तरुण भारत

‘राष्ट्र प्रथम’ हे मानणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

प्रत्येक राष्ट्रामध्ये अनेक सामाजिक चढउतार असतात. अनेक प्रकारची संकटे येत जात असतात. त्यातून सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत राष्ट्रभक्त निर्माण होत असतात. प्रत्येकासमोर राष्ट्रचिंतन हाच मूळ विचार असतो. आपल्या देशात गुलामगिरीची परंपरा अनेक वर्षापासून आहे. त्यातून देशाला बाहेर काढण्याचे प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज, वीर राणा प्रताप, झाशीची राणी अशा हजारो नर रत्नांनी केली समाजाला एकत्र आणून समाज जागृतीचे काम गुलामगिरीच्या काळात अनेकांनी केले परंतु ते तोकडे व तेवढय़ापुरतेच होते हे अनुभवावरून सिद्ध झाले आहे. गेल्या नव्वद वर्षात एक संघटना जात, पात, प्रांत भेद न मानता गरीब, श्रीमंत या सर्वांना घेऊन सतत कार्यरत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे त्या संघटनेचे नाव. डॉ. केशव बळिराम हेडगेवार हे संघ संस्थापक. संघ स्थापनेपूर्वी डॉक्टरजींनी अनेक सामाजिक संघटनात काम केले होते. ते राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते होते. गुलामगिरीतून देशाला स्वतंत्र केले पाहिजे हा प्रामाणिक हेतू प्रत्येक संघटनेसमोर होता.

डॉक्टर हे सर्व पहात व अनुभवत होते. त्यांनी त्याचा खोलवर विचार केला. देश गुलामगिरीत गेलाच का, हा प्रश्न त्यांना चैन पडू देत नव्हता. विचारांती त्यांच्या लक्षात आले की समाज विघटनाचा फायदा परकीय लोकांनी घेतला. हिंदुस्थानात अनेक जाती आहेत. त्या अलग अलग आहेत. याचा फायदा घेऊन परकीय
आक्रमकांनी राज्य केले. सर्वांना एकत्र आणण्याचा, आपण कोणत्याही धर्माचे असो राष्ट्र हित प्रमुख असले पाहिजे, असा विचार जनतेत रुजविणारी संघटना आवश्यक आहे. असा ठाम विश्वास निर्माण झाला व त्यातून संघ विचाराचा जन्म झाला. 1925 च्या दसरा मुहूर्तावर आपल्या घरी पंधरा-वीस तरुणांना जमवून आपण आज रा. स्व. संघ सुरू करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. भाऊजी कावरे, अण्णा सोहनी, विश्वनाथराव केळकर, बाळाजी हुद्दार, बापूराव भेदी व इतर तरुण मंडळी होती. हिंदुस्थानात 1925 साली दोन संघटनांची सुरुवात झाली. एक संघ विचार व दुसरा साम्यवादी विचार-कम्युनिस्ट संघटना. एक त्या देशाच्या मातीतील विचार ज्या आदर्शांचे पाईक शिवछत्रपती, संभाजीराजे, राणा प्रताप, गुरु गोविंद सिंह असे अनेक तर साम्यवादाचे विचारवंत परकीय भूमीतील. त्यांचा भारतीय परंपरेशी सुतराम संबंध नाही. सुरुवातीला साम्यवाद बघता बघता देशव्यापी झाला. संघाच्या सुरुवातीची दखल पलीकडच्या गल्लीतील लोकांनीदेखील घेतली नव्हती. क्षणिक प्रसिद्धी फार काळ टिकू शकत नाही. हा अनुभव अन्य ठिकाणी अनुभवास आलेला आपण ऐकतो. असाच एक प्रसंग माझ्या वाचनात आला. सिनेसृष्टीचा एकेकाळचा महानायक  दिलीपकुमार यांच्या जीवनातील प्रसंग. विमानातून प्रवास करीत असताना विमान सुटण्यापूर्वी ते आपल्या आसनावर बसले होते. येणारा प्रत्येक प्रवासी त्यांना अभिवादन, हस्तांदोलन करीत होता. त्यांच्या बाजूला बसलेला प्रवासी मात्र पेपर वाचत बसला होता. त्याचे दिलीपकुमार यांच्याकडे लक्ष नव्हते. ते बोलतही नव्हते. दिलीपकुमार यांचा स्वाभिमान त्यांना सतत विचारत होता. मी एवढा मोठा माणूस. हा माझ्याकडे बघतसुद्धा नाही. त्यांना राहवले नाही. त्यांनी त्या प्रवाशाला विचारले मला ओळखता? नाही. प्रवाशाकडून उत्तर. मी दिलीपकुमार. हिंदी सिनेसृष्टीतला राजा, हो का? छान, मी सिनेमा बघत नाही. प्रवाशाचे उत्तर. मला न ओळखणारा कोण हा माणूस? त्यांनी त्याला तुच्छतेच्या आवाजात विचारले कोण तुम्ही तुमचं नाव काय? ती व्यक्ती म्हणाली, ‘जे. आर. डी. टाटा’ दिलीप कुमारांच्या लक्षात आले. ज्याच्या शेजारी आपण बसलो आहोत ते आपल्यापेक्षा किती श्रे÷ आहेत. हा अनुभव स्वत: दिलीपकुमारनी सांगितला आहे. साम्यवादाची आजची परिस्थिती अशीच आहे. यश क्षणिक होते. कारण साम्यवादाचा विचार परिपूर्ण नाही.

जगात त्याला मान्यता मिळाली नाही. परंतु आज आपण पाहतो संघ विचार जगात पोहचला आहे. आपले आराध्य दैवत हे आपले राष्ट्र आहे हा साक्षात्कार डॉक्टरना झाला होता. प्रत्येक जण हिंदुस्थान अत्यंत धोक्मयात आहे, असे कळवळून सांगत होता. इंग्रजांना दोष देत होता. परंतु हे कशामुळे घडले या मुळाशी कोण जात नव्हते. डॉ. हेडगेवार यांनी याचा सखोल अभ्यास व चिंतन केले. आपल्या विचाराबद्दल बोलताना लोक त्यांना हिंदू संघटन म्हणजे ‘जातीय’, पोरासोरांचे’, ‘त्रेता युगातील’ अशी दूषणे देत. मुसलमानानी अनेक शतके राज्य केल्यामुळे आपण राज्यकर्ते आहोत, अन्य समाज गुलाम आहे अशी त्यांची मानसिकता होती. त्यांनी हिंदू मुस्लीम ऐक्मयाच्या चळवळीचा संपूर्ण अभ्यास केला. देशाला पारतंत्र्य आले ते इंग्रज वा मुसलमान यांच्यामुळे नाही तर राष्ट्रीय भावना व परंपरा यांचा विसर हिंदू समाजाला पडला म्हणून. व्यक्ती व समष्टी यांचे वास्तविक असणारे संबंध विसकटले. अशा विसंघटित स्थितीमुळे पूर्वी आपल्या पूर्वजांच्या विजयाच्या नौबती झडविणारा शेकडो वर्षे परक्मयांच्या पाशवी सत्तेखाली चिरडला गेला. आपल्याकडे मनुष्यबळ, पैसा व शस्त्रेदेखील होती. परंतु मी राष्ट्राचा एक घटक आहे व त्यासाठी मी माझे जीवन व्यतीत केले पाहिजे ही कर्तव्याची भावना व जाणीव बुजल्याने प्रचंड शक्ती असूनही समाज पराभूत झाला. यासाठी समाजातील व्यक्तीच्या नसानसात ही राष्ट्रीय भावना खेळवावी व त्या भावनेने सारा समाज अनुशासितपणे उभा करावा ही कल्पना साकार झाली पाहिजे व ती प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म. प्रभु रामचंद्रांनी चौदा चौकडय़ांचे साम्राज्य असणाऱया व देवांनाही दास बनविणाऱया रावणाला रामबाणांचा प्रताप दाखविला तो दिवस व विराटाच्या गाई पळवून नेणाऱया कौरवांना पळता भुई थोडी होण्याला कारणीभूत झालेला गांडीव धनुष्याचा टणत्कार अर्जुनाने दाखविला तो दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस. तोच संघ स्थापनेचा
दिवस.

संघ विचाराबद्दल मतभेद असू शकतात परंतु संघ ही संघटना जगाला परिचित झाली आहे. पाकिस्तानने संघाचा उच्चार युनोपर्यंत पोहचविला आहे. संघ विचार जीवनातील सर्व क्षेत्रात गेला पाहिजे, असा संघटनेचा प्रयत्न आहे. त्यात राष्ट्रहिताला प्राधान्य हा आग्रह आणि त्यातून परिवार ही संकल्पना निर्माण झाली. कामगार हा देशातील राष्ट्र निर्मितीचा एक प्रमुख घटक. कम्युनिस्ट संघटनांनी कामगार हितावरच भर दिला. कारण त्यांना राष्ट्र ही कल्पना मान्य नाही. जगातले कामगार हा विचार. माझे प्रश्न सोडवा मला अन्य कशाशी संबंध नाही ही विचारसरणी. परंतु भारतीय मजदूर संघाने कामगारांना एक नवीन मंत्र दिला. देश बांधणीसाठी काम करू परंतु कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. भांडवलदारांनी आमच्या जीवावर चैन करायची, आम्ही मात्र उपाशी हे चालणार नाही. ‘देश के हित मे करंगे काम, काम का लेंगे पुरा दाम’ भारतातच नव्हे तर जगात वास्तव्य करणाऱया हिंदूंना एक आधार असणे आवश्यक आहे. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली. हिंदुस्थान तेरे तुकडे होंगे ही राष्ट्रद्रोही कल्पना शैक्षणिक जगतात अत्यंत भयानक. शैक्षणिक संस्था या पूर्णपणे शिक्षणाविषयी व विद्यार्थी राष्ट्र निर्मिती करण्याचे साधन असले पाहिजे. या संकल्पनेतून अ.भा.विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. गिरीकंदरात जंगलात वास्तव्य करून उपासमारीचे जीवन जगणाऱया बांधवांना सक्षम व ज्ञानी करण्यासाठी एकल विद्यालय सुरू करून तेथील समाजाला राष्ट्र प्रवाहात आणण्याचे काम एकल विद्यालये करीत आहेत. सर्व देशात अशा प्रकारच्या एक लाखावर शाळा आहेत. बेळगावजवळच्या खानापूर तालुक्मयात शंभर शाळा आहेत.

या सर्वांना राजकीयदृष्टय़ा एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे राजकीय पक्ष. जनसंघ-भारतीय जनता पार्टीत काम करणारे स्वयंसेवक. पन्नास वर्षाच्या अथक परिश्रमाने ‘समर्थाचिया सेवका वक्र पाहे। असा सर्व भूमंडळी कोण आहे?।।’ हे दाखविणारा व जगाच्या राजकारणात एक शक्ती म्हणून उदयाला आलेला राजकीय विचार फक्त दक्ष-आराम करून गप्प न बसता त्याचा उपयोग समाजाला व देशाला झाला पाहिजे हा संघ विचार घेऊन राष्ट्र निर्मितीचे कार्य संघ गेली नव्वद वर्षे करीत आहे. व्यक्तीपेक्षा संघटना मोठी हा विचार प्रत्यक्षात आणलेली ही संघटना. लोकांना रा.स्व. संघ किंवा आर एस एस या नावाचा परिचय आहे परंतु संघ संस्थापक डॉ. हेडगेवार हे सांगावे लागते. संघटनेसाठी डॉक्टरांनी आपले अस्तित्व जाळून टाकले. एकच विचार संघटना प्रथम. अशा संघटनेचा जन्मदिवस म्हणजे विजयादशमी.

तुझे तेज भंगी शतांशी जरीही

उजाळून देऊ दिशा दाही दाही।

शारदाचरण कुलकर्णी

Related Stories

जगावर परिणाम!

Patil_p

डिजिटल सौंदर्य

Patil_p

बाबासाहेबांच्या स्वप्नातील विद्यार्थी

Patil_p

लाभदायक करार

Patil_p

पालिका आरक्षणाला न्यायालयाची चपराक…

Patil_p

पुढती परतोनि न पाहे मागें

Patil_p
error: Content is protected !!