तरुण भारत

विजयासह ‘प्लेऑफ’ स्थान गाठण्यास मुंबई इंडियन्स सज्ज

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध आज लढत

वृत्तसंस्था / दुबई

सलग पाच विजय मिळवित मुंबई इंडियन्सची जोरदार घोडदौड सुरू असून रविवारी आयपीएलमधील त्यांची पुढील लढत गेलच्या आगमनाने संजीवनी मिळालेल्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार आहे. दिवसातील हा दुसरा सामना असल्याने सायंकाळी 7.30 वाजता त्याची सुरुवात होईल.

हा सामना जिंकल्यास मुंबई इंडियन्सचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे आणि किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव झाल्यास त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागू शकते. मुंबईने स्फोटक फलंदाजांच्या बळावर आपल्या प्रतिस्पर्ध्यावर आतापर्यंत वर्चस्व गाजविले असून त्यांना घातक गोलंदाजांची उत्कृष्ट साथही मिळाली आहे. केकेआर हा त्यांच्या धडाक्याचा फटका बसलेला शेवटचा संघ आहे. मुंबईने शुक्रवारी त्यांना तब्बल आठ गडय़ांनी एकतर्फी पराभूत केले होते. गुणतक्त्यात आघाडीवर असणाऱया मुंबईमध्ये अव्वल फलंदाजांचा भरणा असून कर्णधार रोहित शर्मा (251 धावा) व त्याचा सलामीचा साथीदार क्विन्टॉन डी कॉक (269) जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मध्यफळीत सूर्यकुमार यादव (243), इशान किशन (186) यांनीही चांगले प्रदर्शन करीत त्यांना उत्तम साथ दिली आहे.

केकेआरविरुद्ध झालेल्या सामन्यात डी कॉक उत्तम फलंदाजी करीत असल्याचे पाहून रोहित शर्माने दुय्यम भूमिका घेत त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला होता. डी कॉकने या सामन्यात 44 चेंडूत नाबाद 78 धावांची खेळी केली. गोलंदाजीत बुमराह व बोल्ट ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी वेगवान जोडी बनली असून प्रत्येकाने आतापर्यंतच्या 8 सामन्यात 12 बळी मिळविले आहेत. स्पिनर राहुल चहरने केकेआरविरुद्ध 18 धावा देत 2 बळी मिळविले होते. याउलट सर्वाधिक धावा जमविणारे दोन फलंदाज  किंग्स इलेव्हन पंजाब संघात असूनही गुणतक्त्यात त्यांचा संघ खालच्या विभागात आहे. कर्णधार केएल राहुलने 387 तर त्याचा साथीदार मयांक अगरवालने 337 धावा जमविल्या आहेत.

फलंदाजी व गोलंदाजी यांची एकसंध कामगिरी न होणे ही पंजाब संघाची मुख्य समस्या बनली आहे. अनेक सामन्यात हे दिसून आले आहे. गेलच्या आगमनाने या संघाचा आत्मविश्वास दुणावलेला असून त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात आपला धडाका दाखवून देत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 5 षटकार, एक चौकारासह 45 चेंडूत 53 धावा फटकावत आरसीबीविरुद्धच्या विजयात मोलाचे योगदान दिले. रविवारच्या सामन्यात गेल विरुद्ध बुमराह-बोल्ट अशी जुगलबंदी पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे. राहुल व अगरवालशिवाय पंजाबचे आणखी काही फलंदाजही फॉर्ममध्ये आहेत. मात्र गोलंदाजी हा त्यांचा कच्चा दुवा बनला आहे. शमी व बिश्नोई वगळता अन्य गोलंदाजांना विश्वासपूर्वक गोलंदाजी करता आलेली नाही, विशेषतः डेथओव्हर्समध्ये. त्यांनी अनेक पर्यायांचा अवलंब करून पाहिला आहे. पण त्यांना योग्य समतोल साधता आलेला नाही, हेही त्यांच्या घसरणीचे एक कारण आहे.

संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक व कृणाल पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, पोलार्ड, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.

किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत ब्रार, इशान पोरेल, मनदीप सिंग, नीशम, तजिंदर सिंग, जॉर्डन, करुण नायर, दीपक हुडा, बिश्नोई, अर्शदीप सिंग, मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सर्फराज खान, कॉट्रेल, अगरवाल, शमी, दर्शन नलकांडे, निकोलस पूरन, गेल, एम.अश्विन, जगदीशा सुचित, के. गौतम, व्हिलोएन.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

Related Stories

यशस्विनी देसवालला सुवर्णपदक

Patil_p

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धात कोरे इंग्लीस अकॅडमी तृतीय

triratna

जोश्ना चिन्नप्पा उपांत्यपूर्व फेरीत

omkar B

महान अष्टपैलू इयान बोथम ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’चे मानकरी

Patil_p

गोलंदाजी करण्यासाठी होल्डर सज्ज

Patil_p

बलबिर सिंग सिनियर यांना राष्ट्रीय सन्मान मिळावा

Patil_p
error: Content is protected !!