तरुण भारत

मुंबई इंडियन्सचा 48 धावांनी धमाकेदार विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धा : पंजाब किंग्स इलेव्हनचा 4 सामन्यातील तिसरा पराभव

वृत्तसंस्था/ दुबई

कर्णधार रोहित शर्माने (45 चेंडूत 70) स्वतः पुढाकाराने साकारलेले दमदार अर्धशतक, अंतिम टप्प्यात पोलार्ड (20 चेंडूत 47), हार्दिक पंडय़ा (11 चेंडूत नाबाद 30) यांची फटकेबाजी व जसप्रित बुमराहच्या (2-18) भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा 48 धावांनी धुव्वा उडवला. मुंबईने 4 बाद 191 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात पंजाबने 8 बाद 143 धावा केल्या.

विजयासाठी 192 धावांचे खडतर आव्हान असताना निकोलस पूरणनेच थोडाफार प्रतिकार दाखवला. त्याने 27 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 44 धावांचे योगदान दिले. कर्णधार केएल राहुल (17), मयांक (25), करुण नायर (0), मॅक्सवेल (11) यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांनी सपशेल निराशा केल्यानंतर पंजाबचा मोठा पराभव होणार, हे जवळपास निश्चित होते.

कर्णधार रोहित शर्माने फॉर्म कायम राखताना तडफदार फलंदाजी साकारली. सीमारेषेपार उत्तूंग फटकेबाजी करत त्याने पंजाबच्या गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. वास्तविक, रोहितला मैदानी पंचानी एकदा पायचीत दिले होते. पण, रोहितने त्यावर डीआरएस घेतला आणि चेंडू यष्टीला लागत नसल्याचे रिप्लेत स्पष्ट झाल्यानंतर पंचांना हा निर्णय फिरवावा लागला. रोहितने या डावादरम्यान आयपीएल इतिहासात 5 हजार धावांचा टप्पाही सर केला.

प्रारंभी सलामीवीर क्विन्टॉन डी कॉक खाते उघडण्यापूर्वीच बाद झाल्याने मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला होता. कॉट्रेलने पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर डी कॉकचा त्रिफळा उडवला. मिडल व लेग स्टम्पच्या टप्प्यावर पडलेला चेंडू उशिराने किंचीत स्विंग झाला आणि कॉकचा अंदाज येथे सपशेल चुकला.

रोहित व सुर्यकुमार यांच्यात एकेरी धाव घेण्यात गफलत झाली आणि यावेळी सुर्यकुमार यादव धावचीत झाला. शमीने दुखऱया खांद्याने शॉर्ट फाईन लेगवरुन यष्टीचा वेध घेतला, ते निर्णायक ठरले. मागील सामन्यात 58 चेंडूतच 99 धावांची आतषबाजी करणाऱया इशान किशनने येथेही बहारदार फटकेबाजीला सुरुवात केली होती. पण, काही आश्वासक फटकेबाजी केल्यानंतर तो कृष्णप्पा गौतमच्या गोलंदाजीवर नायरकडे झेल देत बाद झाला. किशनचा स्लॉग स्वीपचा फटका चुकल्यानंतर डीप मिडविकेटवरील नायरने सोपा झेल टिपला. दुसऱया बाजूने रोहित शर्माची फटकेबाजी सुरुच राहिली. विशेषतः अर्धशतक साजरे केल्यानंतर त्याने जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्यावर अधिक भर दिला. रोहितच्या 70 धावांच्या खेळीत 8 चौकार व 3 उत्तूंग षटकारांचा समावेश राहिला.

डावातील अंतिम टप्प्यात केरॉन पोलार्ड व हार्दिक पंडय़ाची फटकेबाजी विशेष लक्षवेधी ठरली. एकीकडे, केरॉन पोलार्डने 20 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह 47 जलद धावा उभारल्या तर हार्दिक पंडय़ाने देखील 11 चेंडूत नाबाद 30 धावा फटकावत फलंदाजीतील आपली उपयुक्तता नव्याने सिद्ध केली. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 23 चेंडूत 67 धावांची अभेद्य भागीदारी साकारली होती.  पंजाबतर्फे गोलंदाजीच्या आघाडीवर कॉट्रेल, शमी व के. गौतम यांनाच प्रत्येकी एक गडी बाद करता आला.

Related Stories

गोलंदाजांच्या हाराकिरीनंतर हार्दिक पंडय़ाची झुंज निष्फळ

Patil_p

टी-20 मानांकनात कोहली पुन्हा अव्वल पाचमध्ये

Patil_p

ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू ग्रीम वॅटसन कालवश

Patil_p

थिएम, क्विटोव्हा, गॉफ, वावरिंका दुसऱया फेरीत

Patil_p

ऍडलेड स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची बार्टी विजेती

Patil_p

‘सिलेक्टर्स’ निवडीसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले

Patil_p
error: Content is protected !!