नव्या अध्ययन अहवालात दावा : गोंधळाला सामोरे जाताहेत कोरोनाबाधित
फुफ्फुसांना प्रभावित करणारा कोरोना विषाणू आता रुग्णांच्या मेंदूवरही गंभीर प्रभाव पाडत आहे. अलिकडेच झालेल्या एका अध्ययनात रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक रुग्णांच्या मानसिक स्तरात बदल दिसून आले आहेत. रुग्ण गोंधळ आणि प्रतिसाद न देण्यासारख्या समस्यांना तोंड देत आहेत. वैद्यकीय भाषेत या समस्येला एंसेफेलोपॅथी म्हटले जाते.
एनाल्स ऑफ क्लीनिकल अँड ट्रान्सलेशन न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित अध्ययनात 5 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान शिकागोच्या नॉर्थ वेस्टर्न मेडिसीन हेल्थ सिस्टीममध्ये दाखल झालेल्या 509 कोरोनाबाधितांच्या नोंदीची तपासणी करण्यात आली होती. अध्ययनात सामील आणि एंसेफेलोपॅथीला तोंड देणाऱया 162 रुग्णांमध्ये वृद्ध आणि पुरुषांचे प्रमाण अधिक होते. याचबरोबर या सर्वांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, कर्करोग, सेरेब्रोवैस्क्युलर डिसिज, क्रोनिक किडनी आजार, मधूमेह, हाय कोलेस्ट्रॉल, हृदयविकार यांच्यासह अनेक आरोग्य विषयक समस्या होण्याची शक्यता अधिक होती.
जोखीम अधिक
रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यावर मानसिक त्रासाला तोंड देणारे केवळ 32 टक्के रुग्णच स्वतःची दैनंदिन कामे सहजपणे करू शकत होते. याउलट 89 टक्के सामान्य रुग्ण कुठल्याही मदतीशिवाय स्वतःची कामे पूर्ण करू शकत होते. सामान्य रुग्णांच्या तुलनेत एंसेफेलोपॅथीला तोंड देणाऱया रुग्णांमध्ये मृत्यूची शक्यता जवळपास 7 पट वाढते. एंसेफेलोपॅथीमध्ये व्यक्तीला लक्ष न देता येणे, शॉर्ट टर्म मेमरी या समस्यांना सामोरे जावे लागते. संशोधक एंसेफेलोपॅथीच्या कारणांचा शोध घेऊ शकलेले नाहीत असे डॉक्टर आयगोर कोराल्निक यांनी म्हटले आहे.
हा आजार अन्य रोगांसोबतही होऊ शकतो. रक्तप्रवाहावर प्रभाव आणि सूजसमवेत अनेक कारणांमुळे वाढू शकतो. विषाणू थेटपणे मेंदूच्या पेशीवर आक्रमण करतो याचे खूपच कमी पुरावे आहेत. न्यूरोलॉजिकल प्रभाव बहुधा इम्यून सिस्टीमची प्रतिक्रिया आणि सूजमुळे होत असेल असे बहुतांश तज्ञांचे म्हणणे आहे.
तरुणांमध्ये लक्षणे
न्यूरोलॉजिकल लक्षणे पाहिल्यास सुमारे 45 टक्के रुग्णांमध्ये मांसपेशींमध्ये वेदना, 38 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखी, सुमारे 30 टक्के रुग्णांमध्ये चक्कर येण्याची समस्या दिसून आली आहे. तर चव आणि गंधक्षमता गायब होणाऱया रुग्णांची संख्या कमी होती. अध्ययनानुसार एंसेफेलोपॅथीसह तरुणांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे असण्याची शक्यता अधिक होती.