तरुण भारत

कोल्हापूर : ई वॉर्डातील ८ प्रभागात बायपासने पाणीपुरवठा

ताराबाई पार्क पाणी टाकीच्या दुरूस्तीचे काम सुरू
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या थेट पाहणीनंतर यंत्रणा लागली कामाला
पाणी पुरवठा विभाग, जलप्राधिकरण यांच्यातील वादाला पूर्णविराम

प्रतिनिधी / कोल्हापूर

ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकातील पाणीच्या टाकीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत ई वॉर्डातील 8 प्रभागात बायपासने पाणी पुरवठा होणार आहे. सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अस्वच्छ, अशुद्ध पाणी येत असल्याबद्दल पाणी पुरवठा विभागाच्या कारभारावर हल्लाबोल केला होता. सभेनंतर नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे थेट पाहणी केली आणि टाकीच्या दुरूस्तीचे आदेश दिले. त्याच बरोबर काम पूर्ण होईपर्यंत बायपासने पाणी पुरवठा करण्याच्या सूचनाही दिल्या. आयुक्तांच्या भेटीनंतर महापालिका आणि जल प्राधिकरणाची यंत्रणाही कामाला लागली आहे.

ताराबाई पार्कातील 22.50 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतून ई वॉर्डातील आठ प्रभागात पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये सर्वसाधारणपणे खान्नाविलकर पेट्रोल पंप, महावीर उद्यान, नागाळा पार्क, कनाननगर, ताराबाई पार्क, सर्किट हाऊस, भोसलेवाडी, कदमवाडी, सदर बाजार, विचारेमाळ, कारंडे मळा, लाईन बाजार आदी भाग येतात. ही टाकी जुनी झाल्याने दुरूस्तीची गरज आहे. पण गेली दोन वर्षे दुरूस्तीचे काम केवळ महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि जल प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे रखडले आहे. टाकीच्या वरील बाजूस असणारा स्लॅब कमकुवत झाला आहे. काही ठिकाणचा स्लॅब पडला आहे. टाकीची वरील बाजू खुली राहिल्याने त्यामध्ये पक्षी, प्राणी पडण्याचे प्रकार घडत आहेत. पाणी हिरवे बनले आहे. शुद्ध केलेले पाणी टाकीत साठवले तरी ते पुरवठा करताना अस्वच्छ आणि अशुध्द होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. टाकीवर कार्यरत असणाऱया पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱयांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक नगरसेवकांकडून सातत्याने दुरूस्तीसाठी पाठपुरावा
टाकीच्या दुरूस्तीचे काम तातडीने व्हावे यासाठी स्थानिक नगरसेवक रत्नेश शिरोळकर सातत्याने पाठपुरावा करत होते. जो पर्यंत दुरूस्ती होत नाही तो पर्यंत टाकीत पाणी न साठवता ते बायपास करून थेट प्रभागात सोडविण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. पण महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग आणि जल प्राधिकरण यांच्यातील जागेच्या वादात बायपासचा प्रश्नही सुटत नव्हता. सोमवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रत्नेश शिरोळकर यांच्यासह उमा इंगळे, शोभा कवाळे अशुद्ध, अस्वच्छ पाणी पुरवठÎाचा प्रश्न उपस्थित करून हल्लाबोल केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. नगरसेवक शिरोळकर यांनी तर प्रत्यक्ष वस्तुस्थिती स्पष्ट करणारी चित्रफित सभागृहात दाखविली. त्यामुळे आरोग्यविषयीच्या या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा झाली.

सभेनंतर आयुक्त डॉ. बलकवडे यांची थेट पाहणी
टाकीच्या दुरूस्तीचा प्रश्न नूतन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गंभीरपणे घेतला. सभेनंतर त्या अधिकाऱयांसह थेट कावळा नाका येथे दाखल झाल्या. त्यांनी पाहणी केली. यावेळी पाणीपुरवठा विभाग आणि जल प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. टाकी दुरूस्तीचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्याचबरोबर जो पर्यंत काम पूर्ण होत नाही. तो पर्यंत टाकीत पाणी न साठविता ते थेट बायपास करून प्रभागात पुरवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. त्यामुळे गेली दोन वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

दुरूस्तीसाठी लागणार दोन महिन्यांचा कालावधी
ताराबाई पार्क पाण्याच्या टाकीवर नवीन स्लॅब टाकणे व इतर दुरूस्तीच्या कामासाठी  किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या काळात टाकीत पाणी साठवता येणार नाही. मात्र नियमित पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी बायपासव्दारे पाणीपुरवठा केला जाईल. तशा सूचना आयुक्त डॉ. बलकवडे यांनी महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग, जलअभियंता, जल प्राधिकरणाचे अधिकारी, दास ऑप्शर कंपनीला दिला आहे. त्यानुसार बायपासच्या कामाला मंगळवारी सुरू करण्यात आली.

ताराबाई पार्क पाण्याच्या टाकीच्या दुरूस्तीसाठी गटनेते सत्यजित कदम यांच्यासह ई वॉर्डातील आम्ही सर्व नगरसेवकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आयुक्त डॉ.बलकवडे यांनी सोमवारी सभेनंतर प्रत्यक्ष पाहणी करून आदेश दिल्याने दुरूस्तीचे काम लवकर पूर्ण अशी अपेक्षा आहे.
-रत्नेश शिरोळकर, नगरसेवक

Related Stories

कोल्हापूर : ‘या’ गावात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

triratna

कोल्हापूर : शिरोळ उद्यापासून पूर्ववत सुरू होणार

Shankar_P

कोल्हापूर : टोपमधील ‘त्या’ डॉक्टरांचा रिपोर्ट निगेटिव्ह

triratna

कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर

Shankar_P

तात्यासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी मध्ये सायन्स कार्निवल उत्साहात संपन्न

triratna

जिल्हा परिषदेचे पेन्शनर वाऱ्यावर

Shankar_P
error: Content is protected !!