प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
निरामय विकास केंद्र कोलगावच्या अध्यक्ष डॉ. शालिनी सबनीस (88) यांचे माहीम (मुंबई) येथील निवासस्थानी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी निधन झाले.
पन्नास वर्षांहून अधिक काळ वरळी येथे स्वतःचे वरळी विमेन्स हॉस्पिटल चालवणाऱया स्त्राr रोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ असलेल्या डॉ. सबनीस यांचे मूळ गाव सावंतवाडीनजीकचे कोलगाव. एम. डी. झालेल्या आपल्या मुलीने सावंतवाडी परिसरात वैद्यकीय सेवा द्यावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. म्हणून 50 वर्षांपूर्वी त्यांनी काही काळ सावंतवाडी येथे तसा प्रयत्नही करून पाहिला. पण तो अनुभव तितका समाधानकारक न झाल्याने त्यांनी मुंबईत वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. पण वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील राहिल्या. कोळोशी येथील नारायण आश्रम आयोजित करीत असलेल्या वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ाशी संपर्क सुरू केला. त्याच माध्यमातून त्यांची सावंतवाडी येथील स्टेट बँक कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबेळकर यांच्याशी ओळख झाली आणि 2003 पासून त्यांनी कोलगाव येथे कामाला सुरुवात केली. सुरुवातीला कोलगाव हायस्कूलच्या परिसरात त्यांनी एक छोटी इमारत स्वखर्चाने बांधून तिथे गरजू महिलांसाठी मोफत वैद्यकीय सेवा सुरू केली. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमासाठी त्या मुंबईतील व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून दर महिन्यातील एका शनिवार-रविवारी त्या कोलगाव येथे येत.
पुढील काळात त्या व सबनीस परिवाराने एकत्र येऊन जाधववाडी कोलगाव येथे जागा खरेदी करून निरामय भवन ही प्रशस्त वास्तू उभी केली. 2007 पासून या वास्तूतून महिला व मुलांच्या आरोग्य व शिक्षणासाठीचे विविध उपक्रम सुरू झाले. कोलगाव हायस्कूल परिसरातील जागेतही निरामयचे काम सुरू राहिलेच. निरामय भवन येथे आठवडय़ातून सहा दिवस रोज सकाळी दोन तास वैद्यकीय तपासणी, सल्ला व औषधे मोफत दिली जातात. या सेवेचा लाभ जाधववाडी परिसरातील अनेक गरजू कुटुंबे सातत्याने घेत आहेत.
ग्रामीण भागातील दहावीच्या परीक्षेला बसलेल्या मुली-मुलांसाठी जीवन शिक्षण कौशल्य विकास या चार आठवडय़ांच्या निवासी शिबिराचे गेली दहा वर्षे आयोजन केले जाते. निरामयच्या शिक्षण निधीतून गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना बिनव्याजी शैक्षणिक मदत केली जाते. या निधीचा लाभ घेणारे काही विद्यार्थी-विद्यार्थिनी डॉक्टर, इंजिनिअर, परिचारिका, फार्मासिस्ट, मानसोपचार तज्ञ होऊन स्वावलंबी झाले आहेत, तर अनेक लाभार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. कुठलीही सरकारी मदत न घेता निरामय विकास केंद्राच्या विविध समाजोपयोगी कामांसाठीच्या निधीचा बहुतांश हिस्सा डॉ. सबनीस यांच्या स्व-मिळकतीतून येतो. त्यांच्या परिवारातील अनेकजण व देणगीदार डॉ. शालिनी सबनीस यांच्याबद्दल असलेल्या आदर व प्रेमापोटी या निधीत यथाशक्ती भर घालतात.
डॉ. सबनीस यांनी आपल्या मृत्यूपश्चात निरामय केंद्राचे काम व्यवस्थित सुरू राहावे, यासाठीही निधीची पुरेशी तरतूद केली आहे. हे काम असेच पुढे जोमाने सुरू राहणे, हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना संस्थेच्या उपाध्यक्ष सुधाताई सबनीस यांनी व्यक्त केली आहे. निरामय भवन येथे डॉ. शालिनी यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. वंदना करंबेळकर, अर्चना वझे, विनया बाड, डॉ. वैशाली, भरत गावडे, प्रसाद घाणेकर हे विश्वस्त, निरामयच्या व्यवस्थापक ऍड. सुषमा धुरी, राऊत काकी, शिवणकाम करणाऱया रुचिता, कोलगाव ग्रामपंचायत सदस्य पप्पू ठिकार, भगिरथ ग्रामविकास प्रति÷ानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर आणि वेदपाठ शाळेचे अध्यक्ष पुराणिक या साऱयांनी डॉक्टर मॅडमच्या आठवणी जागवल्या.