तरुण भारत

मंडोळी-हंगरगा रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनधारकांना अपघाताचा धोका : दुरुस्तीकडे पाच वर्षापासून दुर्लक्ष : ग्रामस्थांचा संताप अनावर

वार्ताहर/ किणये

Advertisements

मंडोळी-हंगरगा मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. गेल्या पाच-सहा वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. लोकप्रतिनिधींना वारंवार सांगूनही रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरले व मंडोळी रस्त्यावर सोमवारी सकाळी रास्ता रोको केला.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहे. अनेकवेळा सांगूनही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिक व वाहनधारकांना थेट रस्त्यावर उतरावे लागले.

खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. यामुळे सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी दलित संघटनेने अधिक पुढाकार घेतला होता. या मोर्चात मंडोळी व हंगरगा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

ता. पं. अधिकाऱयाला घेराव

मल्लिकार्जुन कलादगी या तालुका पंचायत अधिकाऱयाला ग्रामस्थांनी घेराव घालून सध्याची रस्त्याची परिस्थिती सांगितली आणि ते अधिकारी या रस्त्यावरून आल्यामुळे त्यांनाही खड्डय़ांचे व चिखलाचे बऱयापैकी दर्शन झाल्यामुळे आंदोलनस्थळी अधिकाऱयांनी नमते घेतले होते.

खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारक वैतागून गेले आहेत. अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. यावर उपाय काय सांगा, असा सवाल उपस्थित ग्रामस्थांनी सदर तालुका पंचायत अधिकाऱयाला विचारल्यानंतर त्यांची जणू बोलतीच बंद झाली होती.

आश्वासनानंतर आंदोलन मागे

रास्ता रोको करू नका, रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल सविस्तर चर्चा करू, याबद्दल ग्राम पंचायतीच्या कार्यालयात जाऊन बोलूया, असे मल्लिकार्जुन कलादगी यांनी सांगितल्यावर संतप्त वाहनधारक व नागरिक ग्राम पंचायत कार्यालयाकडे गेले.

ग्राम पंचायतीमध्ये सर्वांची चर्चा झाली. यावेळी पीडब्ल्यूडी अभियंत्यांनाही बोलावून घेण्यात आले होते. येत्या आठ दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करू, असे आश्वासन प्रशासनाच्या अधिकाऱयांनी दिल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आंदोलन माघारी घेतले.

रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी भीम ब्रिगेड संघ मंडोळी व ग्रामस्थ यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी संतोष तळवार, ग्राम पंचायत माजी अध्यक्ष मारुती दळवी, शट्टू साळवी, पिराजी पाटील, के. के. साळवी, कृष्णा बेळगावकर, कृष्णा हुंदरे, दिलीप कांबळे, विनायक दळवी, सचिन दळवी, मल्लिकार्जुन कट्टीमनी, जयवंत कट्टीमनी, कृष्णा पाटील, उमेश पाटील, कृष्णा शट्टू पाटील, दीपक कंग्राळकर, मंगेश दळवी, बसवंत कणबरकर, बाबू पाटील, निंगाणी पाटील, तानाजी गडकरी, वामन कणबरकर, आदींसह मंडोळी व हंगरगे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

रास्ता रोकोमुळे वाहनांच्या रांगा

रास्ता रोको केल्यामुळे वाहनधारकांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी रस्त्याच्या ठिकाणी हजर झाले. मात्र, त्यांची गाडीही खड्डय़ातून पार झाली नाही व संतप्त ग्रामस्थांचा आक्रोश पाहून या तालुका पंचायत अधिकाऱयालाही काय बोलावे, हे सूचेनासे झाले होते.

Related Stories

रिंगरोडसाठी पुन्हा नोटिफिकेशन केले तरी विरोध कायम

Omkar B

चुकीच्या पद्धतीच्या गतिरोधकांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ

Amit Kulkarni

ग्राम पंचायत निवडणूक, क्लब रोडवर वाहतूक बंदी

Patil_p

जिल्हय़ातील सक्रिय रुग्णसंख्येत किंचित वाढ

Amit Kulkarni

मराठी भाषा-संस्कृतीच्या अस्मितेसाठी लोक लढा गरजेचा

Patil_p

जीएसएस पीयु कॉलेज विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!