तरुण भारत

सांगे, केपे, काणकोण, धारबांदोडाच्या कृषी विकासावर भर देणार

प्रतिनिधी/ सांगे

सांगेमध्ये विश्रामधामाची जी गरज होती ती नगरपालिकेने भरून काढली आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सजावटीचे व इतर साहित्य पुरविण्यावर भर दिला जाईल. आपणही त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. केपेसह सांगे, काणकोण, धारबंदोडा हे ग्रामीण तालुके असून या भागांतील शेतीच्या विकासावर भर दिला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगे येथे नगरपालिकेने बांधलेल्या विश्रामधामाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.

Advertisements

दरम्यान, सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी उद्घाटनाच्या नामफलकावर माजी आमदार सुभाष फळदेसाई यांचे नाव समाविष्ट केल्याने ते कोणत्या शिष्टाचारात बसते असा मुद्दा उपस्थित करून निषेध नोंदवत उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातला. उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्यासमोर आमदार गावकर यांनी हा मुद्दा मांडला. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याने त्यांचे समाधान झाले नाही व ते निघून गेले. हा प्रकार चुकीचा असून आपण यासंदर्भात चौकशीची मागणी करतो, असे ते म्हणाले.

यानंतर उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी विश्रामधामाचे उद्घाटन केले. कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, बुधवारी नगरपालिका मंडळाची मुदत संपत आहे. साहजिकच पालिका मंडळाला आपल्या कारकिर्दीत उद्घाटन झालेले हवे असते. त्यामुळे घाई-गडबडीत उद्घाटन झाले असेलही. पण या वास्तूचा योग्य उपयोग होणे गरजेचे आहे.

‘संजीवनी बचाव’ची गरजच काय ?

संजीवनी कारखान्याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऊस उत्पादक संघटनेबरोबर झालेल्या बैठकीत संजीवनी बंद करणार नसल्याचे स्पष्ट सांगितलेले आहे. असे असताना ‘संजीवनी बचाव’ची गरजच काय ? कारखाना सध्या बंद आहे. तो खासगीरीत्या चालवावा की, पीपीपी तत्त्वावर चालवावा की, सरकारतर्फे चालवावा यावर अजून निर्णय झालेला नाही. सरकारने संजीवनीसाठी समिती स्थापन केली असून समिती योग्य ती शिफारस सरकारला करणार आहे.

ठरावानुसार नामफलकावर नावे : नगराध्यक्ष

सुवर्णमहोत्सवी निधीतून दिगंबर कामत हे मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम घेण्यास कंत्राटदार तयार नव्हते. त्यावेळी माजी आमदार फळदेसाई यांनी कंत्राटदार मिळविण्यास खूप मदत केली. विद्यमान आमदाराचेही सहकार्य लाभले आहे. पालिकेने कार्यक्रमाला कुणाला बोलवायचे यासंबंधी ठराव घेतल्याने त्यानुसार उद्घाटन नामफलकावर त्यांची नावे टाकण्यात आलेली आहेत. सदर उद्घाटन मंडळाला आपल्या कारकिर्दीत व्हावे असे वाटल्याने उद्घाटन करण्यात आले. येणाऱया काळात साहित्यासह इतर त्रुटी दूर करण्यावर भर द्यावा, असे नगराध्यक्ष कॅरोज क्रूझ यांनी सांगितले.

पालिका मंडळ ठरवते ते अंतिम : रायकर

तत्कालीन मुख्यमंत्री कामत यांनी हा प्रकल्प मंजूर केला होता व निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन करायला हवे होते असे आपले मत आहे. येथे पालिका मंडळाने कोणाला बोलवायचे हे ठरविले. आम्ही विद्यमान आमदाराचाही मान राखलेला आहे. पालिका मंडळ जे ठरवते ते अंतिम, असे नगरसेवक संजय रायकर म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. सावंत याची जेव्हा भेट घेतली तेव्हा त्यांनीच उद्घाटन करा, नंतर साहित्य खरेदी व इतर शिल्लक कामे करून घेऊया असे सांगितले. पालिका मंडळाचा कार्यकाळ संपत असून पुढे प्रशासकांमार्फत राहिलेली कामे आमदारांनी करून घ्यावीत, असे नगरसेवक संदेश कोसंबे म्हणाले.

नगरसेवक रूमाल्डो फर्नांडिस यांनी ‘सुडा’च्या अधिकाऱयांचे कौतुक केले. यावेळी कंत्राटदार किशोर देसाई यांचा सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष प्रकाश गावकर, नगरसेविका रोजामारिया फर्नांडिस, रूमाल्डो फर्नांडिस, कायतान फर्नांडिस, अमिता मापारी, सूर्यदत्त नाईक, फौझिया शेख, रायकर, कोसंबे, मुख्याधिकारी मनोज कोरगावकर, अभियंता सुहास फळदेसाई इत्यादी व्यासपीठावर हजर होते. सूत्रनिवेदन कायतान फर्नांडिस यांनी केले, तर आभार कोरगावकर यांनी मानले. निमंत्रणपत्रिकेवर नमूद केलेल्यांपैकी मुख्यमंत्री सावंत, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, वीजमंत्री नीलेश काब्राल, माजी आमदार सुभाष फळदेसाई, पालिका संचालक डॉ. तारिक थॉमस हे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. घटनास्थळी सांगेचे पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर फौजफाटय़ासह हजर होते. 113 sangue

Related Stories

श्रीस्थळचा वार्षिक भजनी सप्ताह 1 ऑगस्ट पासून सुरू

Amit Kulkarni

कोरोना बळींचा आकडा ५०७ पार

GAURESH SATTARKAR

वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने

Amit Kulkarni

लोकसहभागास अटकाव करण्यासाठी ‘रासूका’

Patil_p

भोम अपघातात विद्यार्थीनी ठार

Omkar B

ओकांब धारबांदोडा येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Patil_p
error: Content is protected !!