तरुण भारत

चिनी जहाजांना जपानने पिटाळले

सेनकाकू बेटानजीक घटना : जपानच्या तटरक्षक दलाची कारवाई

वृत्तसंस्था / टोकियो

दक्षिण चीन समुद्रात चीनच्या अरेरावीच्या विरोधात त्याच्या शेजारी देशांनी ठोस भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे. सेनकाकू बेटानजीक स्वतःच्या सीमेत घुसलेल्या चीनच्या दोन जहाजांना जपानने त्वरित परतणे भाग पाडले आहे. जपानच्या इशाऱयानंतर चिनी जहाजांनी त्वरित पळ काढला आहे.

चीनच्या 3 गस्तनौका जपानच्या एका मासेमारी नौकेचा पाठलाग करत होत्या. यातील 2 चिनी नौका जपानच्या सागरी हद्दीत शिरल्या होत्या. या नौका रविवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत जपानच्या सागरी क्षेत्रात राहिल्या होत्या. जपानच्या तटरक्षक दलाने त्यांना परतण्यास सांगितले होते.

28 ऑगस्टनंतर चिनी नौका जपानच्या हद्दीत शिरण्याची ही पहिलीच वेळ होती. चालू वर्षात आतापर्यंत 18 वेळा चिनी गस्तनौकांनी जपानच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केली आहे. चिनी जहाजांचे कृत्य पाहता जपानने स्वतःच्या आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रामध्ये मागील काही महिन्यांपासून गस्त वाढविली आहे.

मलेशियाची कारवाई

मलेशियानेही दक्षिण चीन समुद्रात चीनला आव्हान दिले आहे. मलेशियाच्या मेरीटाइम इन्फोर्समेंट एजेन्सीने चीनच्या 6 मासेमारी करणाऱया नौका जप्त केल्या होत्या. या नौकांवरील 60 चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सागरी क्षेत्रात मोहीम चालू असताना दोन विविध ठिकाणी चिनी नौका दिसून आल्याने कारवाई करण्यात आल्याचे मलेशियाने म्हटले होते.

नियमभंग केल्याचा इन्कार

सेनकाकू बेटानजीक कुठल्याही नियमाचा भंग केला नसल्याचा चीनचा दावा आहे. हे बेट प्रारंभापासूनच चीनचा हिस्सा राहिले आहे. आम्ही आमच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी ठाम आहोत. तेथे चिनी सैन्याची विमाने नियमित उड्डाणे करत आहेत. चीनचे नौदलही नियमितपणे तेथे गस्त घालत आहे. हे कुठल्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन नाही. यातून कुठल्याही देशाला धोका नसल्याचे चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे.

चीन-जपान वाद

जपानच्या दक्षिण-पश्चिम भागात सेनकाकू किंवा दायायू बेट आहे. हे बेटच चीन-जपानमधील वादाचे कारण आहे. सध्या या बेटावर जपानचे नियंत्रण आहे, परंतु चीन यावर स्वतःचा दावा करत आहे. हे बेट दक्षिण चीन समुद्रानजीक आहे. या बेटाच्या नजीक 12 मैलाचा आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग देखील आहे. परंतु चीन हे मान्य करत नाही आणि अनेकदा जपानच्या हवाईक्षेत्रात घुसखोरी करत आहे. याचमुळे जपानचे वायुदल सदैव सतर्क असते.

Related Stories

प्राथमिक फेरी निवडणुकीत 7 भारतीय विजयी

tarunbharat

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 1.35 लाखांवर

datta jadhav

जगभरात बाधितांनी ओलांडला 9 कोटींचा आकडा

datta jadhav

अमेरिकेत ‘फायझर-बायोएनटेक’ लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

datta jadhav

गांधी-किंग स्कॉलर्ली एक्सचेंज पुढाकार कायदा लागू

Patil_p

आयसीसीकडून यूएईच्या दोन खेळाडूंचे निलंबन

datta jadhav
error: Content is protected !!