तरुण भारत

फॉर्म गवसलेल्या चेन्नईसमोर कार्तिकच्या नेतृत्वाची कसोटी

आयपीएल : केकेआर संघातील स्टार्स चमकण्याची अपेक्षा

वृत्तसंस्था/ अबु धाबी

Advertisements

टीकेचे लक्ष्य बनलेला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकला संघातील स्टार खेळाडूंकडून होत असलेल्या निष्प्रभ प्रदर्शनावर लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक बनले असून पुन्हा जोम प्राप्त झालेल्या धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध बुधवारी त्यांची आयपीएलमधील पुढील साखळी लढत होणार आहे. सायंकाळी 7.30 पासून हा सामना सुरू होईल.

केकेआरने विश्वचषक विजेता इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. मात्र त्यांनी दिनेश कार्तिकवरच विश्वास दाखवत त्याच्याकडेच नेतृत्व कायम ठेवले. पण त्याचे काही अनाकलनीय निर्णय आणि फलंदाजीतील खराब फॉर्म (4 सामन्यांत 37 धावा) यामुळे त्याच्यावर ‘फायरिंग’ सुरू झाले आहे. मॉर्गन व आंद्रे रसेल यांना मागे टाकत त्याने फलंदाजीत स्वतःला बढती देणे आणि बिग बॅशमध्ये धुमाकूळ घातलेल्या टॉम बॅन्टनऐवजी सुनील नरेनला वारंवार सलामीला पाठविण्याचा निर्णय यामुळे त्याच्या नेतृत्व कौशल्याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. बॅन्टनची तुलना तर इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनशी केली जात आहे. सुनील नरेन सलामीला पूर्णपणे निष्प्रभ ठरला असून त्याने 4 सामन्यात केवळ 27 धावा जमविल्या आहेत, तेही 87.09 च्या स्ट्राईकरेटने. त्यामुळे इंग्लंडचा युवा खेळाडू बॅन्टनला संघात स्थान देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

गोलंदाजीत कार्तिककडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण त्यांना व्यवस्थित हाताळणे त्याला जमत नाही असे दिसू लागले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ही बाब प्रकर्षाने दिसून आली. कमिन्सची कामगिरीही फारशी प्रभावी होत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शारजाचे मैदान फलंदाजांचे नंदनवन असल्याने दोन्ही संघांनी दोनशेचा टप्पा पार केला असला तरी गोलंदाजांनी त्यात खरी चुरस निर्माण केली. मॉर्गन व राहुल त्रिपाठी विजय साकार करतील, असे वाटत होते. पण दिल्लीच्या गोलंदाजांनी अखेरच्या टप्प्यात अप्रतिम मारा करीत केकेआरच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळविल्याने केकेआरला पराभव स्वीकारावा लागला. कार्तिकने गोलंदाजांना विशेषतः स्पिनर कुलदीप यादवला पाठिंबा देण्याची गरज आहे. कार्तिकने त्याचा फार कमी वापर केला असून त्याने फक्त 9 षटके गोलंदाजी केली आहे तर दिल्लीविरुद्ध त्याला संघातून वगळण्यात आले होते.

चेन्नईला मात्र पुन्हा सूर गवसला असून तीन पराभवानंतर धोनीच्या नेतृत्वाखालील संघ तळाच्या स्थानापासून टॉप चारमध्ये स्थान मिळविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात करेल. धोनी आपल्या संघात फारसे बदल करीत नसल्याने त्याने वॅटसनवर पूर्ण भरवसा दाखवला. वॅटसननेही पंजाबविरुद्ध नाबाद 83 धावांची विजयी खेळी करीत त्याचा भरवसा सार्थ ठरविला. वॅटसन व डु प्लेसिस यांनी पंजाबचे 179 धावांचे आव्हान किरकोळ करून टाकताना नाबाद 181 धावांची भागीदारी करून एकतर्फी विजय मिळवून दिला. त्यांची आघाडी फळी अपयशी ठरत असल्याने चेन्नईला चांगली सुरुवात मिळत नव्हती. पण त्यांना आता फॉर्म गवसल्याने केकेआरविरुद्ध तेच फेव्हरिट आहेत, असे म्हणावे लागेल.

संघ : केकेआर : दिनेश कार्तिक (कर्णधार), रसेल, नागरकोटी, कुलदीप, फर्ग्युसन, नितिश राणा, पी. कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरेन, कमिन्स, मॉर्गन, व्ही. चक्रवर्ती, बॅन्टन, त्रिपाठी, ग्रीन, एम.सिद्धार्थ, निखिल नाईक, अली खान.

सीएसके : धोनी (कर्णधार), एम. विजय, रायुडू, डु प्लेसिस, वॅटसन, जाधव, ब्रॅव्हो, जडेजा, एन्गिडी, दीपक चहर, चावला, इम्रान ताहिर, सँटनर, हॅझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, एन.जगदीशन, केएम असिफ, मोनू कुमार, आर.साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Related Stories

ऑलिंपिक चॅम्पियन सॅनेयेव्ह कालवश

Patil_p

ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रव्हिस हेडला कोरोना

Patil_p

निखत झरीन, गौरव सोळंकी उपांत्य फेरीत

Patil_p

कर्णधार विल्यम्सन चौथ्यांदा सर हॅडली पुरस्काराचा मानकरी

Patil_p

सराव सामन्यात बुमराहचे दमदार अर्धशतक

Patil_p

अल्ट्रा रनिंग चॅम्पियनशिप लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!