तरुण भारत

फोंडय़ातील प्रमुख मंदिरात नवरात्रोत्सव मर्यादित स्वरुपात

काहि मंदिरात मखरोत्सव रद्द : शारदोत्सवावरहि मर्यादा

प्रतिनिधी
फोंडा

कोरोना महामारीच्या सावटामुळे फोंडा तालुक्यातील बहुतेक प्रमुख मंदिरांनी यंदाचा नवरात्रोत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार १७ ऑक्टोबर पासून घटनस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्रोत्सवातील मुख्य आकर्षण असलेला देवीचा मखरोत्सव काहि देवस्थानांनी रद्द केला असून काहि मंदिरात बाहेर स्क्रीन लावून भाविकांना मखर हलविताना पाहण्याची सोय केली जाणार आहे. शारदोत्सव, सिमोल्लंघनाचा पालखी उत्सव व दसर्‍याचा कौलप्रसादहि पारंपरिक प्रथानुसार औपचारिक स्वरुपाचा असेल. लॉकडाऊन ५ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गर्दीवर नियंत्रण ठेऊन व सामाजिक अंतर राखून नवरात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समित्यांनी घेतलेला आहे. देव भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या फोंडा तालुक्यात श्री शांतादुर्गा, महालक्ष्मी, रामनाथ, नागेश महारुद्र, महालसा, मंगेश, नवदुर्गा, कामाक्षी, देवकीकृष्ण आदी सर्व प्रमुख मंदिरे वसली आहेत. घटनस्थापनेपासून महानवमीपर्यंत विविध रुपातील देवीचे दर्शन हे मखरोत्सवाचे खास वैशिष्टय़. त्यामुळेच नवरात्रोत्सवाला फोंडा भागात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या काळात संपूर्ण गोव्यातुन व परराज्यातुनहि मोठ्या संख्येने भाविक नवरात्रोत्सवाला आवजून उपस्थिती लावतात. यंदा कोरोनाच्या आपत्तीमुळे या संपूर्ण सांस्कृतिक महोलावर मर्यादा आल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे मार्चपासून साधारण तीन महिने नित्यपूजा सोडल्यास मंदिरे बंदच होती. तीन महिन्या नंतर बहुतेक मंदिरामध्ये भाविकांसाठी दर्शन खुले झाले व सहा महिन्यानंतर आलेला नवरात्रोत्सव हा मोठा उत्सव. सुरक्षेच्यादृष्टीने केवळ औपचारिक स्वरुपातच तो साजरा होणार आहे.

शांतादुर्गा, महालक्ष्मी मंदिरात मखरोत्सवाचे दर्शन स्क्रीनवर कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानमध्ये मखरोत्सव साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. मात्र मुख्य आरत्या पुजारी व देवस्थान समिती सदस्यांच्या उपस्थितीत होतील. भाविकांना मखरोत्सव पाहण्यासाठी मंदिराच्या प्रांगणात स्क्रीन लावण्यात येणार असून सामाजिक अंतर राखून दोनशे भाविकांना बसता येईल याप्रमाणे सोय केली जाणार आहे. नवरात्रोत्सव काळात देवीचे दर्शन सामाजिक अंतर राखून घेता येईल. दसरोत्सवाची पालखी नियोजित मूळ पाच स्थानांनाच भेट देणार आहे.
बांदोडा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात मखरोत्सव रात्री १० ऐवजी ९ वा. होणार आहे. त्यापूर्वी सामाजिक अंतर राखून रात्री ८.३0 वा. भाविकांना देवीचे दर्शन घेता येईल. कीर्तन मंदिरच्या मंडपात होईल व प्रत्यक्ष मखर हलविण्यावेळी देवस्थान समिती व पुजारी असे अवघेच लोक मंदिरात उपस्थित असतील. भाविकांना बाहेर स्क्रीनवर मखरोत्सव पाहण्याची सोय केली जाणार आहे. दसरोत्सवहि कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्त्वानुसार होणार आहे. नागेशी येथील श्री नागेश देवस्थानात मखरोत्सव रात्री उशिरा न होता, सायंकाळी ७ वा. होईल. मुख्य आरतीच्यावेळी भाविकांना बाहेर स्क्रीनवरुन मखर हलविताना पाहता येईल.


रामनाथ, देवकीकृष्ण मंदिरात यंदा मखरोत्सव नाहि
रामनाथी येथील रामनाथ देवस्थानने मखरोत्सव रद्द केला असून श्रीच्या दर्शनासाठी भाविकांना बाहेर चौकात सोय करण्यात येणार आहे. माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिरातहि यंदा मखरोत्सव व अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. घटस्थापना व नित्यपूजा विधी तेवढे होणार आहेत. गोठण वेलिंग येथील श्री शांतादुर्गा शंखवाळेवरी मंदिरातहि मखरोत्सव होणार नाहि. पुजार्‍याकडून घटस्थापना व प्रथेनुसार इतर पूजाविधी तेवढी होणार आहेत. अन्य काहि मंदिरांचा नवरात्रोत्सवासंबंधी निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे.


शाळांमध्ये मूर्तीऐवजी सरस्वतीच्या फोटोचे पूजन
दरम्यान नवरात्रोत्सव काळात येणार्‍या शारदोत्सवावरहि मर्यादा आल्या आहेत. ग्रामीण भागामधील सरकारी शाळांमध्ये होणारा शारदोत्सव हा संपूर्ण गावाचा उत्सव असतो. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा मोठ्या थाटामाटत शारदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. मात्र यंदा सरकारी प्राथमिक शाळांमध्ये केवळ परंपरा म्हणून सरस्वतीच्या फोटोचे पुजन करण्याची सूचना भागशिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षकांना केली आहे. सकाळी फोटोची पूजा व दुपारपर्यंत हा कार्यक्रम आटोपता घेण्यास सांगितले आहे. काहि शाळांतील पालक व ग्रामस्थानी प्रथेनुसार सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन करुन मर्यादित स्वरुपात हा उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला आहे.

Related Stories

पुढील आठवडय़ापासून कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी : मुख्यमंत्री

Patil_p

पत्रादेवी चेक नाक्मयावरून थेट नागरिकांचा बांदा येथून गोव्यात प्रवेश

omkar B

प्रारंभीची तेजी कायम राखण्यात सेन्सेक्सला अपयश

Patil_p

पोर्तुगिजकालीन चिंबल तळीच काम नोव्हेंबरात हाती घेणार

Patil_p

हेमा बुगडे यांना ‘राष्ट्रीय कौशल्य चार्य 2020’ पुरस्कार प्राप्त

Patil_p

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा, प्रशिक्षणाने खेळाडू व्यस्तः संजय कवळेकर

omkar B
error: Content is protected !!