तरुण भारत

सांझ ढले…

संध्याकाळची वेळ होती. सूर्यास्त होत होता. आणि ‘तिन्हीसांजा सखे मिळाल्या’ हे गाणे लागले होते. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याला संगीत लाभले आहे ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे. आणि मुळात इतके किचकट बिकट म्हणावे असे जुन्या शिल्पकृतीची आठवण करून देणारे शब्द असलेले हे गीत प्रसवले आहे ते भा.रा. तांबे यांच्या लेखणीतून. गीत संगीत आणि स्वर या तिन्ही बाबतीत देवलोकातूनच आले की काय असे वाटायला लावणारे हे गाणे सायंकालीन‌ रागावरच आधारित आहे. त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी ते ऐकले तरीही सायंकाळ झाल्याचा भास होतो. पूर्वापारच्या प्रथेप्रमाणे आपले संगीत हे समयसूचनही करीत असते असे म्हणतात. त्या हिशेबाने ज्या त्या वेळेला किंवा विशिष्ट ऋतूसमयाला दर्शविणारे राग भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये आहेत. आणि ते राग त्या त्या वेळेनुसार मांडलेही‌ जातात. त्यातील संधिकालीन राग हा विषय मोठाच रोचक असतो असे म्हणावे लागेल. मग ते पहाटेचे असोत वा सूर्यास्ताच्या वेळेतले. अधांतरी तरंगत असलेली ही संध्याकाळची वेळ जेव्हा सरत्या संधिप्रकाशात विरघळत जात नाहीशी होते तेव्हा मानवी मनातही खूप मोठी पोकळी निर्माण होते. कदाचित त्यामुळेच ऐन तिन्हीसांजेला ‘शुभंकरोती म्हणा’ पासून सुरुवात करून देवाची स्तुतिस्तोत्रे गायिली जातात. संधिकालीन असलेल्या रागांमध्ये ही मानवी मनाची अस्वस्थता अचूक पकडली जाते. मनाची आंदोलित अवस्था इथे ‘सा’ च्या अल्पत्त्वातून, पंचमाच्या अभावातून आणि रिषभाच्या कातरतेतून अनुभवायला मिळते. दिवसभराची सगळी कामे, सगळी धमाल उरकल्यावर त्याचा आढावा घेत असलेले मन, त्या शांत क्षणी केले जाणारे निरीक्षण, त्यातून आलेली अस्वस्थता किंवा अनुभवाने आलेली स्तब्धता या गोष्टीचा संगीत या विषयात एवढा ऊहापोह का बरे केला जात असावा? इतक्मया प्रचंड प्रमाणात असलेली सिनेसंगीत, भावसंगीत, शास्त्रीय संगीत यातली वेगवेगळी गाणी पाहिल्यावर काय वाटते आपल्याला? या सायंकाळचे एवढे का आकर्षण असते संगीतसृष्टीतल्या लोकांना? किंवा भर सायंकाळच्या सुमारास नियमाने रेडिओ, टीव्ही, यू टय़ूबवरून गाणी ऐकणाऱया सगळय़ा आम जनतेला तरी त्याचवेळी गाणे ऐकण्याची एवढी जबर इच्छा का निर्माण होत असावी? संध्या आणि संगीत यातले नक्की नाते तरी काय? खूप वर्षांपूर्वी सहय़ाद्री वाहिनीवर संध्याकाळी चार वा. एक मालिका लागायची. ‘महाश्वेता’ नावाची. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते अशा अप्रतिम गीताने सुरू होणाऱया त्या मालिकेपेक्षा ते‌ शीर्षकगीतच वरचढ ठरायचे. लताबाईंच्या एकेका स्वरासरशी झरझर उतरत जाणारी संध्याकाळची ती कलती उन्हे डोळय़ांवरून हात फिरवत थेट मनात कवडसे पाडत जायची. काय लाजवाब गाणे होते ते! ‘मन सैरभैर होई’ हे असेच आणखी एका मालिकेचे शीर्षकगीत! सुरेश वाडकरांनी गायिलेले. या गाण्यातही अशीच समुद्रकिनारची संध्याकाळची वेळ दाखवली आहे. खरोखर पडत जाणारा अंधार आणि आयुष्यातला संकटांचा अंधार यांचे रूपक बेमालूम जमवले आहे ते त्यातल्या दृश्याने!  श्वासही जीवघेणे जगणंही भासे व्यर्थ या ओळींवर लाटेबरोबर अभावितपणे पाण्याबाहेर पडल्यामुळे तडफडणारा मासा दाखवला आहे. संध्याकाळचे भयाकुल करणारे हे रूप गाण्यासह अनुभवताना आपलाही श्वास गुदमरू लागतो जणु. आणि हेच त्या गाण्याचे यश म्हणावे लागेल.

 पण सांजेचे दरवेळी हेच रूप बघायला मिळेल असे काही नाही. सांजवेळ ही आपण दोघे, अवघे संशय घेण्याजोगे, चंद्र निघे बघ झाडामागे ही कातरवेळ भलतेच काही घेऊन येते आपल्यासमोर. तिथे कान्हा आणि राधा यांचा रंगात आलेला खेळ संयत शब्दात आणि लडिवाळ स्वरात दिसला आहे. पण संशयाचा काळेपणा मात्र डोकावतोच! सुरेश वाडकरांच्याच स्वरातले एक अतिशय गाजलेले आणखी एक गीत म्हणजे सांझ ढले. ‘उत्सव’ सिनेमातील या गीताचे बोल लिहिले आहेत मराठी भाषिक हिंदी कवी प्रा. वसंत देव यांनी. सांझ ढले और गगन तले, हम कितने एकाकी, छोड चले नयनों को किरणों के पाखी….या गाण्यातले स्वर आणि एकूणच माहोल आपल्या अक्षरशः अंगावर येतो. जगाच्या पाठीवर अवती भवती वेगात चाललेल्या रहदारीच्या मधोमध आपण एकटेच ट्रफिक आयलंडवर उभे आहोत भंजाळलेल्या अवस्थेत असे वाटत राहते ऐकताना! यात हम कितने एकाकी मध्ये दर्द तर प्रचंड आहे, पण तो अलिप्तपणे पाहणेही आहे असे वाटते. हे या गाण्याचे वेगळेपण. तर ‘संधिकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा’ हे गंगाधर महाम्बरे यांचे एकदमच वेगळे गतिमान आणि उत्साहवर्धक प्रेमगीत, द्वंद्वगीत! अरुण दाते आणि लताजींनी यात संध्या रंगांची नुसती कारंजी उडविली आहेत. ते संपले तर ते रिवाइंड करणे शक्मय नसेल तर अचानक आयुष्य थांबल्यासारखी हुरहूर आणि रिवाइंड करता येत असेल तर हुरहूर आणि अस्वस्थपणा याचा गुणाकार! ते सूर रेंगाळत राहतातच मनात. जा म्हटल्यास जात नाहीत.

Advertisements

तर सांज गारवा या अल्बममधील ‘एके दिवशी संध्याकाळी’ मध्ये अचानक घरी आलेल्या प्रेयसीच्या भेटीने‌ झालेली मनाची अवस्था चितारली आहे. हेही जलद उडत्या लयीचेच गाणे आहे. मजा आणते. त्याच अल्बममधील दिस नकळत जाई सांज रेंगाळून राही, क्षण एकही न ज्याला तुझी आठवण नाही  हे अरुण दाते यांच्या आवाजातील अतीव करुण विरहगीत मात्र कायमची जखम झालेल्या माणसाचे अंतःकरण दाखवते. किती प्रेमभंग या गाण्याच्या साथीने पार पडले‌ असतील! किती मने आजही हे गाणे ऐकल्यावर हळवी होऊन जात असतील! आपले सगळे काही आलबेल असेल तरीही या गाण्यातल्या अभागी प्रेमवीराविषयी कणव दाटून येते. का हे घडले याच्याच बाबतीत असे ओरडून विचारावेसे वाटते.

सायंकाळला अजरामर करणारी तशी खूप गाणी आहेत. पण जर का ‘सांज ये गोकुळी’ या गाण्याचा उल्लेख केला नाही तर हे सगळे अपुरेच ठरेल. पहाडी भागातली ती सांज, तिचा तो सावळेपणा, सावळय़ा कृष्णाच्या त्या सावलीतली शीतळता हे सगळेच कसे न्यारे आहे ना! सा।़ऊली या शब्दात आशाबाईंचा तो गहिरा, कलता, कोमल स्वर त्या सांजेच्या सावलीची गहिरी गंभीरता, अपार खोली दाखवतो. डोंगरांनी वेढलेल्या छोटय़ाशा गावात उतरत जाणारी ही सांज गाण्यात मात्र चढतच जाते. गोधूली उधळत जाणाऱया गायी असोत वा काजळाच्या दाट रेघेसारखी असणारी पर्वतरांग असो. पण शेवटी अमृताच्या ओंजळी असणारे बासरीचे स्वर गाणे उजळून टाकतात. गजाननराव वाटवे यांचें गगनी उगवला सायंतारा, मंद सुशीतल वाहत वारा हे एक संथ गाणे. ऐकावे आणि मनात घोळवत रहावे असे. तशी असंख्य गाणी नजरेसमोरून सरकत राहतातच. पण त्यातलेच एक म्हणजे झाल्या तिन्हीसांजा करून शिणगार साजा, वाट पहाते मी गं येणार साजण माझा या गाण्याचा बाज अस्सल ग्रामीण! अशी लोकगीतांचा ढंग असणारी सांजगीते तर वेड लावतात. तर सायंकाळी गायल्या जाणाऱया पूरिया रागातले ‘दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया’ सारखे गाणे म्हणजे स्वर आणि शब्दाचे अचूक संध्यामीलनच म्हणावे लागेल. संध्याकाळ या विषयावर लिहिलेली गाणी असंख्य आहेत. त्या सगळय़ांची नुसती आठवण जरी काढायची म्हटली तरी आपल्याला कितीतरी दिवस लागतील. पण जाता जाता सहज म्हणून केलेल्या या आठवणींच्या कोलाजच्या साथीने आपली एक संध्याकाळ सुरेल होऊन जाईल म्हणून हा शब्दप्रपंच!

Related Stories

प्रवासी वाहन विक्री मार्चमध्ये घटली

Patil_p

अंबानी पुन्हा आशियात श्रीमतांमध्ये सर्वोच्च

Patil_p

एअरटेलची प्लॅटिनम ग्राहकांसाठी खास योजना

Patil_p

मुख्य बंदरांमधील मालांच्या उलाढालीत घसरण

Patil_p

आयफोन-12 चे जुलैपासून उत्पादन

Patil_p

भारतामध्ये ओप्पोकडून ई-स्टोअर लाँच

Patil_p
error: Content is protected !!