तरुण भारत

राजस्थान-बेंगळूर संघांची आज ‘रॉयल’ लढत

दुपारच्या सत्रात होणारा मोसमातील पहिला सामना

वृत्तसंस्था/ अबु धाबी

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांत शनिवारी ‘रॉयल’ लढत होणार असून दवापेक्षा येथे असणारा प्रचंड उष्मा दोन्ही संघांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. दुपारच्या सत्रात होणारा या मोसमातील हा पहिला सामना असून त्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 पासून होणार आहे.

या स्पर्धेतील सामने तीन ठिकाणी खेळविण्यात येत असून शारजा हे यातील सर्वात लहान मैदान आहे. शारजामध्ये पहिले दोन सामने खेळल्यानंतर दुबईत झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सचे धोरण सपशेल चुकले होते. आता येथील मैदान मोठे असल्याने दुबईमध्ये खेळण्याच्या अनुभवाचा त्यांना निर्णय घेताना उपयोग होणार आहे. आरसीबीचा देखील शेख झायेद स्टेडियमवरील हा पहिलाच सामना आहे. शारजामध्ये सातत्याने फटकेबाजी केलेल्या राजस्थान रॉयल्सला बुधवारी केकेआरविरुद्ध 175 धावांचा पाठलाग करताना फटकेबाजीतील सातत्य त्यांना दाखविता आले नाही. विदेशी खेळाडूंसह त्यांनी आपला संघ निश्चित केलेला असल्याने केवळ अंकित राजपूत हा एकमेव बदल केला जाऊ शकतो आणि त्याच्या जागी वरुण ऍरोनला पहिल्यांदा संधी मिळू शकते.

बटलर संघात परतल्यानंतर राजस्थानने युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला संघाबाहेर ठेवले आहे. पण त्याचा अंतिम संघात समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आघाडीचे तीन फलंदाज चांगली कामगिरी करीत असल्याने त्याची निवड झाल्यास त्याला मधल्या फळीत खेळावे लागू शकते. दोन्ही संघांनी तीनपैकी दोन सामने जिंकलेले आहेत. आरसीबीने आश्वासक सुरुवात केली होती. पण त्यांना क्षेत्ररक्षण आणि डेथ बॉलिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. नवदीप सैनीने सुपरओव्हरमध्ये अप्रतिम मारा करीत संघाला मुंबईवर विजय मिळवून दिला होता. पण आरसीबीने शेवटच्या 4 षटकांत तब्बल 79 धावा दिल्याने सामना टाय झाला होता.

आरसीबीने मागील सामन्यात उदाना, झाम्पा, गुरकीरत मान असे तीन बदल केले होते. त्यांना आणखी एक संधी देण्याचा ते विचार करतील. ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरला मुंबईविरुद्ध पहिला गोलंदाजी देण्याची चाल यशस्वी ठरली होती. या सामन्यात 400 हून अधिक धावांची बरसात झाली असली तरी त्याने 4 षटकांत केवळ 12 धावा देत एक बळी मिळविला होता. डीव्हिलियर्सला लय सापडली असून शिवम दुबे अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी करू शकतो, हे दिसून आल्याने व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे. कर्णधार कोहलीने मात्र अद्याप भरीव योगदान दिलेले नाही. त्याची कसर शनिवारी तो भरून काढतो का, हे पहावे लागेल.

संघ : राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), बटलर, स्टोक्स, सॅमसन, टाय, कार्तिक त्यागी, अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवातिया, जयदेव उनादकट, मयांक मार्कंडे, महिपाल लोमरोर, ओशेन थॉमस, रियान पराग, जैस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, मिलर, मनन व्होरा, शशांक सिंग, वरुण ऍरोन, टॉम करण, उथप्पा, अनिरुद्ध जोशी, आर्चर.

आरसीबी : कोहली (कर्णधार), डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, यजुवेंद्र चहल, नवदीप सैनी, स्टीन, पवन नेगी, उदाना, दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंग, मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, ऍडम झाम्पा.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Related Stories

पाक संघामध्ये शार्जिल खानचा समावेश

Patil_p

कोरोनाग्रस्तांसाठी बुद्धिबळपटूंकडून निधी

Patil_p

हॅलेप- मर्टन्स यांच्यात अंतिम लढत

Patil_p

पाकच्या टी-20 संघात झाहिद मेहमूदचा समावेश

Patil_p

जोकोव्हिचचे वर्षअखेरचे अग्रस्थान निश्चित

Patil_p

रियल माद्रीदकडे स्पॅनीश सुपर चषक

Patil_p
error: Content is protected !!