे आहे असे मुख्यमंत्री सांगत असले तरी मुख्यमंत्र्यांनी आम्हा कुणालाही विश्वासात घेतले नाही असे येथील पालक शिक्षक वर्गाचे म्हणणे आहे. आम्ही विषाची परीक्षा पाहू शकत नाही. राज्यात कोविडचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज राज्यभर गोळय़ा पुरविणाऱया ज्यांच्या आजूबाजूला 100 डॉक्टर असतात त्या केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, शिक्षण संचालकांना कोरोनाची बाधा झाली आहे मग आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवून आत्महत्या  नव्हे तर हत्याच करणार असल्याचे मत यावेळी पालक शिक्षक वर्गांनी व्यक्त केले. आम्ही कोणत्याच परिस्थितीत शाळा, विद्यालय, महाविद्यालये सुरू करण्यास देणार नाही असा ठाम निर्णय पालक शिक्षक वर्गांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

बार्देश तालुक्यातील पालक शिक्षक वर्गातर्फे संयुक्त पत्रकार परिषद म्हापसा येथील इंद्रधनुष्य हॉलमध्ये घेण्यात आली त्यावेळी वरील माहिती मान्यवरांनी दिली. शाळेत वर्ग घेण्यास आमचा ठाम विरोध आहे. त्यापेक्षा ज्या पद्धतीने सध्या ऑनलाईन वर्ग सुरू आहेत ते सुरुच ठेवावेत. परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात. आज सरकार प्रकल्पासाठी कोटय़ावधी रुपये खर्च करीत आहे त्यापेक्षा गावागावात वायफाय सेवा सुरु करावी. जे गरजू होतकरू विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून काही कंपनी वा सेवाभावी संस्थेच्या पुढाकाऱयांनी अशा विद्यार्थ्यांना लॅपटॉप वा भ्रमणध्वनी पुरस्कृत करावेत अशी मागणी यावेळी पालक वर्गांनी केली. कोरोनाचा प्रादूर्भाव दर दिवशी वाढत आहे. सुमारे पाचशेच्या आसपास दरदिवशी कोरोनाची लागण होत आहे त्यात 10 ते 15 जण दरदिवशी मरण पावत आहेत. अशाने आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू शकत नाही वा धोका पत्करू शकत नाही. आमची मुले आम्हाला प्रिय आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी पालकांनी दिली.

यावेळी व्यासपीठावर सारस्वत विद्यालयाचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन पै बीर, जी.एस आमोणकरचे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महेश स्वार, सदस्य वामन खोर्जुवेकर, सदस्य विजय भिके, डीएमसी कॉलेजचे उमेश कोलवाळकर, सारस्वत पालक शिक्षक संघाचे सदस्य किशोर राव, ज्ञानप्रसारक विद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत नार्वेकर, जनता हायस्कूलचे सदस्य तुषार टोपले, उपाध्यक्ष शितल सातार्डेकर, गजानन गडेकर, जीएस आमोणकरचे कमलाकांत भर्तु आदी पालक यावेळी उपस्थित होते.

आम्हाला आमच्या मुलांचे आरोग्य महत्त्वाचे

महेश स्वार यावेळी म्हणाले की, आम्ही येथे राजकारण करीत नाही. आम्हाला अआमच्या मुलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. वर्गात मुलांना निदान 3 तास बसून रहावे लागणार आहे त्यात टॉयलेट, सेनिटायझर शिक्षकांना कोरोना झाला तर त्यापेक्षा ऑनलाईन सेवा सुरू ठेवा. गरीब विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे भ्रमणध्वनी द्या अशी मागणी त्यांनी केली. उमेश कोलवाळकर म्हणाले की, प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक विभागात 65 ते 70 विद्यार्थी असतात. ऑफलाईन वर्ग आम्ही घेऊ शकत नाही त्यापेक्षा ऑनलाईन वर्ग सुरू ठेवा. यासाठी मोफत वायफाय सेवा गावोगावी द्यावी. प्रकल्पासाठी 300 कोटी खर्च करतो ते पैसे निदान एक वर्षासाठी द्यावे. पालकांनी नाहक विद्यार्थ्यांना शाळेत विद्यालयात पाठवूव धोका निर्माण करून घेऊ नये. शिक्षकांच्या सुट्टीबाबतही सरकारने अद्याप काही धोरण आखले नाही असे कोलवाळकर म्हणाले.

ऑनलाईन अभ्यासाबरोबर परीक्षाही ऑनलाईन घ्याव्यात

सचिन पै बीर म्हणाले की, दर दिवशी 500 च्या सुमारास रुग्ण वाढत आहेत. घरोघरी होम कोरन्टाईन होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येईल. दबावाने आम्ही विद्यार्थ्यांना विद्यालयात पाठवू शकत नाही. यासाठी सरकारने ऑनलाईन सेवा अधिक बळकट करणे गरजेचे आहे. शिवाय परीक्षाही ऑनलाईन घ्याव्यात. बैंगलोर प्रमाणे राज्यातही ऑनलाईन परीक्षा सेवा घेणे सोयीस्कर आहे असे पै बीर म्हणाले. आम्ही डिसेंबर पर्यंत कोरोनाची वाट पाहू या. सरकारने विद्यार्थ्यांबाबत नाहक धोका पत्करू नये असा सल्ला गजानन गडेकर यांनी दिला.

आमदारांनी आपला पगार गरीबांना द्यावा

किशोर परब म्हणाले की, सरकारने नाहक राजकारण करू नये. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून पाहावे. आम्ही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही. हे वय विद्यार्थ्यांचे खेळण्याचे अशा परिस्थितीत विद्यार्थी मशीन घेऊन खोलीत बसतात. युटीएल कंपनीने यापूर्वी वायफायची कनेक्टीव्हीटी देतो म्हणून सांगितले होते. यापूर्वी सरकारने लॅपटॉप दिले. आता का देत नाही. 40 आमदारांनी आपला पगार गरीबांना लॅपटॉप वा भ्रमणध्वनी खरेदीसाठी द्यावा. असे 6 महिने केल्यास लोकांचे आशीर्वाद मिळतील. सध्या राज्यात शाळा विद्यालये सुरू करू नये असे त्यांनी सूचित केले.

शितल सातार्डेकर म्हणाल्या की, 9 वी नंतरच्या मुलांना सांभाळणे पालकांना कठीण होणार. दुसऱया वर्गात जातो म्हणून आपलाही मुलगा शाळेत जाणार. शिक्षण आम्हाला पाहिजेच मात्र असा धोका पत्करून नको. असा एक दिवस होता की आम्ही मुलांना मोबाईल देत नव्हतो मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. नाहक विषाची परीक्षा नको. मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करावा असे त्या म्हणाल्या.

शिक्षक पॉझिटिव्ह झाले तर विद्यार्थ्यांचे भवितव्य काय

विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून कोरोनाला नाहक निमंत्रण नको असे तुषार टोपले म्हणाले. बार्देशात एका विद्यालयात 12 शिक्षक पॉझिटिव्ह झाले. शिक्षकच पॉझिटिव्ह होऊ लागले तर विद्यार्थ्यांचे भवितव्य काय. शाळा सुरू करण्याचा निर्णय डिसेंबर पर्यंत स्थगित ठेवावा अशी मागणी प्रशांत नार्वेकर यांनी केली. हे वर्ष शून्य वर्ष म्हणून जाहीर करावे असे कमलाकांत भर्तू यांनी सांगितले. सहा वर्षाचा डिप्लोमा कोर्स ऑनलाईन पद्धतीने सुरू करावा असे त्यांनी सांगितले.

सरकार ठाम राहिल्यास आम्ही प्रखर विरोध करणार

मुख्यमंत्र्यांनी कोणत्याच पालकाला शाळा पन्हा सुरू करण्याबाबतच्या निर्णयास विश्वासात घेतले नाही. हा विषय गंभीर आहे. गोमेकॉत खाटा नाही. 100 विद्यार्थी गंभीर झाले तर सरकार काय करणार. गरीब 2 लाख कुठून आणणार. शिक्षण पद्धत 30 टक्के कपात करणार असे म्हटले तरी त्यांचा काहीच तपशील नाही. आमचा शाळा सुरू करण्यास प्रखर विरोध आहे आणि सरकार आपल्या निर्णयास ठाम राहीले तर आम्ही सर्व पालक शिक्षक वर्ग यास ठाम विरोध दर्शविणार. ऑनलाईन सेवा सुरू ठेवून प्रत्येक घरात इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जीएस आमोणकर पालक शिक्षक वर्गाचे अध्यक्ष विजय भिके यांनी केली.

0930स्aज्15

म्हापसा : शाळा, विद्यालये सुरू करण्यास विरोध दर्शविण्यासाठी म्हापसा येथे पालक शिक्षक वर्गाचे अध्यक्ष संयुक्तरीत्या पत्रकार परिषदेत बोलताना सारस्वत विद्यालयाचे अध्यक्ष सचिन पै बीर बाजूस पालक शिक्षक वर्ग आदी.

Related Stories

म्हापसा निरीक्षक नरसिंह राटवळ यांचा पालिकेतर्फे गौरव

omkar B

वाळपई काँग्रेस गट समितीतर्फे पोलीस, संबंधित कर्मचाऱयांचे अभिनंदन

omkar B

भाजपात प्रवेश केल्याने काणकोणचा विकास करता आला

omkar B

नायजेरियन चाच्यांनी अपहरण केलेल्या गोमंतकीय युवकाचा मृत्यू

Patil_p

न्यू मार्केटमधील सर्व दुकाने खुली करण्यास मज्जाव

omkar B

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या विलिनीकरणाचा दावा खोटा

omkar B
error: Content is protected !!