तरुण भारत

वनडे, टी-20 मालिका सिडनी, कॅनबेरात होणार

भारतीय संघाला क्वारंटाईनमध्ये सराव करण्याची न्यू साऊथ वेल्सकडून परवानगी

वृत्तसंस्था/ सिडनी

Advertisements

पुढील महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार असून या दौऱयातील मर्यादित षटकांच्या मालिका सिडनी व कॅनबेरा येथे होण्याचे निश्चित झाले आहे. न्यू साऊथ वेल्स राज्य सरकारने क्वारंटाईन कालावधीत दोन्ही संघांना सराव करण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलिया व एनएसडब्ल्यू यांच्यात गुरुवारी करार झाला आहे.

भारतीय संघ ब्रिस्बेनमध्ये उतरण्याचे आधी ठरले होते. पण क्वीन्सलँडचे आरोग्याधिकारी 14 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत भारतीय संघाला सराव करण्याची परवानगी देणार नाहीत, असे वाटल्याने एनएसडब्ल्यूकडे त्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यामुळे भारतीय संघ आता सिडनीमध्ये सर्वप्रथम प्रवेश करणार आहे. या शहरात त्यांना क्वारंटाईनमध्ये असतानाही सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मर्यादित षटकांचे सहापैकी चार सामने सिडनीत खेळविले जातील तर कॅनबेरातील मनुका ओव्हलवर दोन सामने खेळविले जाणार आहेत. या मालिकेत 3 टी-20 व 3 वनडे सामने होणार आहेत. पहिले दोन वनडे सामने 27 व 29 नोव्हेंबर रोजी सिडनीत तर शेवटचा सामना कॅनबेरामध्ये होईल. त्यानंतर पहिला टी-20 सामनाही कॅनबेरातच झाल्यानंतर सिडनीमध्ये उर्वरित दोन सामने घेण्यात येणार आहेत.

गुलाबी चेंडूची डे-नाईट कसोटी ऍडलेडमध्ये 17-21 डिसेंबर या कालावधीत खेळविली जाईल. बॉक्सिंग डे कसोटी 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पण मेलबर्नमधील कोरोना महामारीची स्थिती बिकट झाल्याने परवानगी न मिळाल्यास ही कसोटी देखील ऍडलेडमध्येच खेळविण्यात येणार आहे. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुधारित कार्यक्रमाचा पूर्ण तपशील बीसीसीआयकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. सिडनीत होणारी नववर्षातील कसोटी आता 7 ते 11 जानेवारीपर्यंत होईल आणि चौथी व शेवटची कसोटी 15 जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये घेतली जाणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत व ऑस्ट्रेलिया संघांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व त्या कालावधीत सराव करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली असल्याचे न्यू साऊथ वेल्सचे क्रीडामंत्री स्टुअर्ट आयरेस यांनी सांगितले होते.  या प्रस्तावाचा संबंधित अधिकाऱयांकडून आढावा घेतल्यानंतर तो मान्य करण्यात आला आहे. सीए व एनएसडब्ल्यू राज्य सरकार यांच्यात या संदर्भात गुरुवारी करार झाल्यानंतर  दोन्ही मंडळे आता निश्चिंत झाली आहेत.


Related Stories

गौरव सोळंकी उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

जोकोविचचे ‘कॅलेंडर स्लॅम’चे स्वप्न भंगले

Patil_p

भारताचा नियोजित लंका दौरा अशक्य

Patil_p

अंकिता रैना दुहेरीत पराभूत

Patil_p

जुर्गेन क्लॉप सर्वोत्तम व्यवस्थापक

Patil_p

चेन्नईसमोर आज आरसीबीचे आव्हान

Patil_p
error: Content is protected !!