तरुण भारत

विलास मेथर खून प्रकरणी चौघांना अटक

दोघांना गोव्यातून तर दोघांना सिंधुदुर्गातून ताब्यात सुपारी देऊन काढला काटा

प्रतिनिधी/ पणजी, पर्वरी

 साल्वादोर दु मुन्दू पंचायत क्षेत्रातील तोर्ड-पाटो येथे भर रस्त्यावर दिवसाढवळय़ा विलास मेथर यांच्यावर पेट्रोल टाकून जाळून मारल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. भर रस्त्यावर दिवसाढवळय़ा एका व्यक्तीला जाळून मारण्याचा गोव्यात पहिलाच प्रकार असून संपूर्ण गोव्यात खळबळ माजली होती. विविध राजकीय पक्षांनी तसेच समाजसेवकांनी संशयितांना अटक करण्याची मागणी करताना पर्वरी पोलीस स्थानकावर मोर्चे नेले होते. 48 तास झाले तरी संशयितांना अटक होत नसल्याने पोलिसांच्या कामकाजावर लोकांनी संशय व्यक्त केला होता. अखेर खून प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणात आणखीनही काहीजण गुंतलेले असून पोलीस त्यांना अटक करण्याच्या मार्गावर आहेत.

रिमांडसाठी आज न्यायालयात

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये पवन श्रीकांत बडिगर (37, धुळेर शेटयेवाडी, म्हापसा – गोवा) व प्रशांत लक्ष्मण दाबोलकर (35, दाभोलीवाडा शापोरा, बार्देश – गोवा) या दोन्ही संशयित आरोपींच्या मुसक्या सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने आवळल्या. ही कारवाई तळेरे-वैभववाडी मार्गावर दुपारी पावणेएकच्या सुमारास करण्यात आली. दोन्ही संशयितांना गोव्यात आणल्यानंतर खून प्रकरणातील सूत्रधार अल्ताफ बट्टेकर व खय्याद शेख यांना गोवा पोलिसांनी अटक केली. आज त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

खून प्रकरणानंतर गोव्यातून पसार

खून प्रकरणानंतर संशयित पवन व प्रशांत हे गोव्यातून पसार होत मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात वास्तव्यास करून राहिले होते. अवैध दारू धंद्यांवरील कारवायांसाठी एलसीबीचे पथक पहाटेपासून कार्यरत होते. त्याचवेळी संशयिताबाबत एलसीबीच्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कारवाई करून दोन्ही संशयितांना त्वरित ताब्यात घेतले. नंतर गोवा पोलिसांनी कणकवलीत दाखल होत संशयितांचा ताबा घेतला.

अन् एलसीबीच्या कारवाईस प्रारंभ

पर्वरी खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गोव्यातून पसार असून ते सध्या तळेरे परिसरात असल्याचे मोबाईल लोकेशननुसार समजले, अशी माहिती गोवा पोलिसांकडून सिंधुदुर्ग पोलिसांना मिळाली होती. तसेच त्यांनी आपल्या पथकाला आरोपींचे फोटोही पाठवले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने आपल्या कारवाईस प्रारंभ केला.

अन् तळेरे गाठले

पुढे कासार्डे येथे पोहोचल्यानंतर एलसीबीच्या पथकाने आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत आरोपींची माहिती घेण्यास सुरुवात केली. या माहितीत आरोपींकडे फॉर्च्युनर (जीए 09 एए 0990) कार असल्याचेही समजले. तर पुढील माहितीत आरोपी आता कोल्हापूरच्या दिशेने निघत असल्याचेही समजले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तळेरे-वैभववाडी रस्ता गाठला.

अशी झाली संशयितांना अटक

अखेरीस दुपारी 12.45 वा. सुमारास संशयित आरोपी हे फॉर्च्युनरने कोल्हापूरच्या दिशेने जाताना दिसून आले. पण, एलसीबीच्या पथकाने तत्पूर्वीच सिलिका वाळूच्या दोन ट्रकांच्या साहाय्याने रस्ता अडविला होता. परिणामी संशयितांना पलायन करण्याची संधीच मिळाली नाही. अखेरीस दोघांना गजाआड करून कणकवली पोलीस स्थानकात आणण्यात आले.

संशयित आरोपी दोन दिवस सिंधुदुर्गातच

चौकशीत दोन्ही संशयित आरोपींचे मागील दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात वास्तव्य असल्याचे समजून आले. मात्र, संशयित आरोपी तेथून कुठे जाण्यास निघाले होते, हे समजू शकले नाही. दरम्यान, संशयितांना सिंधुदुर्ग एलसीबीने अटक केल्याचे समजल्यानंतर गोवा पोलीसही कणकवली पोलीस स्थानकात दाखल झाले. गोवा पोलिसांनी आरोपींबाबत खात्री केली. त्यानंतर दोघांनाही घेऊन ते गोव्यात आले. नंतर त्यांची कसून चौकशी केली असता अल्ताफ बट्टीकर व खय्याद शेख यांना अटक करण्यात आली.

गोमेकॉत उपचारा दरम्यान मृत्यू

साल्वादोर दु मुन्दू पंचायत क्षेत्रातील तोर्ड पाटो येथे रस्त्यावर वाहन अडवून संशयितांनी विलास मेथर यांच्यावर वाहनात बसलेल्या जागीच पेट्रोल टाकले व आग लावून पेटविले होते. बुधवार 14 रोजी दिवसाढवळ्या भर रस्त्यावर ही घटना घडली होती. मेथर यांच्या अंगावरील कपडय़ांनी पेट घेतल्याने ते अर्ध्याअधिक भाजले होते. त्यांना त्वरित गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना दुसऱया दिवशी गुरुवारी मेथर यांचे निधन झाले होते. आगीत होरपळत असतानाही मेथर यांनी स्वतःला वाचविण्यासाठी शेतात उडी घेतली होती. रस्त्यावरून ये-जा करणाऱया लोकांनी आरडाओरड केल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरून पोबारा केला होता.

अखेर संशयित गजाआड

गोव्यातील ही पहिलीच घटना असून पर्वरी परिसर हादरून गेला होता. संशयितांना अटक करा, अशी मागणी करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी तसेच समाजसेवकांनी पर्वरी पोलीस स्थानकावर मोर्चाही नेले होते. जवळपास 48 तास उलटूनही संशयितांवर कारवाई होत नसल्याने लोकांनी संताप व्यक्त केला होता. तसेच पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला होता. ज्येष्ठ अधिकाऱयांपासून ते कनिष्ठ अधिकाऱयापर्यंत सर्वच अधिकारी तपासकामात गुंतले होते. अखेर संशयितांना गजाआड करण्यास पोलीस यशस्वी झाले. 

सदनिकेतील जागेवरून वाद 

विलास मेथर चावडेवर धनवाडी येथे फ्लॅटमध्ये राहत होते त्यांचे साल्वादोर दु मुन्दू पंचायतीत दुकान आहे. दुपारी 1.15 वा. च्या सुमारास ते दुकान बंद करून घरी आपल्या जीए 03 आर 5727 कारने जात होते. ते तोर्ड पाटो रस्त्याने वाहन हाकताना पाटो रस्त्यावर ही घटना घडली होती. मेथर राहत असलेल्या सदनिकेतील जागेवरून वाद चालू होता. त्यासंदर्भात पंचायत कार्यालयात इमारत ठेकेदाराविरुद्ध बेकायदेशीर बांधकामावरून तक्रार दाखल करण्यात आली होती. पंचायत सचिवांनी 20 ऑक्टोबर रोजी बांधकाम पहाण्यासाठी तारीख निश्चित केली होती. त्या संदर्भात बुधवारी सचिवांची भेट घेऊन चर्चा केली होती. पंचायतीने जवळजवळ बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास मंजुरीही दिली होती. या घडामोडी नंतर दुपारी मेथर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. पूर्वनियोजित कट करूनच मेथर यांचा खून केला असल्याच्या संशयावरून अल्ताफ व खय्याद शेख यांना अटक केली आहे. दोघेही संशयित पेशाने बिल्डर असून ज्या बांधकामाला मयत मेथर यांनी विरोध केला होता त्या बिल्डिंगमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

या प्रकरणात अनेकांचे हात गुंतलेले असून पोलीस कसून तपास करीत आहेत. त्यामुळे आणखीनही काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. 

Related Stories

बाधितांची संख्या आज होणार 10 हजार पार

Patil_p

चंदेरी सुंदरी राणी स्पर्धेत सानिशा, बॅनेट बनल्या विजेत्या

Patil_p

कोरोनामुळे जनतेने सरकारला दोष न देता स्वताची काळजी घ्यावी

Patil_p

मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याच्या अफवेने पळापळ.

tarunbharat

कोरोना रुग्णांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा

Patil_p

केपे, तिळामळ, जांबावली परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम

omkar B
error: Content is protected !!