तरुण भारत

चेन्नईचा डेव्हॉन ब्रेव्हो आयपीएल हंगामातून बाहेर

चेन्नई सुपरकिंग्स संघातील अष्टपैलू डेव्हॉन ब्रेव्हो यंदाच्या उर्वरित आयपीएल हंगामातून बाहेर फेकला गेला आहे. बुधवारी चेन्नई संघव्यवस्थापनाकडून ही माहिती देण्यात आली. ब्रेव्होला धोंडशिरेची दुखापत झाली आणि ती चिघळत राहिल्याने तो आणखी खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. चेन्नई सुपरकिंग्स संघाचे यंदाच्या हंगामातील आव्हान जवळपास संपुष्टात आले असून चमत्कार घडला तरच त्यांना प्ले-ऑफची आशाअपेक्षा करता येणार आहे. उर्वरित चारही सामने जिंकायचे आणि अन्य संघांची कामगिरी आपल्या आवश्यकतेनुरुप व्हावी, हा चमत्कार घडला नाही तर यंदाच्या आयपीएल हंगामातील चेन्नईचे आव्हान संपुष्टात आलेले असणार आहे.

37 वर्षीय ब्रेव्हो मागील काही हंगामांपासून सातत्याने चेन्नई सुपरकिंग्स संघाचा सदस्य राहिला आहे. पण, दि. 17 ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या लढतीत त्याला शेवटचे षटक टाकता आले नव्हते. त्याच्या गैरहजेरीत धोनीने जडेजाकडे चेंडू सोपवला आणि चेन्नईला त्यात पराभव स्वीकारावा लागला होता.

अक्षर पटेलने त्यावेळी जडेजाच्या गोलंदाजीवर 3 उत्तूंग षटकार खेचले होते. धोनीसमोर त्यावेळी जडेजा व कर्ण शर्मा असे पर्याय होते आणि कर्णपेक्षा रविंद्र जडेजा अनुभवी असल्याने त्याला तो पर्याय निवडणे भाग होते.

दरम्यान, ब्रेव्होची दुखापत चिघळत गेली आणि अंतिमतः तो खेळू शकणार नसल्याची घोषणा सीएसके व्यवस्थापनाला करावी लागली. चेन्नई सुपरकिंग्स प्रँचायझी सीईओ काशी विश्वनाथन यांनी ब्रेव्होबाबत माहिती दिली. ब्रेव्होने या हंगामात 6 सामने खेळले व 2 डावात फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर त्यात केवळ 2 धावा केल्या. पण, या सामन्यात त्याने 8.57 च्या इकॉनॉमीने 6 बळी घेतले आहेत. चेन्नई गुणतालिकेत सध्या तळाच्या स्थानी असून त्यांना पहिल्या 10 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत.

चेन्नईला या हंगामात सातत्याने अनेक फटके बसले आहेत. प्रारंभी, त्यांच्या पथकातील 13 सदस्य कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चेन्नईचा क्वारन्टाईन कालावधी वाढवावा लागला आणि यामुळे या संघातील खेळाडूंना नाईलाजाने बऱयाच उशिराने सुरुवात करावी लागली होती.

त्यानंतर सुरेश रैनाने संयुक्त अरब अमिरातीत पोहोचल्यानंतर देखील स्पर्धेला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.

इतके धक्के पचवत असताना हरभजन सिंगने आपण यंदाच्या हंगामातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. रैना व हरभजन या उभयतांनीही वैयक्तिक कारणास्तव आपण खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट केले.

Related Stories

चेन्नईच्या खात्यावर असाही संयुक्त विक्रम

Patil_p

सरावाच्या सामन्यात रहाणे, पुजाराची चमक

Patil_p

विदित गुजराथी जिंकला पण भारताची बरोबरी

Patil_p

फुटबॉल हंगामाला ब्रेक : लाखोंची उलाढाल ठप्प

Shankar_P

लुईस हॅमिल्टन ‘नाईटहूड’ने सन्मानित

Patil_p

विंडीज खेळाडूंच्या बांगलादेशमध्ये अनेक चाचण्या होणार

Patil_p
error: Content is protected !!