तरुण भारत

एका मोहिमेत दोन कारवाया फत्ते

गोव्यातील खूनप्रकरणातील दोघे संशयित सिंधुदुर्गात ताब्यात : स्थानिक गुन्हा अन्वेषणची तळेरेत कारवाई

कोल्हापूरला पलायन करण्याचा : संशयितांचा प्लॅन पोलिसांमुळे उधळला

Advertisements

कणकवली:

उत्तर गोवा येथे एका खून प्रकरणानंतर तेथून पसार होत मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात वास्तव्यास असलेल्या पवन श्रीकांत बडिगर (37, दुल्लेर शेटयेवाडी, म्हापसा – गोवा) व प्रशांत लक्ष्मण दाभोलकर (35, दाभोलीवाडा शापोरा, बार्देश – गोवा) या दोन्ही संशयित आरोपींच्या मुसक्या सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी आवळल्या. ही कारवाई तळेरे-वैभववाडी मार्गावर दुपारी पावणेएकच्या सुमारास करण्यात आली.

उल्लेखनीय म्हणजे तालुक्यातील घोणसरी येथे अवैध दारू धंद्यांवरील कारवायांसाठी एलसीबीचे पथक पहाटेपासून कार्यरत होते. तेथे तीन अवैध दारू धंद्यांवरील कारवाई यशस्वीरित्या करून परतत असतानाच या नव्या कारवाईचेही आव्हान त्यांनी पेलले व दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. दोन्ही संशयितांना गोवा पोलिसांनी कणकवलीत दाखल होत ताब्यात घेतले.

अन् एलसीबीच्या कारवाईस प्रारंभ

एलसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलसीबीचे पथक घोणसरी येथील दारू धंद्यावरील कारवाई करून तेथून बाहेर पडत फोंडाघाट बाजारपेठेत नुकतेच पोहोचले होते. त्याचवेळी पथकाला एलसीबीचे निरीक्षक सुनील धनावडे यांचा फोन आला.  उत्तर गोवा येथील खून प्रकरणातील दोन आरोपी तेथून पसार असून ते सध्या तळेरे परिसरात असल्याचे मोबाईल लोकेशननुसार समजले, अशी माहिती गोवा पोलिसांकडून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपल्या पथकाला आरोपींचे फोटोही पाठवले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने आपल्या कारवाईस प्रारंभ केला.

अन् तळेरे गाठले

पुढे कासार्डे येथे पोहोचल्यानंतर एलसीबीच्या पथकाने आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत आरोपींची माहिती घेण्यास सुरुवात केली. या माहितीत आरोपींकडे फॉर्च्युनर (जीए 09 एए 0990) कार असल्याचेही समजले. तर पुढील माहितीत आरोपी आता कोल्हापूरच्या दिशेने निघत असल्याचेही समजले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तळेरे-वैभववाडी रस्ता गाठला.

ट्रकांद्वारे कार अडविली, संशयित गजाआड

अखेरीस दुपारी 12.45 वा. सुमारास संशयित आरोपी हे फॉर्च्युनरने कोल्हापूरच्या दिशेने जाताना दिसून आले. पण, एलसीबीच्या पथकाने तत्पूर्वीच सिलिका वाळूच्या दोन ट्रकांच्या सहाय्याने रस्ता जाम केला होता. परिणामी संशयितांना पलायन करण्याची संधीच मिळाली नाही. अखेरीस दोघांना गजाआड करून कणकवली पोलीस स्थानक येथे आणण्यात आले.

एलसीबीची यशस्वी कामगिरी

दरम्यान या यशस्वी कामगिरीबाबत गोवा पोलिसांनीही सिंधुदुर्ग एलसीबीच्या कामगिरीचेही कौतूक केले. कारवाईत पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे उपनिरीक्षक सचिन शेळके, सहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, पोलीस नाईक कृष्णा केसरकर, कॉन्स्टेबल संकेत खाडे, जयेश सरमळकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर आदी सहभागी झाले होते.

संशयित आरोपी दोन दिवस सिंधुदुर्गातच चौकशीत दोन्ही संशयित आरोपींचे मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात वास्तव्य असल्याचे समजून आले. मात्र, संशयित आरोपी तेथून कुठे जाण्यास निघाले होते, हे समजू शकले नाही. दरम्यान संशयितांना सिंधुदुर्ग एलसीबीने अटक केल्याचे समजल्यानंतर गोवा पोलीसही कणकवली पोलीस स्थानकात दाखल झाले. यात गोवा येथील पोलीस निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या सहकाऱयांचा समावेश होता. गोवा पोलिसांनी आरोपींबाबत खात्री केली. त्यानंतर दोघांनाही घेऊन ते गोव्याच्या दिशेने निघाले, अशी माहिती कणकवली पोलिसानी दिली.

Related Stories

कणकवलीत दोन दुकाने आगीत बेचिराख

NIKHIL_N

टाळेबंदीतून एमआयडीसीतील उद्योगांना सूट मिळणार?

Patil_p

चिपळुणात ऐन पावसातही बेकायदा वाळू उत्खनन

Patil_p

पावसाची उसंत, कडाक्याच्या उन्हाने शेतकरी चिंतेत

Patil_p

गोडय़ा पाण्यातील मत्स्य पालनाला 100 टक्के प्रतिसाद

NIKHIL_N

गवारेडा आडवा आल्याने टेम्पो उलटला

NIKHIL_N
error: Content is protected !!