तरुण भारत

मंत्रिपदाच्या नाराजीने आ.दीपक केसरकरांचीच कोंडी

शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रीपद न मिळाल्याने एक वर्षानंतर मौन सोडत उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची ही नाराजी शिवसेनेला धोक्याची ठरू शकते की त्यांच्यावरच उलटते, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी मंत्रीपद न मिळाल्याने पत्रकार परिषद घेऊन उघडपणे नाराजी व्यक्त केली. ही नाराजी व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्हय़ाला मंत्रीपद मिळायला हवे होते. आमदार वैभव नाईक यांना मिळायला पाहिजे होते. चांदा ते बांदा ही योजना बंद न करता सुरू ठेवली पाहिजे होती, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याचबरोबर मागील शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून कॅबिनेटमंत्री पदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन आता एक वर्ष होत आल्यांनतर मंत्रीपद न मिळाल्याने मनात सुरू असलेली खदखद त्यांनी बाहेर काढली. मंत्रिपदाची नाराजी व्यक्त करून शिवसेनेची कोंडी करण्यापेक्षा आमदार केसरकर यांचीच राजकीय कोंडी होणार असल्याचे मत राजकीय तज्ञ व्यक्त करू लागले आहेत. राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावरून युती तोडली गेली आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन राजकीय पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. तीन पक्षांचे सरकार आल्याने मंत्रिपदे कमी झाली आणि त्यात मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून असणारे माजी मंत्री दीपक केसरकर यांचा पत्ता कट झाला. किंबहुना आमदार वैभव नाईक यांनाही मंत्रिपद मिळाले नाही आणि सिंधुदुर्गला मंत्रिपदच दिले गेले नाही. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. परंतु, त्यांना रत्नागिरीचे पालकमंत्री न करता सिंधुदुर्गचे पालकमंत्री केले सिंधुदुर्ग जिल्हय़ाला मंत्रिपद न मिळल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्येही नाराजी निर्माण झाली होती. परंतु, पालकमंत्रीपद उदय सामंत यांना दिले गेल्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ाशी त्यांचा नेहमीच संपर्क असल्याने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना पालकमंत्री म्हणून स्वीकारले. आमदार वैभव नाईक ऍक्टिव्ह होत पालकमंत्र्यांच्या बरोबरीनेच काम करू लागले. परंतु, मंत्रिपद मिळणार या प्रचंड आशेवर असणाऱया आमदार केसरकर यांची घोर निराशा झाल्याने ते राजकीय कार्यक्रमांपासून अलिप्त राहू लागले. आपल्या सावंतवाडी मतदारसंघातील संपर्कही कमी केला. त्यामुळे आमदार केसरकर यांचे काय चालले आहे असाच प्रश्न उपस्थित होत अखेर विधानसभा निवडणूक होऊन वर्षभरानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मौन सोडले व मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी व्यक्त केली. त्यांनी शिवसेना नेत्यांवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा दबाव त्यांच्यावरच उलटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी व्यक्त करताना त्यांनी युती सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट केला. परंतु हे केल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील ते होते, हे या गौप्यस्फोटाने अधोरेखित झाले. कदाचित हेच त्यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट होण्यामागील एक कारण असू शकते. त्यामुळे त्यांचा हा गौप्यस्फोट त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.

आमदार केसरकर यांनी चांदा ते बांदा योजना बंद करण्याबाबतही नाराजी व्यक्त केली. जिल्हय़ाच्या विकासाच्या दृष्टीने तसेच या योजनेमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. त्यामुळे ही योजना सुरू ठेवली पाहिजे होती. परंतु ही योजना बंद होण्यास काही अंशी तेच जबाबदार आहेत, असे म्हणायला हरकत नाही. कारण या योजनेसाठी त्यांनी पुरेसा निधी आणला, तरी या योजनेची अंमलबजावणी करण्यात ते अपयशी ठरले आहेत. तीन वर्षे चांदा ते बांदा योजनेच्या बैठकाच ते घेत बसले आणि योजना काही राबवली गेली नाही. जेव्हा अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा सरकार बदलले आणि योजनाच बंद झाली. कोरोना संकट काळात तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱयांनी चांगले काम करत केसरकरांची उणीव भासू दिली नाही. त्यामुळे वर्षभर मतदारसंघापासून अलिप्त राहून मौन बाळगणे त्यांच्यावरच उलटू शकते. मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी व्यक्त करून शिवसेनेवर दबाव टाकणे त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कॅबिनेट मंत्रिपदाची आशा दाखवणाऱया भाजपाकडे सत्ता नसल्याने त्यांना शिवसेनेतून बाहेर पडणेही शक्य नाही. त्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करून शिवसेनेची कोंडी करणाऱया केसरकरांचीच कोंडी झाली आहे. त्यांच्या मंत्रिपदाच्या नाराजीनंतर इतर पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱयांनी त्यांना लक्ष्य केले आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हय़ात आमदार दीपक केसरकर नाराज आहेत तसेच रत्नागिरी जिल्हय़ात शिवसेना आमदार भास्कर जाधव मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. मात्र त्यांनी अजून उघडपणे नाराजी व्यक्त केलेली नाही. तीन पक्ष एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले गेले आहे. त्यामुळे अशा स्थितीत मंत्रिपद मिळणे कठीणच आहे. म्हणून आमदार जाधव यांनी तूर्तास शांत राहणे पसंद केले, तर केसरकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.  त्याचबरोबर शिवसेनेलाही ही नाराजी भविष्यातील राजकीय गणिते मांडण्यासाठी विचार करायला लावणारी आहे, हे देखील तेवढेच खरे आहे.

संदीप गावडे

Related Stories

प्रश्नांची कोंडी आणि सरकारची मुस्कटदाबी

Patil_p

मंत्रिमंडळ विस्ताराची घाई आणि सरकारची दिरंगाई

Patil_p

एक निस्पृह समाजसेवक बाबा आढाव

Patil_p

दोन सरकार आणि आक्रमक अवतार!

Patil_p

मोदींचे अश्रू

Patil_p

अद्भुत प्रवास

Patil_p
error: Content is protected !!