तरुण भारत

मुंडवेल वाडे वास्कोत पुन्हा दरड कोसळली, मात्र हानी टळली

प्रतिनिधी/ वास्को

मुंडवेल वाडे वास्को येथील डोंगरावर कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या काही दरडीपैकी एक दरड शनिवारी पहाटे कोसळली. मात्र, या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. महिनाभरापूर्वी याच डोंगरावरून कोसळलेल्या दरडीमुळे घरात झोपलेल्या एका महिलेचा बळी गेला होता. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासन काहीच करीत नसल्याने या डोंगराखालील कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महिनाभरापूर्वी मुंडवेल वाडेतील अनिता अशोक बोरकर या महिलेला डोंगरावरून कोसळलेली दरड घरात घुसल्याने मृत्यू आला होता. या घटनेत घराचीही पूर्णपणे हानी झाली होती. मागच्या पाच वर्षांपूर्वी या भागातील काही कुटुंबांना डोंगरावरील दरडींचा धोका सतावत आहे. अनेक तक्रारी करून हा धोका दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न झालेले नाहीत. मात्र, मागच्या महिन्यात दरड कोसळून महिलेचा मृत्यू होताच प्रशासन पुन्हा जागे झाले होते. स्थानिक लोकांनीही या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला होता. या घटनेची शासकीय अधिकाऱयांनी पाहणी करून धोका दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या प्रश्नी अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. काही कुटुंबांना दरडींच्या धोक्यामुळे घर सोडावे लागलेले आहे. तर काही कुटुंबे जीवावर उधार होऊन या ठिकाणी दिवस काढीत आहेत.

जास्त पाऊस पडू लागल्यावर दरडी कोसळण्याचा धोका वाढत असतो. मागच्या महिन्यात पावसाच्या दिवसांतच दरड कोसळण्याची घटना घडली होती. हल्ली पुन्हा काही दिवस जोरदास पाऊस पडल्याने शनिवारी पहाटे चारच्या त्या डोंगरावरील एक दरड पुन्हा कोसळली. मात्र, या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. अद्यापही काही दरडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पुन्हा येथील समस्येची पाहणी केली. या समस्येचा पाठपुरावा करूनही प्रशासन काहीच करीत नसल्याची हतबलता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सां.बा.खा. व जलस्त्रोत विभागाचा धोका दूर करण्याची जबाबदारी स्विकारण्यास नकार

मिळालेल्या माहितीनुसार या गंभीर समस्येचा पाठपुरावा स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही केलेला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच जलस्त्रोत खातेही दरडींचा धोका दूर करण्याचे काम करण्यासाठी तयार नसल्याचे दिसून येते. मुरगावच्या मामलेदार कार्यालयाने यासंबंधी दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला हल्लीच पत्र पाठवले आहे. मागच्या महिन्यात दुर्घटना घडल्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी धोका दूर करण्यासाठी उपाययोजनेचा प्रस्ताव सादर करण्याची सुचना सार्वजनिक बांधकाम खात्याला केली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप या कामासाठी प्रस्ताव किंवा अंदाजीत खर्चाचा अहवाल दिलेला नसल्याचे मामलेदारांनी स्पष्ट केले आहे.

यासंबंधी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी घेतलेल्या एका बैठकीत सार्वजनिक बांधकाम खाते तसेच जलस्त्रोत खात्याच्या उपस्थित अधिकाऱयांसमोर दरडींचा धोका दूर करण्याच्या कामाबद्दल विचारणा केली होती. मात्र, या खात्यांच्या अधिकाऱयांनी या कामाची जबाबदारी घेण्याचे नाकारले होते. सदर काम आमच्या विभागाच्या अखत्यारीत येत नसल्याचे स्पष्टीकरण या अधिकाऱयांनी दिले होते. त्यामुळे आमदारांच्या सुचनेनुसार मुरगाव मामलेदार कार्यालयाने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांना यासंबंधी कल्पना देऊन दरडींचा धोका दूर करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची विनंती केली होती. मात्र, महिनाभरात दुसरी दरड कोसळली तरी प्रशासनाला जाग येत नसल्याबद्दल स्थानिक रहिवासीयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Related Stories

पणजीच्या विकासावर भर

omkar B

भरमसाठ वीजबिलांविरोधात काँग्रसचे पणजीत आंदोलन

omkar B

मंत्री दीपक पाऊसकर यांचा वाढदिवस विशेष मुलांसोबत

Patil_p

नागरिकत्व कायदय़ाच्या अमलबजावणीसाठी जनतेकडून व्यापक पाठींबा- माविन गुदिन्हो

Patil_p

किर्लोस्कर मोटरची टोयोटा अर्बन प्रुजर सादर

Patil_p

बायंगिणी कचरा प्रकल्पासाठी पर्यावरण मंडळाचा नाहक दाखला मंजूर

Patil_p
error: Content is protected !!