एकनाथ गावकर
केपे: निसर्गाच्या छायेत वेळ सारताना माणूस अनेक छंदांकडे जसा आपोआपच वळतो तसेच कौशल्येहि संपादन करतो. असेच एक वेगळे कौशल्य तेळय-बासरय, बाळ्ळी येथील ५८ वर्षीय नीलावती ऊर्फ शब्दुले काठू गावकर या महिलेकडे आहे. नारळ सोलण्याकारिता सहसा कोयता किंवा इतर अवजाराची गरज लागते मात्र नीलावती या चक्क दातांनी नारळ सोलतात.
सहसा सफरचंद वा इतर काहि फळे खाताना सुद्धा ते कापण्यासाठी सुरी किंवा इतर हत्यारांचा उपयोग केला जातो. घट्ट असलेले खाद्य खाताना दात दुखायला लागतात किंवा दाताच्या अन्य समस्या उद्भवतात. म्हणून शक्यतो खाण्याची कोणतीहि घट्ट वस्तू आम्ही कापून किंवा मऊ करून खाण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी एका ग्रामीण भागातील महिलेने लहानपणापासून चक्क दातांनी नारळ सोलणे हे निश्चितच लक्षवेधी आहे.
शहाळी सोलण्यापासून प्रारंभ
नीलावती गावकर या बाळ्ळीपासून नऊ-दहा किलोमीटर दूर असलेल्या गावातील रहिवासी आहेत. त्यांचा मूळ गाव बेदुर्डे-बाळ्ळीअसून त्या लहानपणी गुरांना घेऊन रानात चरायला जात असत. तेव्हा भूक लागल्यावर त्या आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने माडाची शहाळी काढायच्या व ती सोलण्याकरिता कोणतेहि हत्यार नसल्याने दातांनी सोलण्याचा प्रयत्न करायच्या. अवघ्या 9-10 वर्षांच्या असताना त्यांना दातांनी शहाळी सोलून खाण्याची सवय लागली. मोठ्या झाल्यावर शहाळी जर दातांनी सोलू शकतो तर नारळ का नाहि असा त्यांनी विचार केला आणि त्याच जिद्दीने त्यांनी नारळ सोलण्याचा प्रयत्न केला.
अनेक व्यासपीठांवरून कौशल्य सादर
नीलावती यांनी आपल्या अंगी असलेले हे कौशल्य तसेच कायम ठेवले असून आज वयाच्या ५८ व्या वर्षीही त्या दातांनीच नारळ सोलतात. त्यांनी आजपर्यंत हजारो नारळ आपल्या दातांनी सोललेले आहेत. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत तसेच कला अकादमीसारख्या अनेक व्यासपीठांवर नारळ सोलण्याचे आपले कौशल्य त्यांनी सादर केले असून प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कधीच टुथपेस्टचा उपयोग केलेला नाहि. त्या नित्यनेमाने आंब्याचे पान, कोळसा यांनीच दात घासत असतात,
चांगल्या लोककलाकार
जिद्द बाळगत दातांनी नारळ सोलण्याचे कौशल्य नीलावती यांनी आत्मसात केले आहे. मात्र त्यांच्याकडून हे कौशल्य आत्मसात करून घेण्यासाठी कोणी पुढे आलेले नाहि. तसेच त्यांच्या या कौशल्याची सरकार किंवा सामाजिक, सांस्कृतिक संस्थानी हवी तशी दखल घेतलेली नाहि. त्या फक्त दातांनी नारळच सोलत नसून त्या उत्कृष्ट लोककलाकारहि आहेत. धालो, फुगडीबरोबर त्यांना समईनृत्य, गोफ, कळशीनृत्य, यासारखे अनेक लोकनृत्य प्रकार येतात. त्यांनी अनेक व्यासपीठांवरून आपली कला सादर केलेली आहे. तसेच त्या उत्कृष्ट घुमटवादकहि आहेत. लोकगीते, लोकनृत्ये यांच्या त्या जाणकार तर आहेतच, त्याचबरोबर त्यांना पुराणकाणीचिहि बरीच जाण आहे.
नीलावती यांनी आतापर्यंत अनेक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकनृत्यांचे प्रशिक्षण दिलेले आहे. एका बाजूने कला व कलाकरांना प्रोत्साहन देण्याकरिता कला व सांस्कृतिक खाते, सरकार कटिबद्ध असल्याचे सांगते. मात्र अशी विविध कौशल्ये असलेले अनेक जण ग्रामीण भागात पहायला मिळतील. त्यांना योग्य व्यासपीठ, मान-सन्मान देण्याची गरज आहे.


previous post