तरुण भारत

एमएलजी हायस्कूल ते ‘ऑस्कर’ व्हाया जे. जे. आर्टस्

कोल्हापूरची सुकन्या भानू अथैय्यांचा वैभवशाली प्रवास
बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये करवीरनगरीचा वाढविला होता लौकिक

संजीव खाडे / कोल्हापूर

Advertisements

संस्थानकाळात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे पुरोहित असणाऱ्या राजोपाध्ये घराण्यातील एक मुलगी महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल अर्थात एमएलजी हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेते. पुढे मायानगरी मुंबईत जाते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये कलेचे धडे घेते आणि बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्ये आपल्या वेशभूषाच्या कलेने अभिनेते, अभिनेत्रींना ग्लॅमर मिळवून देते. असंख्य पुरस्कार मिळवते. हॉलीवूडमध्ये भारताचा आणि बॉलीवूडमध्ये कोल्हापूरचा झेंड फडकविते. हा सारा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या कोल्हापूरच्या सुकन्या भानूमती अण्णासाहेब उर्फ गणपतराव राजोपाध्ये अर्थात ऑस्कर विजेत्या वेशभूषाकार भानू अथैय्या यांचा जीवनप्रवास गुरूवारी थांबला. कोल्हापूरच्या लेकीने शेवटचा श्वास घेतला तेंव्हा तिच्या कोल्हापुरी आठवणींनाही उजाळा मिळाला.

कोल्हापूरच्या बाबुजमाल तालीम परिसरातील पूर्वीच्या राजोपाध्ये बोळात (आताचा राजोपाध्ये रोड) राजोपाध्ये यांचा वाडा होता.(त्या ठिकाणी आज तुळजाभवानी संकुल आहे.) राजोपाध्ये घराण्यात भानू अथैय्यांच जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव आण्णासाहेब आणि आईचे नाव शांताबाई. अण्णासाहेबांना चित्रकलेची आवड. ते जेंव्हा पंचगंगा नदी घाटावर चित्र काढण्यासाठी जात तेंव्हा लहानगी भानूही त्यांच्याबरोबर जात असे. भानूमध्ये असणारी चित्रकलेची आवड पाहून अण्णासाहेबांनी तिला चित्रकार शशिकांत चव्हाण यांच्याकडे पाठविले. एमएलजी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना भानू चित्रेही काढू लागली. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर भानू मुंबईत गेली आणि तेथे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये कलेचे धडे घेतल्यानंतर कॉश्च्युम डिझायनिंगमध्ये (वेशभूषा) करिअर केले. 1950 मध्ये कोल्हापूरच्या या कन्येचा बॉलीवूडमधील प्रवास सुरू झाला. अभिनेत्री नर्गिस यांच्यामुळेच भानू यांना राज कपूरच्या श्री 420 चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

साहिब बीबी और गुलाम, गाईड, ब्रह्मचारी, मेरा नाम जोकर प्यासा, रझिया सुलताना, मेरा साया, तिसरी मंझिल यासह अलिकडच्या काळातील लगान, स्वदेस या हिंदी चित्रपट आणि महर्षी कर्वे या मराठी चित्रपटासह शंभरहून अधिक चित्रटापटांच्या वेशभूषेची जबाबदारी पार पाडली. 1983 मध्ये जगभरात गाजलेल्या गांधी चित्रपटातील गांधीजींच्या वेशभूषेसाठी भानू यांना ऑस्कर ऍवॉर्ड मिळाले. हे ऑस्कर मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. वेशभूषाकार सत्येंद्र अथैय्यांशी यांच्याशी विवाह झाला होता. काही वर्षांपूर्वी सत्येंद्र यांचे निधन झाले. भानू यांची मुलगी राधिका गुप्ता कोलकात्यात असते. भानू यांना एक भाऊ श्रीकांत आणि नयनातारा, तिलोतमा, प्रमिला, रंजना, शोभना पाच बहीणी. त्यापैकी बहीण शोभना राजोपाध्ये आज हयात आहेत. भाऊ श्रीकांत राजोपाध्ये लष्कारात ब्रिगेडिअर होते. त्यांचेही निधन झाले आहे. श्रीकांत यांची कन्या अंजू दवे पुण्यात असते.

बहिण शोभना आणि मुलगी राधिका यांनी जागविल्या आठवणी

भानू यांची बहीण शोभना राजोपाध्ये आणि मुलगी राधिका गुप्ता यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना भानू यांच्या कोल्हापूरविषयीच्या आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, 1983 मध्ये ऑस्कर मिळाल्यानंतर तिचा कोल्हापुरात सत्कार झाला होता. अंबाबाईवर तिची खूष श्रद्धा होती. दर्शनाला ती नेहमी जात असे. 2009 मध्येही कोल्हापूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिला गौरविले होते. 2010 मध्ये द आर्ट ऑफ कॉश्च्युम डिझाईनिंग हा पुस्तक लिहिले होते. ते तिने कोल्हापूरला जाऊन करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी अर्पण केले होते. एमएलजी हायस्कूल, पंचगंगा नदी, अंबाबाई मंदिर, राजोपाध्ये वाडा, त्यातील तुळजा भवानीचे मंदिर याबद्दल ती नेहमी आठवणी सांगत असे. वृद्धापकाळामुळे गेल्या काही वर्षांत तिला कोल्हापूरला जाणे शक्य झाले नाही. मात्र कोल्हापूरवरील तिचे प्रेम शेवटपर्यंत कायम होते.

Related Stories

मंगल कार्यालयातून सहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार लंपास

Abhijeet Shinde

”सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षाचा थयथयाट”

Abhijeet Shinde

कोरोना : आम्ही मूक प्रेक्षक म्हणून बसू शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

Abhijeet Shinde

युवकाचा खून करुन मृतदेह नदीत टाकला

Patil_p

हॅट्रीकचे स्वप्न पाहणार्‍या चंद्रकांत दादांची बोल्ड उडणार : पालकमंत्री सतेज पाटील

Abhijeet Shinde

भाजी मंडईत खिशातून 8 हजार रुपये लंपास

Patil_p
error: Content is protected !!