तरुण भारत

मराठा आरक्षण : लढा अंतिम टप्प्यात, एसईबीसीसाठी आग्रही

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे यांचे मत
एमपीएससीसह अन्य क्षेत्रात करीअरच्या संधी शोधण्याचे समाजातील युवक-युवतींना आवाहन
उद्योजक, गर्भश्रीमंत, निवृत्त अधिकारी, संशोधक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेणे म्हणजे गेल्या 25 वर्षांपासूनचा अंतिम टप्प्यात आलेला लढा व्यर्थ जाण्यासारखा आहे. त्यामुळे एसईबीसीमधूनच आरक्षण मिळविण्यासाठी आग्रही आहे, असे मत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. एमपीएससी परीक्षेतून नोकरीच्या संधी केवळ एक टक्के विद्यार्थ्यांनाच उपलब्ध होतात. अन्य 99 टक्के विद्यार्थ्यांना करीअरसाठी संघर्ष करावा लागत आहे. अन्य क्षेत्रातही करिअरच्या संधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेसह अन्य विविध क्षेत्रात करीअरच्या संधी शोधाव्यात, असे आवाहनही कोंढरे यांनी केले.

राजेंद्र कोंढरे म्हणाले, समाजातील गर्भश्रीमंत आणि सर्वसामान्यांची नाळ तुटली आहे. तरी उद्योजक, निवृत्त अधिकारी, अभियंते, संशोधक यांनी ह्रदयाची संवेदना जागृत करुन सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देत त्यांचे करीअर घडवावे. दहावी-बारावीच्या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत पुढे रोजगार उपलब्ध होत नाही. जो-तो एमपीएससीची तयारी करतो. पण राज्य सरकारकडून परीक्षा वेळोवेळी होत नाहीत. मॅटसह अनुशेष घोटाळे पाहता एमपीएससीला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यी बसतात. मात्र यामधून केवळ एक टक्केच विद्याथ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आरक्षणाची टक्केवारी लावताना अनेक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे भविष्यात संघर्ष होणारच आहे. यासाठी शासनाने पारदर्शकाता आणणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात मनुष्यबळाची जगा यंत्रांणी घेतली आहे. त्यामुळे पुढील काळात नोकरीच्या संधीही कमी प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. शासनाने विविध समाजासाठी महामंडळे, संस्था स्थापन केल्या. यामधून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ दिले जात आहे. त्याचबरोबर आज शासनाने किमान कौशल्य शिक्षण विभाग पूर्ण क्षमतेने सुरु करणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रातही मोठयाप्रमाण नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी कोंढरे यांनी केली.

पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक हर्षल सुर्वे, डॉ. संदीप पाटील, ऍड. गुलाबराव घोरपडे, संजय जाधव, शैलजा भोसले, संजीवनी नलवडे, संयोगिता देसाई, महादेव पाटील, कमलाकर जगदाळे आदी उपस्थित होते.

ईडब्ल्युएसमधून आरक्षण घेण्याची मागणी काही मराठा नेत्यांकडून होत आहे. मात्र सध्या या प्रवर्गातून आरक्षण घेतल्यास पुढे ईएसबीसीच्या आरक्षणात अडचणी निर्माण होवू शकतात. तसेच गेल्या 25 वर्षांपासून सुरु असलेला आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आल्याने ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेणे म्हणजे इतक्या वर्षांचा लढा व्यर्थ जाण्यासारखा आहे. त्यामुळे एसईबीसीमधूनच आरक्षण मिळविण्यासाठी आग्रही असल्याचे कोंढरे यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयांना जागा वाढवून देण्याचा पर्याय
अकरावीसह अन्य शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असल्याने मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण स्थगितीचा फटका बसणार आहे. त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळेल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने महाविद्यालयांना प्रवेशसंख्येमध्ये वाढ करुन द्यावी, अशी मागणीही कोंढरे यांनी केली.

कुणबी दाखल्यातील भ्रष्टाचार थांबवा
ईएसबीसी, ईडब्ल्यूएसमधून आरक्षण मिळत नसल्याने अनेक विद्यार्थी ओबीसीमधून आरक्षण मिळविण्यासाठी कुणबीचा दाखला काढत आहेत. मात्र हा दाखला काढताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. कुणबीचा दाखला देण्याबाबत मोठयाप्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवा अन्यथा समाजाने वेगळे पाऊल उचलल्यास त्याला संपूर्णपणे शासन जबाबदार असेल असा इशारा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.

Related Stories

‘पन्हाळा पुरवठा’ मध्ये भ्रष्टाचाराचे ‘सॅनिटायझेशन’

Abhijeet Shinde

कोल्हापूर :लॉकडाऊनमध्ये भाजीपाला विक्रीवरील बंदी उठवा अन्यथा..

Abhijeet Shinde

राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळ लोकार्पण सोहळा अभूतपूर्व उत्साहात

Abhijeet Shinde

`ऍस्टर फ्री इन’ गोरगरीबांसाठी वरदान ठरेल : ग्रामविकासमंत्री मुश्रीफ

Abhijeet Shinde

अज्ञात चोरट्याकडून नृसिंहवाडी येथील बेकर्समध्ये चोरी

Abhijeet Shinde

रत्नशाळेची धर्मरक्षक राजधानी मावळ्यांनी केली स्वच्छता

Patil_p
error: Content is protected !!