तरुण भारत

दमदाटी करुन व्यापाऱयाला मागितली खंडणी

वडुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

प्रतिनिधी/ वडूज

Advertisements

अन्न भेसळ प्रतिबंध विभाग, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी आहे असे भासवून खटाव तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यापाऱयास दमदाटी करुन खंडणी मागितल्याप्रकरणी मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी अतुल बापूराव पवार (रा. उंबर्डे ता. खटाव), चंदा मोहिते, आनंद रणपिसे (दोघे रा. पुणे) यांच्यासह अनोळखी काही संशयितांच्या विरोधात वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदारांचा खटाव तालुक्यात व्यवसाय असून, दि. 14 मे 2017 रोजी संशयित त्यांच्याकडील स्विफ्ट कार व अन्य दोन गाडय़ांसह तक्रारदाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गेले होते. त्यानंतर संशयितांनी त्याठिकाणी असलेल्या कामगारांना तसेच तक्रारदाराच्या भावाला मारहाण करून त्यांच्यावर दहशत निर्माण केली. त्यावेळी तक्रारदाराच्या भावाने घाबरलेल्या अवस्थेत तक्रारदार यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तक्रारदार त्यांच्यासोबत काही लोकांना घेऊन ते घटनास्थळी पोहचले. त्यावेळी बाहेर उभा असलेल्या एका कारमध्ये अतुल पवार व अजून एकजण काहीतरी बोलत बसले होते. तर बाकीचे संशयित त्यांनी आणलेल्या पिकअप गाडीतील काही भेसळीच्या वस्तू त्याठिकाणी टाकून त्याचे चित्रीकरण करत होते.

तक्रारदारांनी याबाबत संशयितांना विचारणा केली असता, आम्ही अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, आयकर विभाग पुणे येथील अधिकारी असून अतुल पवार याने केलेल्या तक्रारीनुसार आम्ही माहिती घेण्यासाठी आल्याचे सांगितले. तसेच आता केलेले व्हिडिओ शुटींग आम्ही मिडीयाला दाखवून तुझी बदनामी तर करूच पण कारवाईसुध्दा करू, असा दम दिला. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने मला विनाकारण का त्रास देत आहे, माझी बदनामी करून तुला काय मिळणार अशी विनवणी अतुल पवार याला केली.

दरम्यान, इतर दोन संशयितांनी तक्रारदाराला पाठीमागून घट्ट पकडून एकाने तक्रारदाराच्या कानशीलात लगावून मुद्याचे बोल असे सुनावले. त्यानंतर अतुल पवार, चंदा मोहिते व रणपिसे यांनी तक्रारदाराला एक कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, इतके पैसे माझ्याकडे नाहीत असे तक्रारदाराने सांगितल्यानंतर तिघे जरा लांब जाऊन आपआपसात चर्चा करू लागले. काहीवेळाने तक्रारदाराकडे आले व तुझ्याकडे किती पैसे आहेत अशी विचारणा केली असता, तक्रारदाराने अकरा लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यावर संशयितांनी अकरा लाख रुपये रोख व तक्रारदार यांच्या स्टेट बँक वडूज शाखेचा एक धनादेश जबरदस्तीने तक्रारदाराची सही घेऊन नेला. तसेच याबाबत कोणाला काही बोलला तर आम्ही हे शुटींग व्हायरल करून बदनामी करू असा दम दिला.

त्यानंतर अतुल पवार 2017 व 2018 या दोन्ही वर्षी तक्रारदाराकडून व्हिडीओ शूटिंग व्हायरल न करण्याची भीती दाखवून प्रतिवर्षी पाच लाख रुपये प्रमाणे खंडणी घेऊन जात होता. मात्र, चालू वर्षी मे महिन्यात अतुल पवार याने तक्रारदाराला पैशाची मागणी करण्यास सुरूवात केली. मात्र, कोरोनामुळे धंदा कमी असल्याने यंदा पैसे देणे शक्य होणार नसल्याचे सांगताच अतुल पवार याने ‘तू कसा धंदा करतोस तेच बघतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर पवार काम करत असलेल्या एका यूटय़ूब चॅनेलवर तक्रारदाराशी संबंधित बातमी प्रकाशीत करून ती सर्वत्र व्हायरल केल्यानंतर पुन्हा तक्रारदार व पवार यांच्यात वडूज येथे भेट झाल्यावर पैसे दिले नाहीत तर धंदा करणे अवघड होईल अशी धमकी पवार याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर या करत आहेत.

Related Stories

नागपूरमध्ये 15 ते 21 मार्च संपूर्ण लॉकडाऊन

pradnya p

पालिकेच्या सभापती निवडी बिनविरोध

Patil_p

शिवसेना आक्रमक : कन्नडिगांचे व्यवसाय बंद पाडणार

Amit Kulkarni

साताऱयात कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दोघांना अटक

Omkar B

1 जूनपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन! ठाकरे सरकारकडून नवीन नियमावली जारी

pradnya p

कोल्हापूर : पेठ वडगावात भाजीपाला विक्रेत्यावर गुन्हा दाखल

Shankar_P
error: Content is protected !!