तरुण भारत

बिहारमध्ये पुन्हा येणार रालोआचे सरकार!

भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा दावा : गया येथे प्रचारसभा आयोजित : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाचे गुणगान

वृत्तसंस्था/ गया

Advertisements

बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामांकनानंतर आता प्रचार सुरू झाला आहे. भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी गया येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना बिहारमध्ये पुन्हा एकदा रालोआचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे म्हटले आहे. बिहारमधील विकासकामे सुरूच ठेवणार असल्याचे म्हणत नड्डा यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे कौतुक केले आहे.

जयप्रकाश नारायण यांच्या आशीर्वादाने राजकीय नेते झालेले तसेच तीन-तीनवेळा मुख्यमंत्री झालेले आज काँग्रेसची गळाभेट घेत आहेत असे म्हणत नड्डा यांनी राष्ट्रीय जनता दलाला लक्ष्य केले आहे. आज (रविवार) लोकनायक जयप्रकाश नारायण यांची जयंती आहे. स्वतंत्र भारतात काँग्रेस पक्षापेक्षा वेगळी राजकीय विचारसरणी त्यांचीच होती असे नड्डा म्हणाले.

राजकीय संस्कृती बदलली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी बिहारची राजकीय संस्कृतीच बदलली आहे. पूर्वी जातीच्या आधारावर काँग्रेस पक्ष राजकारण करत होता. तर नरेंद्र मोदींच्या सरकारने प्रगतिपुस्तकाच्या आधारावर जनतेत जाण्याची संस्कृती सुरू केली आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांपर्यंत बिहारमध्ये केवळ 4 वैद्यकीय महाविद्यालये होती. 2014-20 पर्यंत राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली असून 11 महाविद्यालयांचे काम सुरू असल्याचे नड्डा यांनी सांगितले आहे.

बिहार सरकारचे कौतुक

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी कोरोना संकटादरम्यान लोकांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी उत्तम काम केले आहे. लोकांना आर्थिक मदत पोहोचविण्यात आली तसच राज्यात विकासकामांना वेग देण्यात आला. विकासाच्या दृष्टीकोनातून पाहिले गेल्यास पूर्वीचा बिहार आणि आताचा बिहार यांच्यात मोठा फरक पडला आहे. गया येथे आयआयएम, राष्ट्रीय महामार्ग, स्मार्ट सिटी प्रकल्प, बिहार केंद्रीय विद्यापीठ अशाप्रकारची अनेक कामे झाली आहेत आणि होत आहेत, असे उद्गार भाजप अध्यक्षांनी काढले आहेत.

रालोआसमोरील आव्हान

संजद विरोधात लोकजनशक्ती पक्षाच्या उघड बंडामुळे रालोआसमोर स्वतःची मते कायम राखण्याचे आव्हान आहे. मतदारांमध्ये सकारात्मक संदेशाच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार संयुक्तपणे एका प्रचारसभेला संबोधित करणार आहेत. या सभांमध्ये रालोआच्या मतपेढीसमोरील लोजपने तयार केलेला गोंधळ दूर होण्याची शक्यता आहे. लोजपने स्वतःचे कार्यकर्ते तसेच मतपेढीला संजदच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

देश मोदींच्या हातात सुरक्षित

बिहारमध्ये विकासाची नवी गाथा लिहिली जात आहे. या विकासाला निरंतर ठेवणे ही आमची आणि तुमची जबाबदारी असल्याचे नड्डा यांनी जनतेला संबोधून म्हटले आहे. देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे. बिहारचे नेतृत्व नितीश यांच्या हातात सुरक्षित असण्याची आता गरज आहे. बिहारमध्ये रालोआचे सरकार स्थापन करण्याचा निर्धार सर्वांनी करावा, असे विधान नड्डा यांनी केले आहे.

Related Stories

अधिवेशनाचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला

Patil_p

अंतराळात मोठी दुर्घटना टळली

Patil_p

‘आयएस’च्या ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

prashant_c

कोरोनासाठी दिल्ली सरकारकडून ट्विटर हॅंडल

Rohan_P

बंगालमध्ये प्रचारसभा राहुल गांधींनी केल्या रद्द

Patil_p

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भरघोस मतदान

Amit Kulkarni
error: Content is protected !!