तरुण भारत

पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणी

पूरपरिस्थितीची घेतली माहिती : आणखी मदतनिधी मंजूर करण्याचे आश्वासन

प्रतिनिधी / बेंगळूर

Advertisements

आठवडाभरापासून होत असलेल्या पावसामुळे उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हय़ांना फटका बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बुधवारी गुलबर्गा, रायचूर आणि यादगिर जिल्हय़ांमधील पूरग्रस्त भागाची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. खराब हवामानामुळे त्यांनी विजापूर जिल्हय़ातील पूरस्थितीचा पाहणी दौरा रद्द केला. वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करून पूरग्रस्तांसाठी आणखी आर्थिक मदत मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

गृहमंत्री बसवराज बोम्माई, पशूसंगोपन मंत्री प्रभू चौहान यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची हवाई मार्गाने पाहणी केली. त्यानंतर गुलबर्गा विमानतळावर त्यांनी गुलबर्गा, यादगिर, बळ्ळारी आणि बिदर जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली. याप्रसंगी येडियुराप्पा यांनी पूरग्रस्तांसाठी मदतनिधी वाढविण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत द्या. मदत देण्यास विलंब करू नका, अशी ताकिद त्यांनी दिली.

3-4 दिवसांत संपूर्ण अहवाल सादर करा

राज्य सरकार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कटिबद्ध आहे. सरकारने अलिकडेच मदतनिधी मंजूर केला आहे. आणखी मदत हवी असेल तर त्वरित मंजूर करण्यात येईल. मात्र, अनुदान नसल्याचे कारण सांगून मदतकार्यास विलंब होता कामा नये. पूरस्थितीसंदर्भात 3-4 दिवसांत संपूर्ण अहवाल सादर करा. या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे आपण अधिक मदतनिधीसाठी विनंती करणार आहे. राज्य सरकारकडून पत्र गेल्यानंतर केंद्रीय पथक राज्यात दाखल होऊन पाहणी करेल. त्यामुळे केंद्राला आवश्यक माहिती देण्यासाठी सहकार्य करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱयांना दिली.

पूरग्रस्तांसाठी देण्यात येणाऱया आर्थिक मदतीची रक्कम वाढविण्यात आली आहे. यासंबंधी सरकारने अधिकृत आदेश दिला आहे. या आदेशानुसार पूर आणि अतिवृष्टीमुळे संपूर्ण घर कोसळल्यास 5 लाख रुपये, 25 ते 75 टक्क्यांपर्यंत घराची हानी झाल्यास 3 लाख रुपये आणि 15 ते 25 टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्यास 50 हजार रुपये देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे पूरग्रस्त कुटुंबांना कपडे व दैनंदिन वस्तू खरेदीसाठी तातडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याचाही आदेशात उल्लेख असल्याचे येडियुराप्पा यांनी यावेळी सांगितले.

खराब हवामानामुळे : विजापूर जिल्हा दौरा रद्द

मुख्यमंत्री येडियुराप्पा बुधवारी विशेष विमानाने बेंगळूरहून बळ्ळारीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरमधून रायचूर, यादगिर व गुलबर्गा जिल्हय़ातील पूरस्थितीची पाहणी केली. नंतर गुलबर्गा विमानतळावर अधिकाऱयांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. भोजनानंतर ते विजापूर जिल्हय़ातील पूरस्थितीची पाहणी करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण शक्य नसल्याचे विमानतळ अधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा विजापूर जिल्हा दौरा रद्द झाला.

Related Stories

टिळकवाडीत आणखी दोन उड्डाणपूल होणार

Patil_p

वडगाव परिसरातून शुभम शेळके यांना पाठिंबा

Amit Kulkarni

प्रेंड्स सर्कलतर्फे सुनीता देशपांडे-बुद्धय़ाळकर यांना श्रद्धांजली

Patil_p

संगीताने दिला वृद्धांना आनंद

Patil_p

शहरातल्या 27 मिळकतींची पुन्हा हेरिटेजमध्ये नोंद

Patil_p

मनपाचे 85 पैकी केवळ 20 गाळे भाडेतत्त्वावर

Omkar B
error: Content is protected !!