तरुण भारत

लेकरांवर ममतेचा वर्षाव करणारी माता तुळजाभवानी

सध्या आपण आणि सारे जगच कोविड महामारीतून मार्ग काढत आहे. विज्ञानाने हात टेकले. पण या संभ्रमावस्थेत भारतीय समाज अजून स्थिर आहे. तोही परमेश्वराच्या श्रद्धेवर. देवीचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. सामर्थ्यवान भवानी माता नक्कीच आपल्याला या महामारीच्या त्रासातून मुक्त करेल, असे विचार मांडणारी कर्नाटकचे माजी मंत्री आर.व्ही.देशपांडे यांची ही विशेष मुलाखत…

हल्ल्याळ येथील देशपांडे कुटुंब जगत्जननी तुळजाभवानीचे आद्य उपासक. आपल्या इष्ट देवींची नित्य आराधना व्हावी म्हणून कर्नाटकचे माजी महसूल मंत्री व हल्ल्याळचे विद्यमान आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी तुळजाभवानी मातेचे मंदिर हल्ल्याळ येथे सर्वांच्या सहकार्याने बांधले आहे. या संदर्भात मा. देशपांडे यांनी मुलाखतीद्वारे दिलेली माहिती.

Advertisements

साहेब, आपण तुळजाभवानी देवीचे उपासक आहात?

-निश्चितच मी देवीचा नित्य उपासक आहे. धार्मिकता मनुष्याला आत्मिक बळ आणि नैतिक सामर्थ्य देते. सामाजिक सेवेचा उगम अशाच भक्तीतून होतो. म्हणूनच घरातील वडीलधाऱयांच्या इच्छेनुसार मी मंदिर बांधण्यात पुढाकार घेतला.

तुळजापूरची अंबाभवानी कोण?

-भवानीचा इतिहास फार प्राचीन आहे. तुळजाभवानीचे आजचे मंदिर बाराव्या शतकातील आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिह्यात असून 51 शक्तीपीठातील एक आहे. भवानीला तुळजा, तुरजा, त्वरीता, अंबा आणि जगदंबाही म्हणतात. तुळजाभवानी ही दुर्गास्वरुप आहे. देवीची कथा स्कंद पुराणातही आहे. मंदाकिनी नदीच्या काठावर अनुभूतीने पार्वतीची तपस्या करून तिला भवानीच्या रूपात, तिच्या मुलाचे कुकूर राक्षसापासून संरक्षण करण्याची साद घातली. भवानी माता म्हणूनच तिच्या भक्तांसाठी बालाघाट टेकडीवर बसली. तेच आजचे तुळजापूर. खरंतर माता भवानीचा इतिहास फार मोठा आणि विस्मयकारी आहे. भवानी म्हणजे जीवनदायिनी. दंडकारण्यात जेव्हा रावणाने सीताहरण केले तेव्हा रामानेही भवानीचा आशीर्वाद घेतला होता. तुळजापूरही दंडकारण्यात आहे.

महाराष्ट्रातील, तुळजाभवानी हे पहिले शक्तीपीठ आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई आणि माहूरगडावरची रेणुकामाता ही दुसरी दोन शक्तीपीठे. तुळजापूरचे भवानी मंदिर हे किल्याच्या स्वरुपात आहे आणि भवानी ही स्वयंभू आहे. तिची कुणीही स्थापना केलेली नाही. अष्टभुजा भवानीच्या सान्निध्यात श्रीभवानी शंकराचे देऊळ, यज्ञकुंड, श्रीगणपती, सिद्धिविनायक आदी मंदिरे आहेत. तुळजाभवानी दुसरी कुणी नाही तर चामुंडेश्वरी आहे. महिषासुराचा संहार करणारी ती एक उग्रस्वरुप कल्पित स्त्राr आहे. म्हणून तिला प्राण्यांचे बळी देण्याची प्रथा होती. कालानुरूप आता बळी देण्याची परंपरा बंद झाली आहे.

शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये नमूद असलेली अंबाभवानी हीच का?

-हो. छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता तुळजाभवानी. भोसले राजघराण्याची ती कुलदेवता. सर्व क्षत्रियांची कुलदेवता तीच आहे. महाराष्ट्रात भवानीला कुलस्वामीनी म्हणून संबोधले जाते. महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी तुळजा भवानीनेच तलवार दिली होती आणि त्यालाच भवानी तलवार म्हणतात. मंदिराच्या मागच्या द्वाराला ‘शिवाजी द्वार’ असे म्हणतात. मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर द्वार तर पश्चिमेच्या दोन द्वारांना शिवाजी महाराजांच्या माता, पित्यांच्या नावाने म्हणजे शहाजी द्वार आणि जिजाबाई द्वार म्हणून ओळखतात.

साहेब, भवानीचे भक्तगण कोण आणि कुठले?

-भवानीचे भक्तगण लाखो आहेत. प्रामुख्याने कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणमध्ये भवानीच्या भक्तांची संख्या जास्त आहे. मराठा, रजपूत आणि क्षत्रिय समाज भवानीला मोठय़ा प्रमाणात पूजतात. मंदिरांना रोजच गर्दी असते. दैनंदिन पूजा सकाळी पाचपासून सुरू होतात. त्यात चरणतीर्थ पूजा आहे. 8 वा. अभिषेक नंतर धुपारती, संध्याकाळी अभिषेक, धुपारती रोज पूजा आदी कार्यक्रम असतात. देवस्थानातील प्रमुख तीन उत्सव प्रसिद्ध आहेत. शाकंभरी, नवरात्र उत्सव, चैत्रात तर शारदीय नवरात्र उत्सव आश्विन मासात करतात. तुळजापुरात आठ पौराणिक तीर्थस्थळे आहेत. कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, पापनाशी तीर्थ, प्रामुख्याने गजबजलेली असतात. पाच धार्मिक मठही आहेत. त्यातील महंत भारतीय बुवामठ त्यातील सुरुंग मार्गासाठी प्रसिद्ध आहे. याच सुरुंग मार्गाने शिवाजी महाराज अंबा भवानीच्या दर्शनास जात असत असे मानतात. महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सामाजिक आणि राजकीय नेते भवानीचाच आशीर्वाद घेतात. सर्व भक्तगण तुळजा भवानीचा आशीर्वाद मुख्य मानतात. माजी पंतप्रधान इंदिराजींनी तुळजाभवानी मंदिरात येऊन भवानीचा आशीर्वाद घेतला होता. मातेचे भक्तगण, भवानीचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊनच नव्या कार्याची सुरुवात करतात.

 देवीचे मंदिर आणि त्यातील वैशिष्टय़े काय?

-आधी सांगितल्याप्रमाणे देवी स्वयंभू आहे. अष्टभुजा आहे. देवीच्या अनेक कथा आणि परंपरा आहेत. शतकानुशतके भक्तांची चाललेली पूजा हेच सत्य आहे. विशेष म्हणजे देवस्थानाजवळ एक गोलाकार दगड आहे. त्याला चिंतामणी म्हणतात. भवानी मातेला नवस केलेल्या भक्तांनी चिंतामणीला स्पर्श केल्यास काम होणार असेल तर चिंतामणी उजवीकडे वळतो नाही तर डावीकडे वळतो. कामात अनिश्चितता असली तर स्थिरच राहतो. आजही भक्तगण चिंतामणीला भक्तीने स्पर्श करून देवीचा कौल घेतात. प्रयत्नाला देवाची साथ असेल तर दुधात साखर.

 भवानी देवीची आराधना साधारण कधीपासून सुरू झाली?

-देवीची आराधना प्राचिन आहे. नजीकच्या इतिहासात आदिगुरु श्री शंकराचार्यांनी देवीच्या आराधनेला सुरुवात केली. सर्वत्र शक्तीपीठांची स्थापना केली. कर्नाटकातदेखील शृंगेरी शारदापीठ, कोल्लूरु मोकांबिका या त्यानीच केलेल्या प्रति÷ापना आहेत.

परदेशातही देवीची आराधना करतात ?

-नक्कीच. जेथे जेथे हिंदु संस्कृती पोहोचली, तिथे आदिशक्तीची पूजा करतात. नेपाळमध्ये तुळजाभवानी कुमारी म्हणून ओळखली जाते. तीच तेथील शक्तीदेवता आहे. देशातील राजे आणि राज्यकर्ते देवीचाच आशीर्वाद घेऊन काम करतात. सप्टेंबरमध्ये चालणाऱया इंद्रायात्रा उत्सवात नेपाळचे महाराज देवी कुमारीचा आशीर्वाद घेतात आणि ही प्रथा आजही अस्तित्वात आहे. देवीही चैतन्य प्रदायनी आहे. जगभरातच देवीची आराधना प्रिय आहे.

भवानी देवीचे हल्ल्याळमध्ये आगमन केव्हा झाले?

-ही एक रंजक कथा आहे. खरंतर आमच्या कुटुंबाचे कुलदैवत श्रीमंगेश आणि श्रीमहालक्ष्मी. पण माझ्या माहितीनुसार आमचा देशपांडे परिवार तुळजाभवानी आराधना कुलदेवतेप्रमाणेच करतो. माझे वडील, काका, आजोबा आणि त्यांचेही वडील भवानीमातेला कुलदेवतेसारखेच पूजत आले व सगळय़ा प्रथा पाळत आले. जर याचा हिशोब केला तर कमीत कमी दीडशे वर्षे तरी देशपांडे परिवार हल्ल्याळमध्ये तुळजाभवानीची सेवा करत आहे. त्यापूर्वीचा इतिहास लिखित नाही. पण आम्ही सारे इतिहासात जमीनदार असल्याने कुठेतरी याचा मराठेशाहीशी संबंध असावा, असे वाटते. माझ्या लहानपणापासूनच मी भवानी मातेसमोरचा सतत तेवणारा नंदादीप पहात आलो आहे. नवरात्री उत्सव, दीप रोषणाई, नंदादीप याची परंपरा कायम आहे. माझे वडील, विश्वनाथराव, आई विमलाबाई, माझे काका व्यंकटेशराव आणि माझे आजोबा रघुनाथराव व समस्त देशपांडे परिवार यांनीच देवीची स्थापना केली असावी. सर्व वडिलधाऱया परिवारांनी हल्ल्याळ गावात घरची इष्ट देवता तुळजाभवानीचे मंदिर स्थापण्याचा नवस केला होता. काही कारणामुळे ते शक्मय झाले नाही. आणि अचानक नव्वदच्या काळात मला देवी सांगतेय असा भास झाला. मंदिराच्या दिशेने पावले पडली. सर्व समावेशक ट्रस्ट स्थापला. समाजातील साऱया लहानथोर मंडळींची साथ घेतली आणि वास्तुशास्त्रानुसार तुळजाभवानी मंदिर सिद्ध झाले. 16 मार्च 1996 रोजी तुळजाभवानी प्रति÷ापना कार्यक्रम झाला.

हल्ल्याळमधील मंदिरात भक्त कोठून येतात?

-हल्ल्याळ येथील मंदिरात तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी गोवा, महाराष्ट्रातून भक्त येतात. बेळगाव, धारवाड, हुबळी, गदग, उत्तर कन्नड जिह्यातील भाविक आणि क्षत्रिय समाजातील भक्तगण आवर्जून देवीच्या दर्शनासाठी येतात. उत्तर कर्नाटक भागात हे तुळजाभवानी मंदिर फार लोकप्रिय झाले आहे व तीर्थस्थानही बनले आहे.

नवरात्र उत्सव कसा साजरा करता?

-हल्ल्याळ येथील भवानी देवस्थानात दोन उत्सव करतो. एक नवरात्र उत्सव आणि दुसरा भवानी प्रति÷ापना वार्षिक समारंभ. दोन्ही उत्सव उत्साहाने आणि मोठय़ा भक्तीभावाने होतात. नवरात्रोत्सवातील नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम आणि धार्मिक विधी होतात. चंडिका होम, नवग्रह जप, पारायण, दुर्गाष्टमी असे नित्य विधी चालूच असतात. मंदिर परिसरात अनेक परिवार देवता आहेत. मंगेश महालक्ष्मी, श्रीपार्वती देवी, महागणपती, राधाकृष्ण, नवग्रह, नागदेवता यांची ही प्रतिष्ठापना केलेली आहे व नित्य पूजा चालू असते.

वडीलधाऱया कुटुंबीयांसाठी आपल्या भावना कशा व्यक्त कराल?

-घरातील वडिलधाऱयांमुळेच आपल्याला संस्कार मिळतात. आपल्या कर्तृत्वात त्यांचाच मोठा वाटा असतो. आपल्या संस्कृतीत आई देवापेक्षा मोठी. तुम्हाला माहीत आहेच. गणपतीने आईलाच तीन प्रदक्षिणा घातल्या, भगीरथाने पूर्वजांचे पापक्षालन करण्यासाठी गंगाच पृथ्वीवर आणली. आजच्या तरुण पिढीने मातृ, पितृ ऋण ओळखले पाहिजे. देवीचा आशीर्वाद आणि वडिलधाऱयांचे संस्कार यामुळेच तुळजाभवानीचे मंदिर साकार झाले हेच माझे पुण्यकर्म समजतो.

आधुनिक युगात देवीची गरज वाटते का?

-नक्कीच. जेव्हा जेव्हा मनुष्याची मती कमी पडते तिथेच श्रद्धेचा मार्ग सुरू होतो. सध्या आपण आणि सारे जगच कोविड महामारीतून मार्ग काढत आहोत. विज्ञानाने हात टेकले या संभ्रमावस्थेत. पण भारतीय समाज अजून स्थिर आहे. तोही परमेश्वराच्या श्रद्धेवर, देवीचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. माझी खात्री आहे या संकटसमयी मातृस्वरुप तुळजाभवानी आपल्या साऱया लेकरांवर ममतेचा वर्षाव करेल. सामर्थ्यवान भवानी माता नक्कीच आपल्याला या महामारीच्या त्रासातून मुक्त करो, हीच भवानीचरणी माझी प्रार्थना.

– प्रतिनिधी

Related Stories

डॉक्टर मी होणार

Patil_p

ऑपरेशन डिकॉय!

Patil_p

अंमली पदार्थांची नशा – गंभीर समस्या

Patil_p

प्रद्युम्न वीर झुंझार गाढा

Omkar B

आपुल्या करूनि सप्तधा मूर्ति

Patil_p

कोकणात पूररेषांचा जीवघेणा खेळ!

Patil_p
error: Content is protected !!