तरुण भारत

संकेश्वरच्या नगराध्यक्षपदी सीमा हतनुरी

प्रतिनिधी /  संकेश्वर

तब्बल अडीच वर्षांनंतर मंगळवारी संकेश्वरच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या सीमा हतनुरी नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी अजित करजगी हे प्रत्येकी 3 मतांनी विजयी झाले. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार अशोक गुराणी यांनी काम पाहिले. निवडीची अधिकृत घोषणा होताच नगरपरिषदेच्यावतीने नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Advertisements

निवडणूक प्रक्रियेनुसार सकाळी 11 वाजता नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सीमा हतनुरी व काँग्रेसकडून शेवंता कब्बुरी यांनी तर उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अजित करजगी व काँग्रेसकडून डॉ. जयप्रकाश करजगी यांनी नामांकन दाखल केले होते. त्यामुळे दुपारी 3.15 वाजता निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. काँग्रेसच्या 11 नगरसेवकांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केल्यामुळे शेवंता कब्बुरी व डॉ. जयप्रकाश करजगी यांना 11 मते पडली तर भाजपकडून अपक्ष व उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार अजित करजगी, आमदार उमेश कत्ती व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी मतदान केल्यामुळे सीमा हतनुरी व अजित करजगी यांना 14 मते मिळाल्याने ते प्रत्येकी 3 मतांनी विजयी झाले.

बिनविरोध होणारी निवडणूक काँग्रेसच्या लढावू भूमिकेमुळे चुरशीने झाली. भाजपचे पदाधिकारी निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या आवारात फटाक्याच्या आतषबाजीसह गुलालाची उधळण केली.

पुतण्याने मारली बाजी

अजित करजगी हे मूळचे भाजपचे कार्यकर्ते. पण ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारीपासून डावलल्याने त्यांनी बंडखोरी केली व अपक्ष म्हणून निवडणूक लढवत भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. हा रोष करजगी यांनी मनात ठेवला होता. नगराध्यक्ष निवडणूक घोषित होताच आरक्षणाचा धागा पकडून भाजपकडे त्यांनी उपनगराध्यक्षपदाची मागणी केली. यासाठी भाजपने होकार दिल्यावर भाजपच्या बाजूने निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. पण काँग्रेसचे उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांचे खुद्द काकाच आहेत. अखेर राजकारणात कोणी-कोणाचे नसते या भूमिकेतून काका डॉ. जयप्रकाश करजगी यांचा पराभव करत अजित करजगी यांनी चुरशीची वेगळी किनार दाखवून दिली.

तरुण भारतचे वृत्त ठरले तंतोतंत

‘तरुण भारत’ने मंगळवारच्या अंकात नगराध्यक्षपदी सीमा हतनुरी व उपनगराध्यक्षपदी अजित करजगी यांची निवड होणार, हे वृत्त दिले होते. तरुण भारतचे हे वृत्त तंतोतंत खरे ठरल्याची चर्चा शहरात सुरू होती.

आगामी काळात लिंगायत समाजाचा नगराध्यक्ष

संकेश्वर नगरपरिषदेवर आजतागायत सर्वच समाजाला नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदाचे प्रतिनिधीत्व देऊ केले आहे. बदलत्या आरक्षणात कोणताही समाज वंचित राहू नये, असा प्रयत्न करीत आहोत. या निवडणुकीत लिंगायत समाजाला न्याय देणे उचित होते. पण धनगर समाज बाजूला राहू नये यासाठी धनगर समाजाला संधी दिली आहे. आगामी काळात होणाऱया नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत लिंगायत समाजाला संधी देणार यात शंका नाही. शिवाय शहराचा विकास साधणार असल्याची माहिती आमदार उमेश कत्ती यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.

Related Stories

युवा सेनेच्या प्रयत्नातून बेळगावला मिळाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

Amit Kulkarni

मद्य विक्रीवर 3 मेपर्यंत राहणार निर्बंध

Patil_p

खानापूर महामार्गावर चोरांचा हैदोस

Patil_p

दिल्ली सरकारकडे शेतकऱयांच्या समस्या मांडू

Patil_p

आमच्या हक्कांवर गदा आणणे हे बेकायदेशीर

Patil_p

सांबरा येथील युवकांनी राबविली स्वच्छता मोहीम

Amit Kulkarni
error: Content is protected !!