सेन्सेक्स 113 तर निफ्टी 23.75 अंकांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी जागतिक बाजारातील तेजीच्या संकेतामुळे देशातील शेअर बाजार मजबूत स्थितीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 113 अंकांनी वधारुन निर्देशांक 40,500 च्या वर पोहचला. हेच वातावरण राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीतही दिसून आले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मजबूतीने सेन्सेक्स दिवसअखेर 113 ने वधारुन 40,544.37 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 23.75 अंकांच्या वधारासह 11,896.80 अंकावर स्थिरावला आहे. बाजारात एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि इन्फोसिसच्या समभागांची मागणी वाढल्याने शेअर बाजार मजबूत स्थितीत राहिल्याची नोंद करण्यात आली.
दिग्गज कंपन्यांमध्ये एचसीएल टेकचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. सोबत टेक महिंद्रा, एशियन पेन्ट्स, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो, टीसीएस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, नेस्ले इंडिया आणि इन्फोसिस तेजी नोंदवत बंद झाले. तर दुसरीकडे ओएनजीसी, पॉवर ग्रिड कॉर्प, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, एचडीएफसी आणि स्टेट बँकचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. मात्र एकंदर प्रभाव तेजीवाल्यांचा होता.
प्रमुख कंपन्यांमध्ये खरेदी
देशातील बाजारात प्रामुख्याने एचडीएफसी बँक, एचसीएल टेक आणि टीसीएस यासारख्या समभागांची मोठय़ा प्रमाणात खरेदीचे झाल्याचे दिसून आले. यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर मुख्य बाजारात सकारात्मक कल राहिल्याचा लाभही गुंतवणूकदारांनी घेतल्यानेच शेअर बाजाराला आपली तेजी कायम ठेवण्यात यश मिळाले आहे.
जागतिक पातळीवर शांघाय, हाँगकाँग आणि सोल शेअर बाजार तेजीत बंद झाले आहेत. तर टोकीओ बाजाराची घसरण झाली होती. युरोपचे शेअर बाजार प्रारंभीच्या काळात तेजीत होते. पण ते वातावरण नंतर राहिल्याचे दिसून आले नाही.