प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील रस्त्यांवर निर्माण झालेले खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने येळळुर रोडसह वडगाव परिसरातील रस्त्यांवर खड्डय़ाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यावर आणि अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने पादचाऱयांसह वाहनचालकांना वाहने चालविणे मुष्किल बनले असल्याने रस्त्यावरील खड्डे कधी बुजविणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील बहुतांश रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात येत आहे. पण उपनगरातील रस्त्यांच्या विकासाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वडगाव-येळळुर रोडची अक्षरश: चाळण झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी एक फुटाहून अधिक मोठे खड्डे असल्याने वाहने कशी चालवायची असा प्रश्न वाहनधारकासमोर निर्माण झाला आहे. शहापुर पोलीस स्थानक ते येळळूर रोड कॉर्नरपर्यतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण स्मार्टसिटी योजनेअंर्तगत करण्यात आले आहे. पण वडगाव परिसरातील मुख्य रस्त्यासह संपर्क रस्त्याच्या नशिबी दगड-माती देखील नाही. वडगाव परिसरातील पाटील गल्लीसह विविध रस्त्यावरून वाहनाधारकांची गर्दी असते. पण या रस्त्याची देखील दुरावस्था झाली असून पावसाचे पाणी साचत असल्याने परिसरातील रहिवाशासह वाहनधारकांच्या अंगावर खड्डयामधील पाणी उडत असल्ऱयाने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. वास्तविक पाहता हा रस्ता वाहनधारकांचा सोयीचा असल्याने रात्रंदिवस वर्दळ असते. तसेच विविध उपनगरे व वसाहती असल्याने नागरिक ये-जा करीत असतात. यादृष्टीने रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पण या ठिकाणी असलेले मोठमोठे खड्डे जैसे थे आहेत. परिणामी वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यावरूनच ये- जा करावी लागत आहे. या रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार ? अशी विचारणा परिसरातील रहिवासी करीत आहेत. समस्यांकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष देऊन नागरिकांच्या समस्यांचे निवारण करावे अशी मागणी होत आहे.