तरुण भारत

मंडला कला काय आहे आणि त्याचे महत्त्व काय?

कला हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. मग ती संगीत असो, नृत्य असो किंवा अभिनय असो. कलेतून माणूस अशा भावना व्यक्त करू शकतो ज्या केवळ शब्दांनी व्यक्त होऊ शकत नाहीत. त्यातील चित्रकलेचे विविध प्रकार हे आदिमानवाच्या काळापासून अस्तित्वात आहेत. आदिमानवाचे अस्तित्व हे आपल्याला त्यांनी खडकांवर केलेल्या चित्रकलेमुळेच कळू शकले आहे. त्यामुळे कलेशिवाय माणसाचे आयुष्य यशस्वी असले तरीही अपूर्ण आहे.

भारत देश हा कला आणि संस्कृतीचा खजिना आहे आणि भारताने जगाला विविध क्षेत्रांमध्ये अनेक कलांचे योगदान दिले आहे. भारतातील भिन्न संस्कृती आणि धर्मांमुळे येथे ज्ञानाचा आणि इतिहासाचा सागर वाहतो. प्रत्येक मनाच्या स्थितीसाठी एक अभिव्यक्तीचे साधन आपल्याला येथे पहायला मिळते. मग ते नृत्यातून कथाकथनासाठी कथक नृत्य असो, किंवा चिंतनासाठी बासरीची मधुर धून असो. कलेतून स्वतःला व्यक्त करायची परंपरा भारतात पूर्वपार चालत आली आहे.

Advertisements

त्यापैकीच एक कला म्हणजे ‘मंडला’ कला. मंडला या शब्दाचे मूळ ‘मण्डल’ या संस्कृत शब्दाशी जोडले गेले आहे. मण्डलचा अर्थ गोलाकार, आणि म्हणूनच मंडला कलेचे नाव या शब्दावरून घेतले आहे कारण ही चित्रकला एका भौमितिकदृष्टय़ा आखलेल्या गोलाकारातच केली जाते.

या कलेचे अस्तित्व किती पूर्वीपर्यंत जाते याचा शोध लागणे जरी अवघड असले तरी मंडला कलेची सुरुवात भारताच्या हिंदू, बौद्ध, जैन अशा धर्मांमधून झाली. भारतासह ही कला चीन, जपान व तिबेट, क्रिश्चियानिटी, पर्शियामध्येदेखील पहायला मिळते. भूमितीय रचना असल्यामुळे, पूर्वी ही कला नकाशे आखायला किंवा देवतांचे चित्रण करायला वापरली जायची. पण आजच्या आधुनिक काळात या कलेचा वापर ब्रह्मांड दर्शवण्यासाठी किंवा अध्यात्मासाठी मोठय़ा प्रमाणात केला जातो. कधीकाळी व्यावहारिक आणि धार्मिक पैलू असलेल्या या कलेला आजच्या काळात खूप वैज्ञानिक आणि आध्यात्मिक वळण मिळालेले आहे.

हिंदू पुराणांमध्ये मंडला कलेला ‘यंत्र’ असेही म्हटले जायचे. हे यंत्र गोलाकारात नसून, एका चौरसात काढले जायचे. त्या चौरसाच्या मध्यभागी एक गोलाकार आखला जायचा. ज्यात चित्राचे मुख्य सार दिसायचे. त्या गोलाकारात शक्मयतो चिंतनाचे, हिंदू देवतांचे किंवा हिंदू विधींचे चित्र बघायला मिळायचे. वैदिक विधी आजही मंडला कलेचा वापर नवग्रह दर्शविण्यासाठी करतात. हिंदू संस्कृतीच्या सगळय़ात जुन्या धार्मिक ग्रंथात, म्हणजेच ऋग्वेदातील प्रत्येक विभागाला मंडला असे म्हटलेले आहे. भारतातील मणिपूर राज्याची राजधानी इंफाळ शहरात मकलांग नावाची मोठी भौगोलिक योजना ‘गूगल अर्थ’ वरून पहायला मिळते. या भौगोलिक योजनेचा शोध 2013 मध्ये लागला आणि ही चिखलाने बनलेली जगातील सर्वात मोठी मंडला योजना आहे.

बौद्ध समाजात माऊंट मेरू नावाची एक पौराणिक संकल्पना आहे. माऊंट मेरू हे 5-शिखरी पवित्र पर्वत दर्शवतात. बौद्ध विश्वविद्याना प्रमाणे हे 5 पौराणिक पर्वत म्हणजे जगाचा मध्यम बिंदू मानले गेले आहेत. या माऊंट मेरूचे चित्रण मंडला कलेच्या माध्यमातून केले गेले आहे.

बौद्ध समाजाप्रमाणे मंडला कलेत काढला जाणारा सर्वात बाहेरचा गोलाकार बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. आणि त्याच्या आतील सर्व घटक हे मनुष्य जन्मातील विविध अनुभव जसे की, जन्म, मृत्यू, निसर्ग इत्यादीवर दर्शवितात. तांत्रिक बौद्ध मंडलाचा वापर हा ध्यान व चिंतनासाठी करतात. त्यांच्या मते मंडला कलेची योजना अशी आहे जी एका मोठय़ा गोलाकाराने सुरू होते आणि चित्राच्या मध्यभागी जोडली जाते. या रचनेची तुलना अंतर मनाशी केली गेली आहे आणि बौद्ध तांत्रिकांचा विश्वास आहे की चिंतन करताना मंडलाचा वापर केल्याने माणूस त्याच्या अंतर मनाशी जोडला जाऊ शकतो. येथे पुन्हा एकदा मानवजातीने निसर्गातील शक्तीशी स्वतःला जोडून कलेच्या माध्यमातून त्या भावना व्यक्त करायचा प्रयत्न केला आहे.

या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेचे सार आपल्याला आधुनिक काळातदेखील पहायला मिळते. सध्याचा काळातल्या मानसशास्त्रज्ञांच्या मते, मंडला कलेचे आकृतिबंध हे चित्रकाराच्या चित्र काढत असताना असलेल्या भावना दर्शवतात. मंडला कला वापरून चित्र काढल्याने मन स्थिर होण्यास व मनाचे व्यवस्थापन करण्यास मदत होते असाही काही मानसशास्त्रज्ञांचा विश्वास आहे.

एवढेच नव्हे तर विज्ञानातदेखील अवचेतनपणे या नमुन्याचा वापर केलेला आपल्याला दिसतो. ‘फ्लायओजनेतिकस’ नावाच्या एका अभ्यासात गोलाकार आकृत्यांचा वापर भिन्न प्रजातींचे वर्गीकरण करण्यास केला गेला आहे. तसेच फॅशन या क्षेत्रात मंडला कलेचा वापर विविध कपडय़ांवर केला गेला आहे. नेटिव्ह अमेरिकन समाजात ड्रीम कॅचर नावाची एका संकल्पना आहे. ड्रीम कॅचर ही हस्तनिर्मितीत गोलाकार बांधणी आहे जी झाडांच्या फांद्यांपासून बनली जाते. त्या गोलाकारामध्ये एक चक्राकार नमुना असतो जो एका मध्यभागी येऊन मिळतो. नेटिव्ह अमेरिकन संस्कृतीच्या मते हे ड्रीम कॅचर घरात लावले की घरातील सदस्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते आणि घरात प्रसन्न वातावरण दरवळत राहते. ड्रीम कॅचर्सची ही रचना त्याच्या चक्राकार नमुन्यामुळेदेखील मंडला कलेशी जोडली गेली आहे. यामुळे आपल्याला लक्षात येते की माणसाचा धर्म, जात, भाषा कितीही भिन्न असली तरी माणसातील मानवी स्वभाव आणि अंतर मनाची आत्मज्ञान साध्य करायची ओढ आपल्याला एकत्र जोडून ठेवते.

मंडला कला ही एकाच आकृतिबंधात काढली जात असल्याने, ही कला पाहून अतिशय प्रसन्न वाटते. तपशीलवार चित्रीकरण आणि सुकुमार आकृत्यांमुळे या कलेतून एक सकारात्मक ऊर्जा मिळते. विज्ञान, गणित वगैरे विषय जसे मानवतेच्या उद्धारासाठी गरजेचे आहेत तसेच नृत्य, चित्रकला, संगीत या विविध कला माणसाला जगण्याची उमेद आणि आधाराचे माध्यम आहेत. मंडलासारख्या कित्येक ऐतिहासिक कला आहेत ज्या आजही तितक्मयाच मौल्यवान आहेत. या कला आपण जपल्या पाहिजेत, कारण त्या माणसाच्या कामगिरीशी जोडल्या नसून, मानवजातीच्या मनाशी जोडल्या आहेत!

श्राव्या माधव कुलकर्णी

Related Stories

कोरोना गंभीर रुग्णासाठी आशेचा किरण…

Patil_p

कोरोना महामारी आणि तरुण पिढी

Patil_p

‘शरपंजरी’ खाजनशेतीला भगिरथाची प्रतीक्षा

Patil_p

त्रिरत्नांचा सन्मान

Patil_p

मनोहर पर्रीकरांचा राजकीय वारस कोण?

Patil_p

उत्पादन व रोजगार निगडित प्रोत्साहन योजना

Patil_p
error: Content is protected !!