तरुण भारत

‘पणजी स्मार्ट सिटी’च्या कर्मचाऱयांनी लावले फटाके

सरकारच्या निर्णयाचे केले जोरदार स्वागत : तारिक थॉमस यांनी घेतला महामंडळाचा ताबा : महामंडळाची सातही बँक खाती केली सील : स्वयंदिप्त यांच्या कार्यालयालाही ठोकले टाळे

प्रतिनिधी / पणजी

Advertisements

नगरपालिका संचालक तारिक थॉमस यांनी काल बुधवारी इमेजिन पणजी स्मार्ट  सिटी महामंडळाचा हंगामी ताबा घेतला. सोमवारपासून हेमंत कुमार हे सेवेत रुजू झाल्यानंतर स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा ताबा ते घेतील. दरम्यान स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱयांनी मांडवी किनारी फटाके लावून सरकारच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.

पणजी स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक स्वयंदिप्त पाल चौधरी यांची मंगळवारी सायंकाळी सरकारने आदेश जारी करुन हकालपट्टी केल्यानंतर बुधवारी सकाळी पालिका संचालक तारिक थॉमस यांनी महामंडळात येऊन स्मार्ट सिटीचा ताबा घेतला. तेथील कर्मचाऱयांना विश्वासात घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. या महामंडळाचा कारभार स्वच्छ व पारदर्शक राहण्यासाठी प्रयत्न करा व विश्वासाने व प्रामाणिकपणे काम करा, असा सल्ला त्यांना दिला.

महामंडळाची सातही बँक खाती केली सील

सध्या स्मार्ट सिटीच्या नावावर सात ठिकाणी बँकेत खाती आहेत. त्यात सुमारे 100 कोटी आहेत. या सातही खात्यांमधील पैसे काढण्यासाठी केवळ स्वयंदिप्त पाल चौधरी यांचीच सही चालते, अशी तरतूदही स्वयंदिप्त यांनीच करुन ठेवली आहे. त्यांना पदावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर थॉमस यांनी संबंधित सातही बँकांना स्मार्ट सिटीची खाती तात्पुरती सील करण्याची सूचना केली. तशी लेखी पत्रे बँकांच्या व्यवस्थापकांना सादर केली.

पाल चौधरी परत आले!

दरम्यान, पाल चौधरी हे आपल्या कार्यालयात बुधवारी सकाळी परत आले. आपल्या केबिनमध्ये त्यांच्या नावावर जी काही कागदपत्रे व वस्तु होत्या त्या त्यांनी ताब्यात घेतल्या. ऑफिसची कोणतीही फाईल त्यांना देऊ नका, असा आदेश तारिक थॉमस यांनी तेथील कर्मचारीवर्गाला दिला होता. आपल्या वस्तू घेऊन स्वयंदिप्त नंतर बाहेर पडले. त्यानंतर गेली 4 वर्षे स्वयंदिप्त यांच्या छळाने अडचणीत आलेल्या बहुतांश कर्मचाऱयांनी सरकारच्या आदेशाचे स्वागत करण्यासाठी फटाके लावले.

कार्यालयाला ठोकले नवे टाळे!

दरम्यान, पाल चौधरी यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या त्यांच्या कार्यालयातील कुलुपाच्या चाव्या असल्याने व त्या ते परत करु शकले नाहीत. त्यामुळे अधिकारीवर्गाने नवीन टाळे आणून बसविले.

बाबूशने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

स्वयंदिप्त पाल चौधरी यांना पाठीशी घालणारे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि स्मार्ट सिटीच्या पुनर्रचनेबाबत चर्चा केली.

तारिक थॉमस कसे वसूल करणार 54 लाख रुपये?

स्वयंदिप्त पाल चौधरी यांची हकालपट्टी झाली खरी परंतु स्मार्ट सिटीच्या पदावरुन त्यांना मिळालेले आतापर्यंतचे रु. 54 लाख हे अतिरिक्त वेतन वसूल कसे करायचे? हा प्रश्न सरकारसमोर आहे. चौधरी हे गोव्यातून पुन्हा आपल्या मूळगावी पश्चिम बंगालमध्ये गेल्यास गोवा सरकारला त्यांचा शोध घेणेही शक्य होणार नाही. हे पैसे बुडण्याची भीती आहे. तारिक थॉमस हे आता कोणती भूमिका बजावतात हे पाहावे लागेल.

Related Stories

मॉडेल मिलिंद सोमणला कोलवा पोलीस समन्स बजावणार

Patil_p

राज्य सरकार कोरोनाच्या धंध्यात व्यस्त

Omkar B

गुळेली आयआयटी प्रकल्पाबाबत जनमत जाणून घेणार

Omkar B

कोरोनाच्या संक्रमण काळातही मातृछायेकडून मुलांचा योग्य सांभाळ

Patil_p

गोव्यात येणाऱया प्रत्येकाला कोरोना चाचणी सक्तीची

tarunbharat

कांपाल – पणजी येथे 20 फेब्रुवारीपासून शिवलिंग दर्शन महोत्सव

Patil_p
error: Content is protected !!