तरुण भारत

साताऱ्यात नवरात्र उत्सवाची नियमावली जारी

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्हा दंडाधिकारी सातारा यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये जिल्ह्यातील सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020करिता खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि नगरपालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच यार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.

देवीच्या मुर्तींची उंची सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती देवीच्या मुर्तींची उंची 2 फुटांच्या मर्यादित असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती शाडुची, पर्यावरण पुरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घराच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुं‍ब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीर (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

देवीच्या मंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येवून दर्शन घेवू इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शरिरीक अंतर (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर, इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येवू नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे, संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येवू नये.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलवू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी. कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परित्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे लागेल, असेही आदेशात जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी नमुद केले आहे.

Related Stories

सातारा शहरात संसर्ग आटोक्यात

datta jadhav

हुतात्मा स्मारकासमोर टपऱयांमध्ये मटका बोकाळला

Patil_p

मृतांचा टक्का घसरला

Patil_p

देवदर्शन करुन परतताना दांपत्यावर काळाचा घाला

Patil_p

अवैध दारु व्यावसायिकांचे सातारा शहर पोलिसांना ओपन चॅलेंज

Abhijeet Shinde

वादग्रस्त पूररेषा टेंडरमधील भ्रष्टाचार बाहेर काढणारच

datta jadhav
error: Content is protected !!