तरुण भारत

पहिल्या टप्प्यात 30 कोटी लस

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोना विषाणूची लस पुढील वर्षाच्या सुरुवातीस येण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागताच आता सरकारने लस साठवण आणि वितरणासंदर्भात तयारी वाढविली आहे. तसेच कोरोना विषाणूविरोधातील लसनिर्मिती सध्या निर्णायक टप्प्यावर आल्यामुळे आता प्राधान्यक्रम ठरवायलाही सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 30 कोटी लोकांना लसीकरणामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. यामध्ये कोरोनाशी थेट लढा देणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांना लस टोचली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच विविध आजारांनी ग्रस्त असल्यामुळे कोरोना होण्याचा धोका अधिक असलेल्या रुग्णांनाही ही लस पुरविली जाणार आहे.

लस व्यवस्थापनासाठी बनवण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ञांच्या समितीने अंमलबजावणीच्या योजनेचा आराखडा तयार केला आहे. केंद्रीय संस्था आणि राज्यांकडून माहिती घेऊन त्यावर काम सुरू आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल या तज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत. पहिल्या टप्प्यात 23 टक्के लोकांचे लसीकरण करण्याची योजना आहे. कोरोनाविरोधातील लस आल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांच्या लसीकरणासाठी जवळपास 60 कोटी लसीचे डोस लागणार आहेत. त्या अनुषंगाने शासकीय व खासगी पातळीवरील कोल्ड स्टोरेजवर लक्ष केंद्रित केले जात आहे. बहुतेक लस ठराविक तापमानात ठेवल्यानंतरच वितरित करावी लागत असल्यामुळे वैद्यकीय यंत्रणेला भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे. जर तापमानात बदल झाला तर लस खराब होऊ शकते. त्या अनुषंगाने डॉ व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ गटाने कोल्डस्टोरेज व्यवस्थेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

लस देण्याच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत एकूण चार गट आहेत. यात 50 ते 70 लाख आरोग्य कर्मचाऱयांचा समावेश आहे. तसेच दोन कोटीहून अधिक पोलीस, महापालिका कर्मचारी आणि सैन्य दलातील जवान-अधिकाऱयांनाही पहिल्या टप्प्यातच लस दिली जाईल. देशात साधारणपणे 50 वर्षांहून अधिक वयोमान असलेल्या लोकांची संख्या 25 कोटीहून अधिक असून त्यांनाही पहिल्या टप्प्यातच लस देण्याचा विचार सुरू आहे. त्याचबरोबर ‘को-मोर्बिडीटी’ अर्थात व्याधींनी ग्रस्त असलेल्या जवळपास एक ते दीड कोटी नागरिकांचाही समावेश त्यात केला जाणार आहे.

‘सिरम’च्या लसीकडे अधिक लक्ष

भारतात सध्या तीन लसी चाचणीच्या वेगवेगळय़ा टप्प्यावर आहेत. यात ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाची लस सर्वात शेवटच्या म्हणजे तिसऱया फेजमध्ये आहे. भारतात या लसीचे उत्पादन करणारी सिरम इन्स्टियूट या लसीची मानवी चाचणी करत आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात यशस्वीतेसंबंधीची माहिती उपलब्ध होईल, असा दावा करण्यात येत आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आगामी अडीच महिने महत्त्वाचे

थंड हवामान आणि सणासुदीचे दिवस पाहता पुढचे अडीच महिने कोरोनाविरुद्धच्या युद्धात अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये. तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये असे प्रयत्न प्रत्येकाने करावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. देशातील तीन कोरोना लसींची चाचणी आता प्रगतीपथावर आहे. सध्या एक लस तिसऱया टप्प्यात असून दोन लसींची दुसरी क्लिनिकल चाचणी सुरू आहे. जर सर्व काही ठीक झाले तर देशात लवकरच देशी कोरोना लसीचे उत्पादन सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात सीएसआयआरच्या परिषदेत ते बोलत होते.

Related Stories

कौतुकास्पद! जागतिक आरोग्य संघटनेत भारताच्या डॉ. हर्षवर्धन यांना मानाचं स्थान

omkar B

राजस्थानमध्ये 91 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 4 हजार 838 वर

pradnya p

आसाम : 12 हजार डुक्करांना ठार मारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

datta jadhav

शिरोमणी अकाली दलानंतर ‘जेजेपी’ची साथ सोडणार ?

Patil_p

दिल्लीत 106 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

pradnya p

तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार

Patil_p
error: Content is protected !!