तरुण भारत

मुंबई इंडियन्स निर्धास्त, दिल्ली कॅपिटल्ससमोर मात्र आव्हान

वृत्तसंस्था/ दुबई

प्लेऑफमधील स्थान निश्चित झाल्यावर ‘निश्चिंत’ झालेला मुंबई इंडियन्स संघ शनिवारी आणखी एक विजय मिळवित दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणीत भर घालण्याचा प्रयत्न करणार आहे. दिल्लीने मागील सलग तीन सामने गमविले आहेत. त्यांना ही मालिका खंडित करून प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवायचे आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

गुरुवारी चेन्नई सुपरकिंग्सने केकेआरवर 6 गडय़ांनी विजय मिळविल्यानंतर मुंबईचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले होते. मुंबई सध्या 16 गुणांसह अग्रस्थानी असून त्यांचा रनरेटही इतरांपेक्षा खूपच सरस आहे. त्यामुळे साखळी फेरीअखेर ते अव्वल दोनमध्ये असतील हेही निश्चित आहे. किंग्स इलेव्हन पंजाब, केकेआर व सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून सलग तीन पराभव स्वीकारले असले तरी दिल्ली कॅपिटल्स 12 सामन्यांत 14 गुण घेत तिसऱया स्थानावर आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरी झाली होती, त्यामुळेच त्यांना तीन पराभवानंतरही पहिल्या तीनमधील स्थान राखता आले आहे. मात्र यापुढील सामन्यात त्यांना गाफील राहून चालणार नाही. प्लेऑफ गाठण्यासाठी त्यांना एकतरी सामना जिंकावाच लागणार आहे. पण त्यांना हे साध्य करणे सोपे जाणार नाही. कारण त्यांचे शेवटचे दोन सामने मुंबई व आरसीबी या अव्वल दोन संघांविरुद्ध होणार आहेत. डीसीने शेवटचे दोन्ही सामने गमविले तर सरस रनरेटच्या आधारे पंजाब 14 गुणांवर राहिले तरी त्यांना मागे टाकत पुढे जाणार आहे. असे झाल्यास व इतर दोन संघांचे त्यांच्याइतकेच गुण झाले असल्यास रनरेटच्या निकषावर दिल्लीवर स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ येऊ शकते.

कामगिरीचा विचार केल्यास मुंबईची बाजू दिल्लीपेक्षा वरचढ असून शेवटच्या चारमधील स्थान निश्चित झाल्यामुळे मुंबई संघ कोणतेही दडपण न घेता ‘निश्चिंत’पणे खेळणार आहे. मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा धोंडशिरेच्या दुखापतीमुळे मागील तीन सामन्यात खेळू शकला नव्हता. शनिवारी देखील तो खेळण्याची शक्यता नाही. मात्र यासंदर्भात संघव्यवस्थापनाकडून कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. याआधीच्या शेवटच्या सामन्यात मुंबईने आरसीबीचा 5 गडय़ांनी दणदणीत पराभव करून पुन्हा फॉर्म मिळविला आहे तर दिल्लीसमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा आहे. आघाडी फळीकडून अपेक्षित कामगिरी होत असल्याने या सामन्यात मुंबई आपल्या संघात केणताही बदल करण्याची शक्यता नाही. आरसीबीविरुद्ध क्विन्टॉन डी कॉक अपयशी ठरला असला तरी तो आपला फॉर्म या सामन्यात पुन्हा दाखवू शकतो. इशान किशनबाबतही असेच म्हणता येईल. ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी सूर्यकुमार यादवला निवडण्यात आले नाही, त्यावर जाणकारांनी बरीच टीकाही केली. पण आरसीबीविरुद्ध नाबाद 79 धावांची विजयी खेळी करीत त्याने आपल्या बॅटनेच निवड समितीला चपराक दिली.

 सूर्या, डी कॉक व इशान यांच्यात कोणत्याही गोलंदाजीला झोडपण्याची क्षमता आहे. सौरभ तिवारीला मोठी खेळी करण्याची गरज आहे तर हार्दिक पंडय़ा, हंगामी कर्णधार पोलार्ड व कृणाल पंडय़ा यांची स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता सर्वश्रुतच आहे.

राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर हल्ला करून त्यांची लय बिघडवून टाकली होती. पण यातून सावरत मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीविरुद्ध जोरदार पुनरागमन केले. बुमराह (20 बळी), बोल्ट (17 बळी) दोघेही प्रारंभी व अखेरच्या टप्प्यात घातक ठरले आहेत तर पॅटिन्सन (11 बळी) तसेच राहुल चहर (14) व कृणाल (5) या फिरकी जोडीने मधल्या षटकांत अप्रतिम मारा करून त्यांना पूरक साथ दिली आहे. दिल्लीला मात्र फलंदाजी व गोलंदाजी दोन्ही बाबतीत सावरावे लागणार आहे. हैदराबादविरुद्ध त्यांचे फलंदाज दडपणाखाली कोसळले होते. धवन फॉर्ममध्ये आहे, पण त्याला इतरांकडून साथ मिळण्याची गरज आहे.

Related Stories

विराटच निर्विवाद कर्णधार, मी त्याचा उपनेता!

Patil_p

10 वर्षांचा अन् 85 किलो वजनी सूमो

Patil_p

रशियाचा मेदवेदेव्ह मानांकनात तिसऱया स्थानी

Patil_p

टोकियो ऑलिंपिक कुस्ती पात्र फेरी स्पर्धेच्या ठिकाणात बदल नाही

Patil_p

स्क्वॅश कोर्टवर उतरण्यास ज्योश्ना उत्सुक

Patil_p

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध मुंबई इंडियन्सचे पारडे जड

Patil_p
error: Content is protected !!