तरुण भारत

चक्रव्यूह आणि तीन वाटा

अखेर अपेक्षेप्रमाणे साखर कारखाने आणि ऊस तोडणी कामगार यांच्यामधील दराच्या प्रश्नावर जेष्ठ नेते शरद पवार आणि ऊस तोडणी कामगारांच्या सर्वोच्च नेत्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये चर्चा होऊन प्रति टन पंचेचाळीस ते पन्नास रुपये तोडणी दरवाढ आणि मुकादमाना 19 टक्के कमिशन देण्याच्या निर्णयावर तडजोड झाली आहे. ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमधल्या या बैठकीत प्रवेशासाठीही भाजपचे आमदार सुरेश धस यांना झगडावे लागले यातच राज्यातील कारखानदारांनी जो संदेश द्यायचा तो देऊन टाकलेला आहे. या बैठकीतून फुरसत मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पवार यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत त्यांना ‘हॅट्स ऑफ’ अशी मानवंदना देणारा संदेश ट्विटर वरून प्रसारित केला आहे. मात्र तरीही गोपीनाथ मुंडे यांच्या अनुपस्थितीत मिळवलेले हे दुसरे सर्वोच्च यश पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये स्थिर करण्यास कारणीभूत ठरणार नाही. उलट  एकनाथ खडसेंच्या मार्गानेच त्यांनी निघून जावे याच दृष्टीने भाजपमध्ये राजकारण सुरू आहे. खडसेंनी पक्ष सोडल्यानंतरसुद्धा ते थांबलेले नाहीत याचीच या प्रकरणात प्रचिती आलेली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे ऊस तोडणी कामगारांच्या संघटनेत वर्चस्व होते आणि मुंडे यांचे समर्थक अद्यापही पंकजा यांच्याच पाठीशी आहेत हे माहीत असताना, आमदार सुरेश धस हे तोडणी कामगारांचे नव्हे तर केवळ आष्टी पाटोदा विधानसभा मतदार संघातील मुकादमाचे नेते आहेत हे माहीत असताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे नेतृत्व करून त्यांना न्याय मिळवून द्या असे पत्र देऊ केले. यातच भाजप आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पद दिलेल्या नेत्याला कोणत्या प्रकारे वागवत आहे हे दिसून आले होते.  दोनच दिवसांपूर्वी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात भाषण करताना पंकजा यांनी आपणास दिल्लीत पद मिळाले तरीही महाराष्ट्रातून गेलेले नाही असे वक्तव्य केले. चक्रव्यूह भेदण्याची आपल्यात क्षमता आहे आणि एक दिवस आपणास शिवाजी पार्कवर मेळावा घ्यायचा आहे असे सूचक उद्गार काढले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे  आपले भाऊ आहेत आणि शरद पवार यांना फोन केल्यानंतर त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळते असेही त्या म्हणाल्या होत्या. भाजपमध्ये सुरू असणारी घडामोड लक्षात घेऊन जालन्याचे शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांनी मुंडे यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. आता साखर संघाशी झालेल्या यशस्वी तडजोडीमुळे पंकजा मुंडे यांचे या क्षेत्रातील संघटन अधिक भक्कम झाले आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावामध्ये असलेल्या कटूतेनंतरही ते एकत्र येऊ शकतात असा अप्रत्यक्ष संदेश पवारांच्या उपस्थितीत आणि साखर कारखानदार यांच्या साक्षीने दिला गेला आहे. भाजपच्या नेत्यांनी सुरेश धस यांना पुढे करून काय साधले? भाजपचा हात पुन्हा पोळला आहे. वंजारी समाजाचे वर्चस्व असणाऱया ऊसतोडणी कामगारांच्या क्षेत्रात गोपीनाथ मुंडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले होते. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी अनेकदा मुंडेंच्या या संघटनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. त्या काळात नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात कमालीचा संघर्ष होता. मात्र तरीही गडकरी यांनी कधीही मुंडे यांचा हा बेस उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपने प्रथमच आपल्याच पक्षाचा परंपरागत मतदार असणाऱया वंजारी-ओबीसीमधील घटकाऐवजी सुरेश धस यांना पुढे केले. बीड, सोलापूर अहमदनगर, सांगली जिह्यातील धनगर, मराठा आणि नंदुरबार जिह्यातील आदिवासी ऊस तोडकऱयांना एकत्र करून पंकजा यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुकादमाचे नेते धस अपयशी ठरले. 2017 च्या जिल्हा परिषद सभापती निवडीमध्ये त्यांनी धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचे सभापती होऊ दिले होते. त्याचे बक्षीस म्हणून बीड-उस्मानाबाद-लातूर विधान परिषदेला फडणविसांच्या मध्यस्थीने त्यांना उमेदवारी मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड फुटले आणि पंकजा मुंडे यांच्या मतांच्या बळावर त्यांना विजयाचा रस्ता दिसला. भाजपने पंकजा मुंडे यांच्या विरोधात धस यांनी चालवलेल्या संघटनेला मदत करून बीड जिह्याची राजकीय फेरमांडणी करायला शरद पवारांना वाट मोकळी करून दिली आहे. आता भाजप सोडायचा की तिथेच राहून संघर्ष करायचा हे पंकजा मुंडे यांच्या राजकारणाचा भाग असेल.  पण ज्या चक्रव्यूहाचा त्यांनी उल्लेख केला होता तो फोडायला न लागताच त्यांना चक्रव्यूहातूनच तीन रस्ते दिसू लागले आहेत. पहिला रस्ता अर्थातच काँग्रेस आहे जो, त्यांच्यासाठी सदा सर्वकाळ खुला आहे. दुसरा रस्ता शिवसेनेचा आहे जिथून त्यांना ऑफर आलेली आहे आणि तिसरा रस्ता राष्ट्रवादीचा आहे. जो ऊस तोड कामगारांच्या प्रश्नावर यशस्वी तडजोडीने खुला झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षातून पंकजा मुंडे यांना असणारे समर्थन लक्षात घेतले तर भाजप ओबीसी मतदारापासून अधिक दुरावण्याचीच लक्षणे आहेत. अर्थात आता आपणास अशा नेत्यांची गरज नाही असे भाजपला वाटत असेल किंवा त्यांनी निर्माण केलेले पर्यायी ओबीसी नेते त्या जनतेला पक्षाबरोबर राखण्यास उपयुक्त ठरतील असे भाजपला वाटत असेल तर तो भाग वेगळा. मात्र असाच आणखी एक पराभूत नेता भाजप नेत्यांवर नाराज होऊन संधीची वाट पाहतो आहे. अशा काळात पंकजा मुंडे यांना अधिक नाराज करून भाजपला काही मिळाले नसले तरी पंकजा मुंडे यांना तीन पर्याय मिळाले आहेत.

Related Stories

हानिकारक गोष्टी

Patil_p

आणीबाणी आणि आपण

Amit Kulkarni

बुद्धिबळाचा नूतन अवतार

Patil_p

लसीचेही राजकारण

Patil_p

एकवटते विरोधक!

Patil_p

विरोधक पडले तोंडघशी !

Patil_p
error: Content is protected !!