तरुण भारत

विविध आजारांवर औषधे घेताना…

आजारी पडल्यास अथवा एखादा विकार झाल्यास आपण डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर काही औषधे लिहून देतात. आजारातून पूर्ण बरे होण्यासाठी औषधांचा संपूर्ण कोर्स किंवा दिलेल्या दिवसांपर्यंत औषधे घेणे आवश्यक असते. काही व्यक्तींना एकापेक्षा जास्त त्रास किंवा आजार असल्याने औषधयोजनाही वेगवेगळी असते. अशा वेळी दोन औषधांमधील कालावधी किती असावा याबाबत रूग्णाचा गोंधळ होऊ शकतो.

गंभीर आणि तीव्र स्वरूपाच्या आजारांसाठी दिलेल्या सूचनांप्रमाणे वेळेवर औषधे घेणे महत्त्वाचे असते. चुकीच्या पद्धतीने औषधे घेतल्यास हळूहळू त्यांचा परिणाम होणे बंद होते.

एखादी व्यक्ती, दीर्घकाळापासून काही आजारांवर औषधे घेत असते. कालांतराने त्या आजाराची लक्षणे दिसेनाशी झाली की, औषध घेणे बंद करण्याचा विचार केला जातो. परंतु असे करू नये. कारण बरेचदा औषधांच्या मदतीने आजार नियंत्रणात राहिलेले असतात. औषधे बंद केल्यास आजार पुन्हा उद्भवू शकतो. तसेच मधुमेह, हाडे कमजोर होणे यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यताही यामुळे वाढते.

प्रत्येक औषध व त्याचे स्वरूप वेगळे असते. व्यक्तीच्या शरीरानुरूप औषध परिणाम करत असते. औषधाचे शोषण आणि पचन वेगवेगळ्या प्रकारे होते. दीर्घकाळ घेतल्या जाणार्या औषधांचा मूत्रपिंडावर दुष्परिणाम होतो. काही औषधे जेवण करण्यापूर्वी किंवा जेवल्यानंतर घ्यायची असतात. कारण जेवणाच्या पदार्थातील घटक हे औषधाचा परिणाम कमी -जास्त करू शकतात.

औषधे घेण्याची योग्य पद्धत

हृदयरोगाचे औषध रोज रात्री आणि थायरॉईडचे औषध सकाळी अनशापोटी घ्यायला हवे. रक्त पातळ करणारे औषध घेत असाल तर हिरव्या पालेभाज्या आहारात घेऊ नका.

लोह- कॅल्शिअमचे औषध एकत्र घेतल्यास त्याचा परिणाम कमी होतो. रक्तदाबाची काही औषधे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके कमी करतो.

औषधे घेतल्यानंतर शारीरिक श्रम करताना सावध रहावे. मुख्य औषधाबरोबर जीवनसत्व, खनिजे यांच्या गोळ्या घेऊ नये.

दीर्घ काळापासून रक्तदाब, थायरॉईड, मधुमेह किंवा इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल आणि जोडीला दुसर्या आजाराचे औषध किंवा कफ सिरप घ्यायची वेळ आल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

काही लोक आजारांसाठी होमिओपॅथी, ऍलोपॅथी, आयुर्वेद इत्यादी विविध प्रकारच्या पॅथींची औषधे घेतात. पण याबाबत तज्ञांचा सल्ला आवश्यक ठरतो. अन्यथा कोणत्याच औषधाचा परिणाम न होण्याची शक्यता असते.

एकापेक्षा जास्त आजारांसाठी औषधे घेत असाल आणि एक ते दीड आठवडय़ांपर्यंत औषधे घेऊनही आजाराची लक्षणे कमी न झाल्यास किंवा अस्वस्थ वाटू लागल्यास दोन औषधांमध्ये संतुलन बिघडलेले असू शकते.

औषधे कशी घ्यावीत?

आजारानुसार औषधे दूध किंवा पाण्याबरोबर घेण्याचा सल्ला दिला जातो.

काही औषधे फक्त पाण्याबरोबर घ्यायची असतात कारण दुधामधील कॅल्शिअम औषधांमधील काही घटकांच्या संपर्कात आल्यास त्याचा परिणाम कमी होतो.

त्यामुळे तज्ञांनी दिलेल्या सुचना पाळून त्याप्रमाणे औषधे सेवन करावीत. 

– डॉ. संजय गायकवाड

Related Stories

वजननियंत्रणासाठी आसने

tarunbharat

ई व्हिटॅमिन कशासाठी ?

omkar B

अधोमुखवृक्षासन

omkar B

जेवल्याबरोबर पाणी पीताय ?

tarunbharat

विकार मूत्राशयाचे

omkar B

पतंजलीचे ‘कोरोनिल’ 3 दिवसात करते रुग्ण बरा : बाबा रामदेव

datta jadhav
error: Content is protected !!