तरुण भारत

कोरोनामुळे मराठी रंगभूमी ‘दीन’

हिरकमहोत्सवी राज्य नाटय़ स्पर्धेलाही ‘पॉज’ मराठी रंगभूमी दिनी पडदा बंदच तिसरी घंटा लवकरच-प्रसाद कांबळी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत राज्य नाटय़स्पर्धेचा मोठा वाटा

Advertisements

प्रवीण मांजरेकर / सावंतवाडी:

ना टाळय़ांचा कडकडाट… ना अभिनंदनाचा वर्षाव…ना पडदा उघडण्याची घंटा.. ना नांदी… ना तडाखेबाज संवादाचा अभिनय.. फक्त दिसतोय बंद मलमली पडदा….गेले आठ महिने कोरोनामुळे जग थांबले आहे. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर कोरोनाने आपले जाळे टाकले आहे. नाटय़क्षेत्रही त्याला अपवाद नाही. आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. नाटय़सृष्टीच्या इतिहासात प्रथमच बंद पडद्यात रंगभूमी दिन साजरा होत आहे. नाटय़कला स्तब्ध झाल्यामुळे नाटकावर अवलंबून असणार कलाकार, संस्था व पडद्यामागील कलाकार आर्थिक विवंचनेत आहेत.

कोरोनामुळे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे दरवर्षी होणारी व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडाणघडणीत महत्वाची भूमिका निभावणाऱया हिरकमहोत्सवी राज्य नाटय़स्पर्धेला कोरोनामुळे पॉज मिळाला आहे. शासनाकडून स्पर्धा रद्दची अधिकृत घोषणा अद्यापही झाली नसली तरी स्पर्धेचा पडदा उघडण्याची शक्यता धूसर बनली आहे. तिसरी घंटा कधी वाजणार, याची उत्सुकता कलाकारांबरोबर रसिकांनाही लागून राहिली आहे. दरम्यान, अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच तिसरी घंटा वाजण्याचे संकेत दिले आहेत.

‘सीता स्वयंवर’ नाटक सादर करून विष्णूदास भावे यांनी 1843 साली मराठी नाटय़सृष्टीचा पाया रचला. त्या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिन साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाटय़गृहे बंद असल्यामुळे यावर्षीचा रंगभूमी दिन तिसऱया घंटेविनाच होणार आहे. 

राज्य नाटय़ स्पर्धाही रद्दच्या वाटेवर

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून हौशी कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी राज्य नाटय़स्पर्धा सुरू झाली. गेली सलग 59 वर्षे ही स्पर्धा सुरू आहे. यावर्षीची स्पर्धा हिरकमहोत्सवी होती. या स्पर्धेत राज्यातील 400 हून अधिक संस्था भाग घेत असतात. तर पाच ते सहा हजार रंगकर्मी या स्पर्धेशी जोडले जातात. सहा-सहा महिने नाटय़संस्था या स्पर्धेची तयारी करत असतात. हौसेला मोल नसते. कोणतीही कला व त्यातून मिळणारा आनंद पैशात मोजता येत नाही. राज्य नाटय़स्पर्धेतील नाटक निर्मितीसाठी सहभागी संस्था हौशेसाठी पदरमोड करून अमाप खर्च करत असतात. ऑगस्टपासून या स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. तर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱया आठवडय़ात राज्यातील विविध केंद्रावर स्पर्धा सुरू होते. बहुतांश वेळा 5 नोव्हेंबर रंगभूमीदिनी स्पर्धेचा पडदा उघडतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या कारणामुळे नाटय़ थिएटर्स उघडण्यास शासनाकडून अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. निधीअभावी गतवर्षी सहभागी झालेल्या संस्थांना प्रवास खर्च व सहभाग मानधनही शासनाकडून प्राप्त झाले नाही. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या हिरक महोत्सवी राज्य नाटय़ स्पर्धेचा पडदा उघडण्याची शक्यता धूसर बनली आहे. सांस्कृतिक संचालनालयाचे अधीक्षक मिलिंद बिर्जे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही स्पर्धा आयोजनास शासनाची अद्यापही परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले.

नाटय़संस्थांकडून विविध उपक्रम

नाटय़गृह बंद असताना व समूहाने एकत्र येण्यासही बंदी असताना नाटय़प्रेमी मंडळी वेगवेगळे पर्याय काढत, शक्यता अजमावून पाहत लॉकडाऊनमध्येही नाटय़कला जिवंत ठेवली आहे. विविध प्रयोगशील संस्थांनी वेगवेगळे ऑनलाईन उपक्रम आयोजित करून रसिकांना वेगळी अनुभूती दिली. यामध्ये राज्यातील नावाजलेली अभिनय कल्याण ही संस्था आघाडीवर राहिली असून या संस्थेने थिएटर प्रीमिअर लीग, अभिवाचन महोत्सव असे विविध उपक्रम राबविले. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील नाटय़प्रेमी व संस्थांनीही विविध ऑनलाईन उपक्रम राबविले. मात्र, आता रसिकांना तिसरी घंटा कधी वाजणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसले तरी बऱयापैकी जोर ओसरला आहे. त्यामुळे लवकरच शासनाकडून थिएटर उघडण्यास परवानगी मिळेल व पुन्हा एकदा नाटय़कला बहरेल, असाच सूर नाटय़ कलाकारांतून व्यक्त होत आहे.

नव्या निर्मितीची चाहूल

महाराष्ट्रातील नामवंत दिग्दर्शक व अभिनय कल्याणचे अध्यक्ष अभिजीत झुंजारराव याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, मागील कित्येक वर्षाचा राज्य नाटय़स्पर्धेचा इतिहास पाहता यावर्षी कोरानामुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सांस्कृतिक चळवळ थांबल्यामुळे कलाकार, रसिकांची होत असणारी घुसमट नक्कीच त्रासदायक आहे. पण, या सगळय़ा स्थित्यंतरानंतर जी नवी निर्मिती होईल, ती नक्कीच जास्त सशक्त व अधिक दर्जेदार असेल. या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून नवीन लेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

सद्यस्थितीतील शासनाची भूमिका योग्यच!

अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी याबाबत प्रतिक्रिया  व्यक्त करताना म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक चळवळ ठप्प झाली आहे. यामुळे नाटय़ संस्था, सांस्कृतिक संस्था, कलाकार, पडद्यामागील कलाकार आर्थिक विवंचनेत आहेत. मात्र, शासनाकडून अद्याप कोणतीही मदत देण्यात आली नाही. नाटय़ थिएटर्स लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत शासनाची भूमिका योग्य आहे. सर्व नाटय़ संघटनांनीही थिएटर्स सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. आता रंगभूमी दिनी सर्वांनी नटराजाकडे प्रार्थना करुया की, कोरोनाचे संकट दूर करून लवकर तिसरी घंटा वाजू दे.

Related Stories

सतीश सावंत यांनी जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा!

NIKHIL_N

भोस्ते घाटात बर्निंग कारचा थरार

Abhijeet Shinde

मुंबईतील चाकरमान्यांना घेऊन पहिली लालपरी मंडणगड तालुक्यात दाखल

Abhijeet Shinde

रत्नागिरी : तवसाळ आगर समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला जीवदान

Abhijeet Shinde

जामीन मिळाल्यानंतर राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Abhijeet Shinde

रत्नागिरी (दापोली) : कोंढे येथे अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!