तरुण भारत

‘नीट’मध्ये मालवणचा आशिष झांटय़े राज्यात प्रथम

शहरात आनंदोत्सव : पराडची जान्हवी लाड देशात 1488 क्रमांकाने उत्तीर्ण

प्रतिनिधी / मालवण:

देशातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मालवण शहरातील आशिष अविनाश झांटय़े या विद्यार्थ्याने 720 पैकी 710 गुण मिळवून देशात 19 व राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. मालवण तालुक्यातील मूळ पराड येथील व सध्या कट्टा येथे राहणारी जान्हवी विष्णू लाड या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत देशात 1488 क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. जान्हवी हिने 720 पैकी 667 गुण मिळविले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर गेलेली नीट परीक्षा एनटीएने 13 आणि 14 ऑक्टोबर या कालावधीत घेतली. या परीक्षेसाठी देशभरातून 15 लाख 97 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 37 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही, त्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 14 ऑक्टोबर रोजी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. निकालानंतर देशभरातून सात लाख 71 हजार 500 विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यात मुलींची संख्या चार लाख 27 हजार 943 इतकी आहे. या परीक्षेत ओडिशा येथील शोएब अफताब या विद्यार्थ्याने 720 पैकी 720 गुण मिळवून देशात पहिला येण्याचा मान पटकावला. यात पहिल्या 50 मध्ये राज्यातील आशिष झांटय़े याच्यासह तेजोमय वैद्य, पार्थ कदम, अभय चिलर्गे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

तिसरी पिढीही वैद्यकीय क्षेत्रात

आशिष हा येथील हृदयरोगतज्ञ डॉ. अविनाश आणि स्त्राrरोगतज्ञ डॉ. शिल्पा झांटय़े यांचा मुलगा. ज्येष्ठ डॉ. शशिकांत झांटय़े व (कै.) सौ. डॉ. बिनता झांटय़े यांचा नातू, तर डॉ. मालविका आणि डॉ. अमोल झांटय़े यांचा पुतण्या होय. आशिषचे शालेय शिक्षण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, तर कॉलेज शिक्षण वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. आशिषच्या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, विश्वस्त डॉ. व्ही. सी. वराडकर, ऍड. एस. एस. पवार, उपाध्यक्ष आनंद वराडकर, प्रशांत टेंबुलकर, सचिव विजयश्री देसाई, सुनील नाईक, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, सहसचिव मंदार वराडकर, मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, सर्व संचालक मंडळ, प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. शनिवारी दिवसभरात आशिषच्या अभिनंदनासाठी रेवतळे येथील निवासस्थानी गर्दी झाली होती. आशिष हा दहावीत टोपीवाला जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमधून परीक्षा देत तालुक्यात पहिला आला होता.  बारावीमध्ये वराडकर इंग्लिश मीडियम सायन्स कॉलेजमधून तालुक्यात पहिला आला होता.

मालवणसाठी बहुमान

नीट परीक्षेत मालवण शहरातील आशिष झांटय़े हा पहिल्यांदाच राज्यात पहिला आल्याने मालवणवासीयांकडून आनंद व्यक्त होत आहे. आशिष याच्या रुपाने मालवणच्या इतिहासात एक सोनेरी पान लिहिले गेल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. मालवणमधून शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांनी नाव उंचावले आहे. आत आशिष याने मिळविलेले यश हे भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनीय असणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आज अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून आशिषचे अभिनंदन करण्यात आले.

आशिषचा होणार भव्य नागरी सत्कार

आमदार वैभव नाईक व मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते नीट (NEET) आशिष झांटय़े याचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. याकरिता समस्त मालवणवासीयांनी 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दैवज्ञ भवन येथे उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉक्टर होण्याचीच इच्छा – जान्हवी लाड

आपल्याला डॉक्टर होण्याचीच इच्छा होती आणि त्याच मेहनतीने आपण प्रयत्न केले. यात आई-वडील आणि कुटुंबियांची मोलाची साथ लाभली. दहावीपर्यंत ओरोस डॉन बॉस्को याठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर सांगली येथे नीटचे क्लास घेत अकरावी आणि बारावीची परीक्षा दिली. आपले टार्गेट आज पूर्ण झाले आहे. भविष्यात डॉक्टर होऊन रुग्णसेवा करणार आहे, असेही जान्हवी लाड हिने सांगितले. जान्हवी ही कट्टा येथे राहते. वडिलांचा बिल्डिंग मटेरियल पुरविण्याचा व्यवसाय आहे.

यश अपेक्षितच – आशिष झांटय़े

 आशिष याने आपल्याला रेडिओलॉजिस्ट किंवा नॉन क्लिनिकल रिसर्च इन मॉलेक्मयुलर बायोलॉजीमध्ये प्रवेश घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे. नीट परीक्षेसाठी आपण दोन वर्षे मेहनत घेतली. कॉलेज व खासगी शिकवणीच्या रोजच्या दहा-बारा तासाच्या अभ्यासाबरोबरच चार-पाच स्वयं अध्ययनदेखील करीत होतो. या परीक्षेसाठी आपण गोवा येथील आकाश इन्स्टिटय़ूटचा शिकवणी वर्ग लावला होता. राज्यात पहिला येईन, ही अपेक्षा आपण ठेवली नव्हती. पण देशात पहिल्या 50 मध्ये येईन, ही अपेक्षा होती, असे आशिष याने सांगितले. एआयआयएमएस दिल्ली किंवा केईम हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचे आहे, अशी इच्छाही आशिषने व्यक्त केली.

Related Stories

‘काजळी’मध्ये सापडली माशांची नवी प्रजात

Patil_p

साताऱ्यातील तरूणाचा महामार्गावर आत्महत्येचा प्रयत्न

triratna

अभिनेत्री प्रेमा किरण यांना जीवनगौरव तर भाषांतरकार सुनिता डागांना नारायण सुर्वे पुरस्कार

triratna

चालत्या लक्झरीला अचानक आग

NIKHIL_N

चिपळुणातील लूट करणारे डॉक्टर शिवसेनेच्या रडारवर

Patil_p

तिरवडेत सात गावांची सरपंच परिषद

NIKHIL_N
error: Content is protected !!