तरुण भारत

प्रख्यात विचारवंत पुष्पा भावे यांचे निधन

प्रतिनिधी/ मुंबई

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, प्रख्यात विचारवंत आणि विद्यार्थ्यांच्या लाडक्या प्राध्यापिका पुष्पा भावे यांचे शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. शनिवारी सकाळी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठीचे प्राध्यापक आणि प्रसिद्ध निवेदक अनंत भावे हे त्यांचे पती होत.

Advertisements

मराठी आणि संस्कृत विषयात त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एमएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सिडनहॅम महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय,  डहाणूकर आणि चिनॉय महाविद्यालात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. विद्यार्थीदशेपासून राष्ट्र सेवा दलाशी त्या जोडल्या होत्या. लोकशाहीवादी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. गोवामुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात त्यांनी सहभाग घेतला होता. सर्वसामान्यांचे सर्वच स्तरांवर होणारे शोषण रोखण्यासाठी पुष्पा भावे यांनी वेळोवेळी आवाज उठवला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महागाई मोठय़ा प्रमाणात वाढली होती. त्यावेळी झालेल्या आंदोलनात अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासोबत त्या लाटणे मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला पुष्पा भावे यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. स्त्राrवादी चळवळीला पुष्पा भावे यांनी पाठींबा दिला. खासकरून दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये त्यांनी संघटनाचे कार्य केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्येही त्या सहभागी होत्या.

दलित पँथर, देवदासी मुक्ती चळवळीतही त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली होती. स्पष्ट वैचारिक मते, समानता, लोकशाही यांचा पुरस्कार, प्रभावी वक्तृत्व आणि त्याला ठाम कृतीची जोड हे पुष्पा भावे यांचे वैशिष्टय़ होते. नाटय़समीक्षक, लेखिका हीसुद्धा त्यांची ओळख आहे. अध्यापन क्षेत्रातील त्यांचे कार्य मोलाचे आहे. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत रिक्षावाले, कागद वेचणारे कष्टकरी, हमाल यांच्या आंदोलनांमध्येही त्यांनी सहभाग घेतला. सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱया सामाजिक कृतज्ञता निधी या उपक्रमाचा त्यांनी पुरस्कार केला.

विजय तेंडुलकर, विजया मेहता, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यांना पुष्पा भावेंनी केलेल्या नाटय़समीक्षणाची उत्सुकता असायची. रूईया महाविद्यालयातून त्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या. पण त्यानंतरही त्यांनी आपले सामाजिक कार्य अविरतपणे सुरु ठेवले. 2013 साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास पुष्पा भावेंनी कडाडून विरोध केला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांचा अपमान केला हे त्यामागचे मुख्य कारण होते. ‘गुड मुस्लिम, बॅड मुस्लिम’ या महमूद ममदानी लिखीत गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा पुष्पा भावेंनी मराठी अनुवाद केला होता. ‘आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू,’ ‘रंग नाटकाचे’ अशा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.

त्यांच्या या अफाट कार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार, अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, राजर्षी शाहू पुरस्कार, मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

Related Stories

शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते आहे, हे जगाला ठाऊक- अतुल भातखळकर

triratna

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची भर

triratna

राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

triratna

नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री

triratna

‘#मोदी मतलब महंगाई’ म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून वाढत्या महागाईचा निषेध

triratna

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सांगली दौऱ्यावर ; भिलवडीत दाखल

triratna
error: Content is protected !!