सरकारसमर्थित गटाच्या दोन सदस्यांचा मृत्यू
काबूल
अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांताच्या रोहानी बाबा जिल्हय़ात रविवारी रात्री झालेल्या बॉम्बस्फोटात सरकारचे समर्थन प्राप्त बंडखोर गटाच्या दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे तालिबान या दहशतवादी संघटनेचा हात असू शकतो. कुठल्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची आतापर्यंत जबाबदारी स्वीकारलेली नाही. याचदरम्यान सोमवारी सकाळी ख्वाजा सब्ज पोश भागात झालेल्या बॉम्बस्फोटातही दोन जण जखमी झाले आहेत. यात एक सामान्य नागरिक तर दुसरा सुरक्षा दलाचा जवान आहे. अफगाणिस्तानच्या पश्चिम गोर प्रांताची राजधानी फिरोज कोहा येथे 18 ऑक्टोबर रोजी एका कारमध्ये स्फोट झाला होता. यात 16 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक जण जखमी झाले होते. स्फोटामुळे परिसरातील इमारतींनाही नुकसान पोहोचले होते. हा एक आत्मघाती हल्ला होता. गोर प्रांतात तालिबानकडून वारंवार हल्ले केले जातात.