तरुण भारत

दोन ‘रॉयल्स’ संघ आज पुन्हा आमनेसामने

वृत्तसंस्था/ दुबई

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात काही अनाकलनीय निर्णय घेतल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागलेल्या कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱया सामन्यात योग्य डावपेच आखावे लागणार आहेत. दुपारी 3.30 पासून या सामन्याला सुरुवात होईल.

Advertisements

आरसीबीने आतापर्यंत आठपैकी पाच सामन्यात सर्वंकष कामगिरी करीत विजय मिळविले आहेत. पण त्यांच्यापेक्षा मागे राहिलेल्या पंजाबविरुद्ध मात्र त्यांना काही चुकीच्या निर्णयामुळे आठ गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागल्याचे दिसून आले. याउलट या मोसमात आघाडीची फळी वारंवार कोलमडत राहिल्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या तळाच्या खेळाडूंना विजय मिळवून देण्याची जबाबदारी सांभाळावी लागली आहे. आरसीबीने जे विजय मिळविलेत त्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध याच मैदानावर मिळविलेल्या सुपरओव्हरमधील विजयाचा समावेश आहे तर राजस्थान रॉयल्स आठ सामन्यात तीन विजय मिळवित गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे.

पंजाबविरुद्ध शारजा येथे झालेल्या सामन्यात आरसीबीने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या डीव्हिलियर्सला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविले, पण त्यांचा हा अनाकलनीय निर्णय सपशेल फसल्याचे अखेरीस दिसून आले. डावखुरा वॉशिंग्टन सुंदर (13) व शिवम दुबे (23) यांना कोहलीला साथ देण्यासाठी फलंदाजीस बढतीवर पाठविण्यात आले. पण तीनही फलंदाज अपयशी ठरल्याने हा प्रयोग पूर्णपणे फसला. डीव्हिलियर्सला तर 5 चेंडूत केवळ 2 धावा जमविता आल्या. आणखी एका निर्णयाने आरसीबीच्या अडचणीत भरच पडली होती. ख्रिस गेलचा पहिलाच सामना असल्याने त्याच्यासाठी ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरला राखून ठेवण्याचा निर्णय कोहलीने घेतला. पण ही चालही पूर्णपणे फोल ठरली. कारण गेल आठव्या षटकात फलंदाजीस उतरल्यानंतर त्याने सुंदरच्या गोलंदाजीवर एकूण 4 षटकार ठोकले. ‘त्यांच्याकडे दोन लेगस्पिनर असल्याने आम्ही चर्चा करून डाव्या-उजव्या कॉम्बिनेशनचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही घेतलेल्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत. पण घेतलेले सर्वच निर्णय यशस्वी होत नाहीत, असे बरेचदा घडून येते. तोच प्रकार येथे घडला,’ असे कोहलीने सामन्यानंतर म्हटले होते.

रॉयल्सकडे भक्कम फलंदाजी लाईनअप आहे. मात्र शारजात सुरुवातीला मिळविलेले दोन विजय सोडल्यास स्मिथ व संजू सॅमसन यांना नंतर फलंदाजीत अपेक्षित चमक दाखविताच आलेली नाही. बटलर सुरुवात चांगली करतो, पण त्याला मोठय़ा खेळीत त्याचे रूपांतर करण्यात अपयशच आले आहे. सात डावात त्याला केवळ एक अर्धशतक नोंदवता आले आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात खेळताना अष्टपैलू बेन स्टोक्सवर सलामीवीराची जबाबदारी सोपविण्यात आली. पण तो त्या सामन्यात अपयशी ठरला तरी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धावचीत होण्यापूर्वी त्याने 41 धावा फटकावल्या. राजस्थान संघ राहुल तेवातियावर जास्त अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. संघ अडचणीत असला की त्यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्याकडेच आशेने पाहिले जात आहे. त्यानेही पंजाब व सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ही कामगिरी चोखपणे पार पाडली. मात्र दिल्लीविरुद्ध आघाडी फळी कोसल्यानंतर त्याला अशी कामगिरी करता आली नाही. तो अपयशी ठरल्यानंतर रॉयल्सला माफक आव्हानही गाठता आले नाही. त्यांच्यासाठी आर्चर गोलंदाजीत प्रमुख भूमिका पार पाडतोय. त्याला तेवातिया व श्रेयस गोपाल हे फिरकी गोलंदाज पूरक साथ देत आहेत.

संघ : राजस्थान रॉयल्स : स्मिथ (कर्णधार), बटलर, स्टोक्स, सॅमसन, टाय, राजपूत, एस.गोपाल, तेवातिया, उनादकट, मयांक मार्कंडे, लोमरोर, ओशेन थॉमस, रियान पराग, जैस्वाल, अनुज रावत, आकाश सिंग, मिलर, व्होरा, शशांक सिंग, वरुण ऍरोन, टॉम करण, उथप्पा, अनिरुद्ध जोशी, आर्चर.

आरसीबी : कोहली (कर्णधार), डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, फिंच, फिलिप, मॉरिस, मोईन अली, सिराज, शाहबाज अहमद, पडिक्कल, चहल, सैनी, स्टीन, नेगी, उदाना, दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंग मान, सुंदर, पवन देशपांडे, झाम्पा.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Related Stories

वासची लंकेच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती

Patil_p

स्कॉटलंडची मालिकेत विजयी सलामी

Amit Kulkarni

एटीपी चषक स्पर्धेत सर्बियाला कठीण ड्रॉ

Patil_p

मीरतच्या क्रीडा विद्यापीठाला मेजर ध्यानचंद यांचे नाव

Patil_p

पराभवाची मालिका खंडित करण्याचे दिल्ली-बेंगळूरचे ध्येय

Patil_p

महान अष्टपैलू इयान बोथम ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’चे मानकरी

Patil_p
error: Content is protected !!