तरुण भारत

ओस्टापेन्को, हॅलेप, व्हेरेव्ह, नदाल तिसऱया फेरीत

फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम : प्लिस्कोव्हा, कोको गॉफ, इराणी, निशिकोरी स्पर्धेबाहेर, जोकोविच विजयी

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisements

महिलांमधील अग्रमानांकित सिमोना हॅलेप, एलेना ओस्टापेन्को, मार्टिना ट्रेविसन, किकी बर्टेन्स, सोफिया केनिन, पुरुषांमध्ये अलेक्झांडर व्हेरेव्ह, राफेल नदाल, डॉमिनिक थिएम, जोकोविच यांनी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला तर द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा, अमेरिकेची कोको गॉफ, इटलीची सारा इराणी, अमेरिकेचा जॅक सॉक, जपानचा केई निशिकोरी यांचे आव्हान दुसऱया फेरीतच संपुष्टात आले.

रोमानियाच्या अग्रमानांकित हॅलेपने आपल्याच देशाच्या इरिना कॅमेलिया बेगूचा 6-3, 6-4 असा पराभव केला. तिचा हा एकूण सलग सोळावा विजय आहे. यापूर्वी या दोघींत सातवेळा गाठ पडली होती. त्या सर्व लढती हॅलेपनेच जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या चौथ्या मानांकित सोफिया केनिनला तिसरी फेरी गाठताना संघर्ष करावा लागला. तिने रोमानियाच्या ऍना बॉग्डनवर 3-6, 6-3, 6-2 अशी मात केली. गेल्या वर्षी केनिनने या स्पर्धेच्या चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती. 2012 मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या सारा इराणीवर विजय मिळविण्यासाठी पाचव्या मानांकित किकी बर्टेन्सला 3 तास 11 मिनिटे झुंज द्यावी लागली. बर्टेन्सने ही लढत 7-6 (7-5), 3-6, 9-7 अशी जिंकली. या सामन्यात 24 सर्व्हिस ब्रेक्स पहावयास मिळाले. साराला तीनदा मॅचसाठी सर्व्हिस करायची संधी मिळाली आणि एक मॅचपॉईंटही मिळाला. पण तिला ती संधी साधता आली नाही.

माजी विजेत्या लॅटव्हियाच्या ओस्टापेन्कोने दुसऱया मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाला 6-4, 6-2 असा पराभवाचा धक्का देत तिसरी फेरी गाठली. तिने 2017 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तिची पुढील लढत स्लोअन स्टीफेन्स किंवा पॉला बडोसा यापैकी एकीशी होईल. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या 16 वर्षीय कोको गॉफचे आव्हानही संपुष्टात आले. पात्रता फेरीतून आलेल्या इटलीच्या मार्टिना ट्रेविसनने तिला 4-6, 6-2, 7-5 असे नमविले. या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन व विम्बल्डन स्पर्धेत गॉफने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.

पुरुष एकेरीत राफेल नदालने मॅकेन्झी मॅकडोनाल्डचा 6-1, 6-0, 6-3 असा पराभव करीत आगेकूच केली. जागतिक तिसऱया मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने अमेरिकेच्या जॅक सॉकचा 6-1, 6-3, 7-6 (8-6), असा पराभव केला तर  जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने पाच सेट्सच्या लढतीत पीयर हय़ुजेस हर्बर्टवर 2-6, 6-4, 7-6 (7-5), 4-6, 6-4 अशी मात करून तिसऱया फेरीत स्थान मिळविले. व्हेरेव्ह हा पाच सेट्सचा मास्टर होत चालला असून त्याने पाच सेट्समध्ये झालेले मागील सातपैकी 6 सामने जिंकले आहेत. त्याची लढत इटलीच्या मार्को सेक्चीनाटोशी होणार आहे. जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान मात्र दुसऱया फेरीतच समाप्त झाले. त्याला इटलीच्या स्टीफानो ट्रव्हाग्लियाने 6-4, 2-6, 7-6(7), 4-6, 6-2 असे नमवित पुढील फेरी गाठली. सर्बियाच्या जोकोविचने तिसरी फेरी गाठताना रिकार्डस बेरान्किसचा 6-1, 6-2, 6-2 असा पराभव केला.

Related Stories

बॅडमिंटनपटू ऍक्सेलसेन कोरोना बाधित

Patil_p

साईराज बहुतुले बीकेसी इनडोअर अकादमी संचालक

Patil_p

माजी फुटबॉलपटू पार्डोई कालवश

Patil_p

‘त्या’ खेळाडूंसह भारतीय संघ आज सिडनीकडे

Patil_p

जपान, स्पेन, ब्राझील, मेक्सिको उपांत्य फेरीत

Patil_p

आजपासून पुन्हा रंगणार ‘रात्रीस खेळ चाले’!

Patil_p
error: Content is protected !!