तरुण भारत

होय शिवराय बेळगावला आले होतेच…

महाराजांच्या बेळगाव स्वारीची कागदपत्रे उजेडात, उपलब्ध ढळढळीत पुरावा

सन 1673 मध्ये केली होती स्वारी, ‘बेळगावात गडबड केली’ अशी नोंद

Advertisements

मानसिंगराव कुमठेकर/ मिरज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय प्रत्यक्षात बेळगावला आले होते की नाही? याबद्दल संशोधकांत मतभिन्नता होती. मात्र आता महाराजांच्या बेळगाव भेटीचा ढळढळीत पुरावाच हाती आला आहे. हा पुरावा शिवप्रेमींसाठी नक्कीच उपयुक्त आणि माहितीपूर्ण ठरणार आहे. शिवरायांबद्दलचा जिव्हाळा आणि आदर बाळगणाऱया बेळगावकरांसाठी महाराजांचा पदस्पर्श झाल्याचा पुरावा प्रेरणादायी ठरणार आहे.

छत्रपती शिवरायांनी सन 1673 च्या सुमारास बेळगावकर स्वारी केल्याचा उल्लेख असलेला ऐतिहासिक कागद उजेडात आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना हा कागद मिळाला आहे. 1674 साली बेळगावमध्ये शेरखान मशिदीच्या हक्का संदर्भात झालेल्या महजरामध्ये या स्वारीचा उल्लेख ‘शिवाजीची गडबड’ असा केला आहे. बेळगावच्या इतिहासाच्या दृष्टिने हा अतिशय महत्वपूर्ण असा उल्लेख आहे.

बेळगाव शहर हे ऐतिहासिक महत्व प्राप्त करुन आहे. रट्ट, कदंब या राजवटींसह विजयनगरच्या सम्राटांनी या परिसरावर राज्य केले आहे. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा पाडाव केल्यानंतर काही वर्षांनी या परिसरावर बहमनी सुलतानांची सत्ता प्रस्तापित झाली. 1518 नंतर या परिसरावर विजापूरच्या आदिलशाहीची राजवट सुरु झाली. आदिलशाही राजवटीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने बऱयाचदा बेळगाव परिसरावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र या भागात विजापूरचे प्रबळ सरदार असल्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी होत होता. प्रत्यक्ष शिवाजी महाराज बेळगावात येवून गेले की नाही याबाबत संशोधकांत मतभिन्नता होती.

मात्र मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर यांना मोडी लिपीतील एक महजर मिळाला आहे. या महजरात शिवाजी महाराजांची गडबड बेळगाववर झाल्याचा उल्लेख आहे. महजर म्हणजे एखाद्या हक्काबाबत निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी गावातील प्रमुख मंडळींना बोलावून त्यांच्यासमोर झालेल्या न्यायनिवाडय़ाचा कागद होय. असाच कागद 30 सप्टेंबर 1674 रोजी बेळगावमध्ये करण्यात आला होता.

बेळगावमधील ऐतिहासिक शेरखान मशिदीला दिलेल्या जमिनीच्या इनामाच्या वादाबाबत बेळगावातील काजी व अन्य प्रमुख मुस्लिम नागरिक यांनी बैठक घेऊन निवडा केला होता. त्याचा महजर तयार करण्यात आला. त्यावर बेळगावमधील लोकांच्या ‘शाईदी’ म्हणजेच साक्षी आहेत. मात्र हा महजर पूर्ण होईतोपर्यंत शिवाजी महाराजांच्या सैन्याने बेळगाव आणि परिसरावर हल्ला केला. त्यामुळे निर्माण झालेल्या युध्दमय वातावरणात काजीचा शिक्का गेला. त्यामुळे या महजरावर मोहर म्हणजे शिक्कामोर्तब होवू शकला नाही.

त्यामुळे पुढे तारीख नऊ रजब सन 1085 हिजरी म्हणजेच 30 सप्टेंबर 1674 रोजी हा महजर अधिकृत करण्यात आला. तसा उल्लेख हा महजर अधिकृत करताना करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘मोहोर सिवाजी याचे गडबड होवून गेला, याजकरिता ताजा मोहोर करुन द्यावे, म्हणून’

सदर महजरात बेळगावचा उल्लेख किले मुस्तफाबाद असा केला आहे. सदर मुळ महजर फार्सी भाषेत असून त्याचा हा मोडीमधील तर्जुमा (भाषांतर) आहे.

शिवरायांच्या बेळगाव स्वारीचा पुरावा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बेळगाववरील हल्ल्याचा हा पुरावा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात कर्नाटक प्रांती स्वारी केली होती. याचवेळी मराठय़ांच्या सैन्याने बेळगाववर हल्ला केला असावा आणि हा मुलुख जिंकून घेतला. या भागातील काही किल्लेही शिवाजी महाराजांनी याच काळात बांधल्याचे दिसतात. यावेळी शिवाजी महाराजांनी कारवार प्रांतापर्यंत धडक मारली होती. सदर महजरातील उल्लेखामुळे शिवाजी महाराजांची गडबड म्हणजे स्वारी बेळगाववर झाल्याचा स्पष्ट पुरावा मिळाला आहे.

बेळगावचे नाव मुस्तफाबाद

बेळगाव या नावाला प्राचीन इतिहास असून वेणुग्राम नावापासून त्याची उत्पत्ती झाल्याचे सांगण्यात येते. मात्र मुघलांनी 1686 मध्ये बेळगाव जिंकल्यानंतर सहजादा महम्मद आझमशहा याच्या नावावरुन बेळगावचे नाव अझमनगर असे ठेवले. मात्र त्यापूर्वी आदिलशाही कालखंडात या शहराचे नाव मुस्तफाबाद असेही होते. याचा पुरावा या कागदात मिळाला आहे. वेणुग्राम, बेळगाव, मुस्तफाबाद, अझमनगर असा या शहराच्या नावाचा प्रवासही मनोरंजक असाच आहे.

Related Stories

नेटकेपणाने पार पडले मंथनचे संमेलन

Amit Kulkarni

‘सुहास आर्केड’चे भूमिपूजन उत्साहात

Patil_p

पंतनगर येथे माजी सैनिकाचे घर फोडले

Patil_p

मनपाने थकविले 86 कोटीचे वीजबिल

Omkar B

शिवजयंती महामंडळातर्फे प्रधानमंत्री रिलीफ फंडाला मदत

Patil_p

कोरोनाविरोधात अधिकारीवर्ग उतरला मैदानात

Amit Kulkarni
error: Content is protected !!