तरुण भारत

बंगालने नेहमीच देशाला मार्ग दाखविलाय!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार : महापुरुषांकडून शस्त्र-शास्त्राने सेवा : राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisements

पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा उत्सव ‘दुर्गा पूजा’ गुरुवारपासून सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता येथील कार्यक्रमात ऑनलाईन स्वरुपात सहभागी झाले आणि त्यांनी राज्यातील जनतेला दुर्गा पुजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु भाजपने यावेळी पुढील वर्षी बंगालमध्ये होणारी विधानसभा निवडणूक पाहता विशेष व्यवस्था केली होती. मोदींचे संबोधन दाखविण्यासाठी भाजपने बंगालच्या सर्व 294 विधानसभा मतदारसंघांमध्ये 78 हजार बूथांवर टीव्ही स्क्रीन लावले होते. मोदींनी बांगला भाषेत भाषण सुरू करत तेथील महापुरुष आणि लोकांचे जोरदार कौतुक केले आहे.

पश्चिम बंगालच्या भक्तीतील शक्तीमुळे मी दिल्लीत नसून बंगालमध्ये असल्याचे वाटत आहे. अपरंपार श्रद्धा असल्यास स्थान, स्थिती, परिस्थितीच्या वर जात पूर्ण देश बंगालमय होऊन जातो. दुर्गा मातेचे हे पर्व भारताच्या पूर्णत्वाचे पर्व आहे. बंगालची दुर्गा पूजा या पूर्णत्वाला नवा रंग प्रदान करते. बंगालची चेतना, ऐतिहासिकतेचा हा प्रभाव आहे. बंगालने नेहमीच देशाला मार्ग दाखविला आहे. बंगालच्या भूमीतील महापुरुषांनी शस्त्र आणि शास्त्राने सेवा केली आहे. त्यांनी पूर्ण मानवतेला दिशा दाखविली आहे. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, मां आनंदमयी, महर्षी अरविंदो, शरतचंद्र चट्टोपाध्याय, रविंद्रनाथ टागोर, राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे नाव घेताच नवी चेतना निर्माण होते असे मोदींनी म्हटले आहे.

बंगालच्या जनतेला नमन

नेताजी सुभाषचंद्र बोस, खुदीराम बोस, मास्टर सूर्य सेन, वाघा जतिन, प्रीतिलता वादेदार यांच्यासह अनेक वीरांनी भारतमातेच्या सेवेकरता जीवन अर्पण केले आहे. काझी नजरुल इस्लाम, सत्यजीत रे, मृणाल सेन, उत्तम कुमार, सुचित्रा सेन यांनी भारताचे नाव विदेशात उज्ज्वल केले आहे. बंगालचे लोक नेहमीच जगात भारताचे नाव उज्ज्वल करत राहणार असल्याचा विश्वास आहे. अथांग शक्तीने भरलेल्या बंगालच्या जनतेला नमन करतो, असे मोदींनी म्हटले आहे.

नारीशक्तीसाठी सातत्याने कार्य

देशात महिलांच्या सशक्तीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. जनधन खाते उघडणे, गरोदरपणात मोफत तपासणी, घरात शौचालयाची सुविधा, कार्यालयात रात्रपाळी, प्रसूतीची रजा वाढविणे, सैन्यात स्थायी नियुक्ती करण्यासह नारीशक्ती वाढविण्यासाठी सातत्याने काम केले आहे. दुष्कर्म करणाऱयाला मृत्यूदंडाची तरतुद करण्यात आल्याचे मोदींनी सांगितले आहे.

90 लाख महिलांना गॅसजोडणी

बंगालच्या वेगवान विकासाकरता येथील लोकांना सुविधा देण्यासाठी सातत्याने काम होत आहे. येथील 30 लाख लोकांसाठी घरे निर्माण करण्यात आली आहेत. येथील 90 लाख महिलांना गॅसजोडणी देण्यात आली आहे. जल-जीवन योजनेच्या अंतर्गत 4 लाख घरांमध्ये स्वच्छ पाणी पोहोचविण्याचे काम झाल्याचा दावा मोदींनी केला आहे.

नियमांचे पालन करा

यंदा कोरोनाकाळात दुर्गा पूजा साजरी केली जात आहे. सर्वांनी संयम दाखविला आहे, परंतु उल्हास आणि भव्यता तीच आहे. हीच बंगालची चेतना आहे. दुर्गापूजेसह 6 फुटांचे अंतर, मास्क परिधान करण्याचे पालन निष्ठेने करा असा माझा सर्वांना आग्रह असल्याचे मोदी म्हणाले.

बंगाल नवी शक्ती ठरणार

नेपाळ-भारत-बांगलादेश  यांच्यातील संपर्कव्यवस्था वाढविण्यासाठी शेकडो कोटींच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. बंगालच्या जनतेच्या अडचणी कमी व्हाव्यात आम्ही सातत्याने काम करत आहोत. पूर्व भारताच्या विकासासाठी म्हणजेच पूर्वोदयासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. या पूर्वोदयासाठी बंगाल नवी शक्ती म्हणून उदयास येणार असल्याचे मोदी म्हणाले.

Related Stories

शंकरसिंह वाघेला यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा

Rohan_P

सप नेते आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयचा दिलासा

Amit Kulkarni

उच्च न्यायालयात केवळ तातडीची प्रकरणेच चालणार

tarunbharat

देशात दिवसभरात नवीन 4 लाखांहून अधिक रुग्ण

Amit Kulkarni

इंधन दरवाढीचा भडका; मध्य प्रदेशात पेट्रोल 112 रुपये लिटर

Rohan_P

‘स्पुटनिक व्ही’ लसीचे रशियात साईड इफेक्ट

Patil_p
error: Content is protected !!